राज्यात प्रथमच अंध मुलींची क्रिकेटस्पर्धा; विदर्भातील १४ मुलींची चमू झाली रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 07:53 PM2018-02-15T19:53:18+5:302018-02-15T19:55:28+5:30

अंधत्वामुळे दैनंदिन जगणे अवघड असताना, क्रिकेटसारखा खेळ खेळण्याची जिद्द मनाशी बाळगलेल्या १४ अंध तरुणींची टीम नाशिक येथे होणाऱ्या अंध मुलींच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नागपुरहून रवाना झाल्या.

Blind girl's cricket competition for the first time in the state; 14 teams of Vidarbha went off to a team | राज्यात प्रथमच अंध मुलींची क्रिकेटस्पर्धा; विदर्भातील १४ मुलींची चमू झाली रवाना

राज्यात प्रथमच अंध मुलींची क्रिकेटस्पर्धा; विदर्भातील १४ मुलींची चमू झाली रवाना

googlenewsNext
ठळक मुद्देनाशिक येथे स्पर्धांचे आयोजनडोळयाला ब्लाईंड फोल्ड लावून खेळणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: अंधत्वामुळे दैनंदिन जगणे अवघड असताना, क्रिकेटसारखा खेळ खेळण्याची जिद्द मनाशी बाळगलेल्या १४ अंध तरुणींची टीम नाशिक येथे होणाऱ्या अंध मुलींच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नागपुरहून रवाना झाल्या. अशा प्रकारच्या अंध मुलींच्या क्रिकेटचे राज्यात प्रथमच आयोजन होत आहे. या स्पर्धा १७ व १८ फेब्रुवारी दरम्यान घेतल्या जातील. या स्पर्धेत पुणे, नाशिक, मराठवाडा व विदर्भ अशा चार ठिकाणांहून क्रिकेट टीम्स येत आहेत. त्यापैकी विदर्भातील अमरदीप विदर्भ क्रिकेट टीम आॅफ ब्लाईंड गर्ल्स ही टीमही सहभागी होत आहे.
क्रिकेट असोसिएशन आॅफ ब्लाईंड महाराष्ट्रतर्फे आयोजित या क्रिकेटस्पर्धेसाठी नागपुरात या टीमने गेल्या दीड महिन्यांपासून सराव सुरू केला होता. धरमपेठ सायन्स कॉलेजच्या मैदानात हा सराव या मुली नियमितपणे करीत होत्या. धरमपेठ सोसायटी, पर्सिस्टंट फाऊंडेशन यांच्या मदतीने हा संघ उभा झाला. ६ जानेवारीला संस्थेतर्फे एक शिबिर घेऊन १४ मुलींची निवड करण्यात आली. यात नागपूरसह विदर्भातील मुलींचा समावेश आहे. या मुलींना धरमपेठ सायन्स कॉलेजच्या मैदानावर अतुल हारोडे यांनी महिनाभर प्रशिक्षण दिले. काठीच्या आधाराने जगणे सुकर करणाºया या मुली चेंडूच्या आवाजावर सुसाट धावू लागल्या. आवाजाचे आकलन करून, जोरदार फटकेबाजी करू लागल्या. फिल्डिंग, बॅटिंग, बॉलिंग करताना बघितल्यावर या मुलींमध्ये एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण झाल्याचे दिसून आले. सरावादरम्यान त्यांच्या चेहऱ्यांवर एक वेगळाच आनंद दिसून आला. राष्ट्रीय स्पर्धेत संघाची निवड व्हावी, यासाठी मुलींची धडपड दिसून आली.
डोळस व्यक्ती ज्या पद्धतीने क्रिकेटचा बॉल पाहून टोलवेल तशाच पद्धतीने या मुलीही खेळतात. त्यांच्यासाठी क्रिकेटचा एक विशेष बॉल वापरला जातो. या बॉलमध्ये घुंगरू किंवा तत्सम अशी वस्तू टाकली जाते की जी वाजत जाते. त्या आवाजाच्या सहाय्याने क्रिकेटचा खेळ खेळणे मुलींना शक्य होते. या टीममध्ये बी १-५, बी २-४ आणि बी ३-५ मुली आहेत. बी १ म्हणजे ज्यांची दृष्यता शून्य आहे. बी २ मध्ये थोडीशी दृष्यता व बी ३ मध्ये अजून जास्त दृष्यता असलेल्या व्यक्ती मोडतात. या सर्व गटातल्या मुली क्रिकेट खेळणार आहेत. त्या बॉलिंग, बॅटींग, फिल्डींग या सर्व क्षेत्रात आहेत. मुख्य म्हणजे त्या डोळ््यावर ब्लाईंड फोल्ड म्हणजेच काळी पट्टी बांधून खेळणार आहेत. अमरदीप सोसायटी नागपूरच्या प्रमुख जिज्ञासा यांची प्रेरणा, प्रोत्साहन आणि अथक परिश्रम या सर्व उपक्रमांमागे आहेत. विदर्भातील अंध मुलांच्या क्रिकेट टीमचे कप्तान या मुलींच्या टीमचे कोच आहेत.

महिनाभरापासून आमचा सराव सुरू आहे. पहिल्यांदाच क्रिकेट खेळत असल्यामुळे एक वेगळाच उत्साह आहे. आमच्या मुली जिद्दीने परिश्रम घेत आहे. पहिल्यांदाच ही संधी मिळाली असल्याने, आमची जिंकण्याची जिद्द आहे.
अंकिता शिंदे, कर्णधार

यातून त्यांना प्रेरणा मिळेल
अंधाच्या क्षेत्रात संघटनेचे काम अविरतपणे सुरू आहे. अंध मुलांना संगणकाचे शिक्षण देण्याबरोबरच त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी आत्मदीपम कार्यरत आहे. वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही अंध मुलांचा आत्मविश्वास वाढवितो आहे. त्यांना आत्मनिर्भर करतो आहे. फक्त खेळांच्या बाबतीत आम्ही प्रयत्न केले नव्हते. अंध मुलींचा क्रिकेट संघ पहिल्यांदाच तयार केला आहे. मुलींच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून किंवा त्यांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून खेळाचे महत्त्व आहेच. यातून त्यांना प्रेरणा मिळेल, हीच अपेक्षा आहे.
जिज्ञासा चवलढाल, अध्यक्ष आत्मदीपम सोसायटी

Web Title: Blind girl's cricket competition for the first time in the state; 14 teams of Vidarbha went off to a team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.