Brave warrior | जबाबदाऱ्यांचा डोंगर पेलणारी नागपुरातील वीरपत्नी

राकेश घानोडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर:
पती-पत्नी संसाररूरुपी रथाची दोन चाके असतात. दोन्ही चाके एकमेकांसोबत असेपर्यंत हा रथ सुरळीत चालत राहतो. परंतु, यापैकी कोणतेही चाक निखळून पडल्यास पुढचा प्रवास कठीण होऊन जातो. अशावेळी जीवन क्षणाक्षणाला परीक्षा घेते. अशीच परिस्थिती वीरपत्नी सविता धोपाडे यांच्यावर ओढवली, पण त्यावेळी त्यांनी खचून न जाता आत्मबळ उंचावून जबाबदाऱ्यांचा डोंगर पेलला.
सवितातार्इंचे पती किरणकुमार पोलीस उपनिरीक्षक होते. सालेकसा येथे कर्तव्यावर असताना ते ३० मे २००५ रोजी नक्षलींनी घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात शहीद झाले. त्यावेळी त्यांची मोठी मुलगी सायली साडेचार तर, लहान मुलगी साक्षी अवघ्या दीड वर्षांची होती. या दुर्दैवी घटनेमुळे सवितातार्इंवर दु:खाचा डोंगर कोसळला. दरम्यान, कुटुंबीयांनी दिलेल्या बळामुळे त्यांनी स्वत:ला सावरले.
मुलींना उच्च शिक्षण देऊन चांगल्या पदावर नोकरीवर लावायचे असे शहीद किरणकुमार यांचे स्वप्न होते. हे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्याचे एकच लक्ष्य डोळ्यांपुढे ठेवून सवितातार्इंची वाटचाल सुरू आहे. यावर्षी सायली इयत्ता बारावीला तर, साक्षी इयत्ता आठवीला आहे. आईच्या प्रोत्साहनामुळे सायलीने वडिलांप्रमाणेच पोलीस सेवेत जाण्याचा निर्धार केला आहे. साक्षीही जीवनात मोठे होण्याची जिद्द बाळगून आहे. सवितातार्इंचा संघर्ष व प्रेरणा आणि कुटुंबीयांचे मार्गदर्शन यामुळे हे सर्व शक्य होत आहे.


Web Title: Brave warrior
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.