औरंगाबाद ते नागपूर तब्बल ६०० किलोमीटरचा ग्रीन कॉरिडॉर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 11:28 PM2018-06-22T23:28:04+5:302018-06-22T23:29:11+5:30

अवयव प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत वर्षानुवर्षे यातना सहन करत असलेले रुग्ण आणि त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत असलेल्या नातेवाईकांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. कालपर्यंत सोर्इंअभावी नागपूरसह विदर्भातून ‘ब्रेन डेड’ (मेंदू मृत) रुग्णाचे अवयव राज्याबाहेर पाठविले जायचे. परंतु आता दुसऱ्या शहरातून अवयव नागपुरात येत आहेत. शुक्रवारी औरंगाबाद येथून तब्बल ६०० किलोमीटरचे अंतर कापत केवळ साडेपाच तासात ग्रीन कॉरिडॉरच्या मदतीने यकृत नागपुरात पोहचले. ही पहिलीच घटना ठरली. १५ वर्षीय दात्याकडून अवयवदान झाल्याने लकडगंज येथील न्यू इरा हॉस्पिटलमध्ये त्याचे यशस्वी प्रत्यारोपण होऊन ३७ वर्षीय रुग्णाला जीवनदान मिळाले.

Aurangabad to Nagpur, 600 km green corridor | औरंगाबाद ते नागपूर तब्बल ६०० किलोमीटरचा ग्रीन कॉरिडॉर

औरंगाबाद ते नागपूर तब्बल ६०० किलोमीटरचा ग्रीन कॉरिडॉर

googlenewsNext
ठळक मुद्देपहिलीच घटना : साडेपाच तासात आले यकृत : १५ वर्षीय मुलाचे अवयवदान

