अन् नागपूरशी अटलजींचे जुळले कौटुंबिक नाते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 10:12 PM2018-08-16T22:12:54+5:302018-08-16T22:17:01+5:30

साधारणत: एखादी व्यक्ती राजकारणात उच्च पदावर पोहोचली की कुटुंबीयांपासून काही प्रमाणात दुरावत जाते. मात्र सर्वच बाबतीत वेगळेपण जपलेले माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी कुटुंबीयांना कधीच अंतर दिले नाही. ते स्वत: जरी अविवाहित असले तरी भावाबहिणींच्या कुटुंबाला त्यांनी नेहमी आपले मानून जिव्हाळा दिला. संघाच्या माध्यमातून नागपूरशी जुळणाऱ्या अटलजींचा शहराशी कौटुंबिक संबंधदेखील आला. सख्खी भाची अनिता पांडे यांना भेटण्यासाठी कुठलाही बडेजाव न करता अटलजी नागपुरात आले होते.

Atalji's family relationship with Nagpur | अन् नागपूरशी अटलजींचे जुळले कौटुंबिक नाते

अन् नागपूरशी अटलजींचे जुळले कौटुंबिक नाते

googlenewsNext
ठळक मुद्देसख्ख्या भाचीला भेटण्यासाठी अनेकदा आले उपराजधानीत : कुटुंबीयांना कधीच दिले नाही अंतर

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : साधारणत: एखादी व्यक्ती राजकारणात उच्च पदावर पोहोचली की कुटुंबीयांपासून काही प्रमाणात दुरावत जाते. मात्र सर्वच बाबतीत वेगळेपण जपलेले माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी कुटुंबीयांना कधीच अंतर दिले नाही. ते स्वत: जरी अविवाहित असले तरी भावाबहिणींच्या कुटुंबाला त्यांनी नेहमी आपले मानून जिव्हाळा दिला. संघाच्या माध्यमातून नागपूरशी जुळणाऱ्या अटलजींचा शहराशी कौटुंबिक संबंधदेखील आला. सख्खी भाची अनिता पांडे यांना भेटण्यासाठी कुठलाही बडेजाव न करता अटलजी नागपुरात आले होते.
अटलबिहारी वाजपेयी यांना तीन बहिणी होत्या. त्यांची सर्वात लहान बहीण उर्मिलावर अटलजींचा विशेष जीव होता. उर्मिला यांची मुलगी अनिता यांचा नागपुरातील ओमप्रकाश पांडे यांच्याशी १९८५ साली विवाह झाला आणि एका नव्या नात्याने नागपूर अटलजींशी जोडल्या गेले. ‘लोकमत’ने देवनगर येथे राहणाऱ्या अनिता पांडे यांच्याकडून अटलबिहारी वाजपेयी यांच्यातील कुटुंबवत्सल व्यक्तिमत्त्व जाणून घेतले.

बच्चे कंपनीचे होते ते ‘मामू’
आमच्या लहानपणी अटलजी आमचे आवडते ‘मामू’ होते. कामातून वेळ मिळाला की ते हमखास ग्वाल्हेरला यायचे व आमच्यासमवेत वेळ घालवायचे. मुलांना तर ते फारच आवडायचे. ‘चलो कही घूम आते है..’ असे ते म्हणायचे आणि सर्व मुलांना घेऊन कधी जत्रा, कधी चित्रपट पाहण्यासाठी घेऊन जायचे. त्यांना चांगल्या चित्रपटांची आवड होती, असे अनिता पांडे यांनी सांगितले.

नागपूरची कचोरी व कढीचे होते चाहते
माझे मामा अटलबिहारी वाजपेयी हे खवय्ये होते. त्यांना महाराष्ट्रीयन पदार्थदेखील आवडत असत. नागपूरला आले की कचोरी, मुगाचे वडे, बुंदीचे लाडू यांची फर्माईश तर असायचीच शिवाय कढीचे ते चाहते होते. नागपुरात ते आमच्याच घरी जेवत असत. एकदा घरी यायला वेळ नसल्यामुळे त्यांनी नाश्ताच विमानतळावर मागवून घेतला होता. प्रकृती ठीक नसताना त्यांच्यासाठी साधे जेवण बनायचे. त्यावेळी ते हट्टाने सर्वांसाठी बनलेले जेवण मागायचे, अशी आठवण सांगताना अनिता पांडे यांचे डोळे भरून आले होते.

लग्नानंतर दिले ‘सरप्राईज’
माझे लग्न १९८५ साली झाले व त्यात अटलबिहारी वाजपेयी आवर्जून उपस्थित होते. लग्न झाल्यानंतर आठवडाभरातच ते नागपूरला माझ्या सासरी आले. कुठलीही पूर्वकल्पना न देता ते आले होते व लाडक्या भाचीला माहेरी मांडवपरतणीसाठी नेण्यासाठी हे ‘सरप्राईज’ दिले असल्याचे त्यांनी सांगितले होते.

नातवांत व्हायचे रममाण
अटलबिहारी वाजपेयी यांनी नातवांसमवेतदेखील जिव्हाळा कायम ठेवला होता. आपला भाचा-भाची यांच्या मुलांची प्रकृती, शिक्षण इत्यादींची ते निमयित विचारपूस करत. माझी मुलगी प्रियंका हिला ते नेहमी ‘चिकू’ अशी हाक मारायचे. घरी आले की ‘हम तो चिकू खाने है... कहा है हमारी चिकू’ असे म्हणत प्रियंकाला बोलवायचे. घरी आल्यावर बच्चेकंपनीसमवेत ते वय विसरून रममाण व्हायचे, अशी आठवण अनिता पांडे यांनी सांगितली. 

 

Web Title: Atalji's family relationship with Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.