लोकसभेचे पडघम : रामटेकच्या गडावर महायुती-महाविकास आघाडीत तुल्यबळ लढतीची चिन्हे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2023 10:51 AM2023-05-26T10:51:09+5:302023-05-26T10:51:46+5:30

जागेसाठी काँग्रेस व ठाकरे गटात रस्सीखेच; भाजप पुन्हा खंबीरपणे तुमानेंच्या पाठीशी

Battle of Lok Sabha : Signs of a tough fight between Mahayuti-Maha Vikas aghadi for the stronghold of Ramtek | लोकसभेचे पडघम : रामटेकच्या गडावर महायुती-महाविकास आघाडीत तुल्यबळ लढतीची चिन्हे

लोकसभेचे पडघम : रामटेकच्या गडावर महायुती-महाविकास आघाडीत तुल्यबळ लढतीची चिन्हे

googlenewsNext

श्रीमंत माने/कमलेश वानखेडे

नागपूर : परंपरेने एकमेकांविरुद्ध लढणारी उद्धव ठाकरे यांची शिवसेना व काँग्रेस महाविकास आघाडीत रामटेकच्या जागेचे काय करणार, हा मोठा प्रश्न आहे. याउलट भाजप व एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या महायुतीत किमान जागावाटपाची अडचण नाही. या मतदारसंघातील भाजपची ताकद ओळखूनच खासदार कृपाल तुमाने शेवटच्या टप्प्यात शिंदे यांच्यासोबत गेले, तरीही तूर्त या जागेवर भाजपकडून काही वेगळा विचार सुरू नाही.

शेजारच्या अमरावतीप्रमाणेच रामटेक मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे आणि अमरावती, यवतमाळप्रमाणेच याही जागेसाठी काँग्रेस व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत रस्सीखेच अपेक्षित आहे. हेही महत्त्वाचे की, या मतदारसंघात शिवसेनेची आधीच मोठी ताकद नाही. फुटीमुळे त्या ताकदीचे दोन तुकडे झाले आहेत. त्या तुलनेत काँग्रेस, राष्ट्रवादीची ताकद अधिक आहे. जिल्हा परिषद, बहुतेक पंचायत समित्या, बाजार समित्या आघाडीच्या ताब्यात आहेत. या मतदारसंघात बहुजन समाज पार्टीही चांगली मते मिळवत आली आहे.

रामटेकमध्ये यापूर्वी कुणीही सलग तीन विजय मिळवून हॅट् ट्रिक नोंदविलेली नाही. दिवंगत पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव, जतीराम बर्वे, अमृत सोनार व सुबोध मोहिते यांनीच हा मतदारसंघ राखीव होण्याच्या आधी प्रत्येकी सलग दोन विजय मिळविले आहेत. म्हणजे कृपाल तुमानेंना नवा विक्रम खुणावतो आहे. कृपाल तुमाने यांचा जनसंपर्क दांडगा असला, तरी हा विक्रम नोंदविणे ही त्यांच्यासाठी कसोटी आहे. कारण महायुती व महाविकास आघाडी रामटेकमध्ये तुल्यबळ आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख (काटोल), काँग्रेसकडून माजी मंत्री सुनील केदार (सावनेर) व राजू पारवे (उमरेड) हे तीन विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीकडे, तर समीर मेघे (हिंगणा), टेकचंद सावरकर (कामठी) हे दोघे भाजपचे आणि शिंदे गटातील अपक्ष आशिष जयस्वाल (रामटेक) हे तीन मतदारसंघ महायुतीकडे आहेत, त्याशिवाय भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची कामठीतील ताकद तुमानेंच्या सोबत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या ग्रामीण भागात खास लक्ष घातले आहे.

राखीव मतदारसंघातील गेल्या तीन निवडणुकांपैकी पहिल्या २००९ च्या निवडणुकीत बुलढाणा सोडून रामटेकला आलेले मुकुल वासनिक यांनी शिवसेनेच्या कृपाल तुमानेंचा पराभव केला. पुढच्या निवडणुकीत तुमाने यांनी त्या पराभवाची परतफेड केली. गेल्या निवडणुकीत वासनिकांऐवजी माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये यांना काँग्रेसने उतरविले, पण त्यांचाही पराभव झाला. आता काँग्रेस वासनिक, गजभिये यांचा विचार करते की, नवा चेहरा शोधते, हे पाहावे लागेल. त्या दृष्टीने उमरेडचे आमदार राजू पारवे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष रश्मी बर्वे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांची नावे चर्चेत आहेत.

रामटेक लोकसभा मतदारसंघ

विधानसभा मतदारसंघनिहाय मते : २०१९ :: मतदारसंघनिहाय मते : २०१४

कृपाल तुमाने - किशोर गजभिये : कृपाल तुमाने - मुकुल वासनिक

  • काटोल : ९०,३६८ - ६८,१६५ : ८६,३२२ - ४७,८७६
  • सावनेर : ८८,११७ - ८०,६६१ : ८६,३१६ - ५६,३७७
  • हिंगणा : १,०५,६०३ - ७९,६८४ : ७४,२८५ - ५७,३०२
  • उमरेड : ९३,६४८ - ७०,६७८ : ८५,८०१ - ५४,३५०
  • कामठी : १,२३,८९५ - ९९,४३१ : १,०७,२५६ - ७१,८३३
  • रामटेक : ९३,१९६ - ७०,११९ : ७९,२३४ - ५६,१४८

टपाली मते : २२९९ - १६०५ : ६७८ - २१५

एकूण : ५,९७,१२६ - ४,७०,३४३ : ५,१९,८९२ - ३,४४,१०१

२०१४ मध्ये बसपाच्या श्रीमती किरण रोडगे पाटणकर यांनी ९५ हजार ५१ मते घेतली. २०१९च्या निवडणुकीत त्या वंचित बहुजन आघाडीकडून लढल्या व ३६ हजार ३४० मते मिळविली. यावेळी बसपाचे सुभाष गजभिये यांना ४४ हजार ३२७ मते मिळाली.

Web Title: Battle of Lok Sabha : Signs of a tough fight between Mahayuti-Maha Vikas aghadi for the stronghold of Ramtek

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.