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अवयव प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत वर्षानुवर्षे यातना सहन करत असलेले रुग्ण आणि त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत असलेल्या नातेवाईकांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. कालपर्यंत सोर्इंअभावी नागपूरसह विदर्भातून ‘ब्रेन डेड’ (मेंदू मृत) रुग्णाचे अवयव राज्याबाहेर पाठविले जायचे. परंतु आता दुसऱ्या शहरातून अवयव नागपुरात येत आहेत. शुक्रवारी औरंगाबाद येथून तब्बल ६०० किलोमीटरचे अंतर कापत केवळ साडेपाच तासात ग्रीन कॉरिडॉरच्या मदतीने यकृत नागपुरात पोहचले. ही पहिलीच घटना ठरली. १५ वर्षीय दात्याकडून अवयवदान झाल्याने लकडगंज येथील न्यू इरा हॉस्पिटलमध्ये त्याचे यशस्वी प्रत्यारोपण होऊन ३७ वर्षीय रुग्णाला जीवनदान मिळाले.
प्रतीक बाबासाहेब वाहुळकर (१५) रा. निसरवाडी गल्ली नं. ६ औरंगाबाद, असे त्या ब्रेन डेड मुलाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, १९ जून रोजी एका दुचाकीवरून प्रतीक व त्याचे दोन मित्र प्रवास करीत असताना दुचाकी रस्ता दुभाजकावर धडकली. यात प्रतीक गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्याला जबर मार बसला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोन दिवसाच्या उपचारानंतर डॉक्टरांनी ‘ब्रेनडेड’ झाल्याची घोषणा केली. डॉक्टरांनी त्याचे वडील बाबासाहेब यांना अवयवदानाची कल्पना दिली. वडिलांनी त्या दु:खातही अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यानुसार हृदय, यकृत, दोन्ही मूत्रपिंड दान करण्यात आले. हृदय फोर्टीज हॉस्पिटल मुंबई, दोन्ही मूत्रपिंड औरंगाबाद येथील हॉस्पिटलला तर यकृत नागपूर येथील न्यू इरा हॉस्पिटलला देण्यात आले.
-पहिल्यांदाच ‘सोटो’ प्रणाली
राज्यातील अवयव प्रत्यारोपण चळवळीचा वेग वाढावा, त्यात नव्या प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञानाची मदत घेता यावी यासाठी केंद्र सरकारने राज्यात विभागीय अवयव उती प्रत्यारोपण समिती (सोटो) आणि राज्य उती प्रत्यारोपण समितीची (सोटो) स्थापना केली आहे. प्रतीक याचा रक्तगट औरंगाबाद येथील रुग्णाशी जुळत नसल्याने त्यांनी ‘सोटो’ला कुठे यकृताची गरज असलेला रुग्ण उपलब्ध आहे का, याची विचारणा केली. त्यानुसार नागपुरात रुग्ण असल्याचे आढळून आल्याने पहिल्यांदाच ‘सोटो’ प्रणालीच्या मदतीने नागपूरच्या रुग्णाला यकृत मिळाले. या प्रक्रियेत झोनल ट्रान्सप्लान्ट कोआॅर्डिनेशन सेंटर, नागपूरची (झेडटीसीसी) भूमिका महत्त्वाची राहिली. या सेंटरच्या अध्यक्ष डॉ. विभावरी दाणी, सचिव डॉ. रवी वानखेडे यांच्यासह डॉ. सुधीर टॉमी व नागपूर झोन कॉर्डीनेटर वीणा वाठोरे यांचे विशेष योगदान राहिले.
औरंगाबाद ते नागपूर विमान सेवा वापरणे अशक्य झाल्याने यकृत सडक मार्गाने नेण्याचा निर्णय घेण्यात आला. कमीतकमी वेळात हे ६०० किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी रुग्णवाहिकेच्या जागी ‘मर्सिडीज बेन्झ’ची मदत घेण्यात आली. यामुळे साडेपाच तासांत यकृत नागपुरात पोहचणे शक्य झाले.
- न्यू इरा हॉस्पिटलमध्ये सहावे प्रत्यारोपण
ब्रेन डेड रुग्णाच्या शरीरातून यकृत काढल्यानंतर आठ तासांत प्रत्यारोपण करणे आवश्यक असते. त्या दृष्टीने न्यू इरा हॉस्पिटलमध्ये तशी तयारी करण्यात आली होती. यकृत मिळताच ३७ वर्षीय पुरुषावर प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेला सुरुवात झाली. येथील यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. राहुल सक्सेना, डॉ. सोमंत चटोपध्याय व हॉस्पिटलचे संचालक डॉ. आनंद संचेती, डॉ. नीलेश अग्रवाल, वीरेंद्र किर्नाके यांच्यासह डॉ. अमोल कोकस, डॉ. पंकज ढोबळे, डॉ. सोनाली सराफ, डॉ. साहिल बंसल, डॉ. सविता जयस्वाल आदींचा शस्त्रक्रियेत सहभाग होता. केवळ दोन महिन्यात लकडगंज येथील न्यू इरा हॉस्पिटलमध्ये हे सहावे तर नागपुरातील सातवे यकृत प्रत्यारोपण आहे.
-ग्रीन कॉरिडॉरमध्ये पोलिसांची भूमिका महत्त्वाची
अवयवदान प्रक्रियेत अवयव सडक मार्गाने काही तासांत दुसºया रुग्णापर्यंत पोहोचविण्यात ग्रीन कॉरिडॉर महत्त्वाची भूमिका बजावते. हे पोलिसांमुळेच शक्य होते. औरंगाबाद ते नागपूर हा मार्ग ग्रीन कॉरिडॉर करण्यासाठी या मार्गावरील पोलीस ठाण्यांची मोठी मदत राहिली. या शिवाय निवृत्त सहायक पोलीस आयुक्त जमील अहमद, वाहतूक शाखा क्रमांक एकचे पोलीस निरीक्षक क्षीरसागर, वाहतूक शाखा क्रमांक दोनचे पोलीस निरीक्षक अतुल सबनीस आणि वाहतूक शाखा क्रमांक तीनचे पोलीस निरीक्षक फुलपगारे यांनीही आपली जबाबदारी यशस्वीरीत्या सांभाळली.

 

Web Title: Aurangabad to Nagpur, 600 km green corridor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.