ठळक मुद्देजागतिक आदिवासी अधिकार दिवस : फेलिक्स पॅडेल यांचे प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ब्रिटिशांनी वन विभाग स्थापन करून आदिवासींचे अधिकार हिरावले आणि त्यांच्यावरील अन्यायाचे सत्र सुरू झाले. भारत स्वतंत्र झाला, परंतु आदिवासींवरील हा अन्याय मात्र कायम राहिला. स्वातंत्र्यानंतर आजही आदिवासींचे अधिकार हिरावले जात असून, त्यांच्यावर अन्याय सुरू आहे. विकासाच्या नावावर जल,जंगल, जमीन नष्ट केली जात आहे, असे प्रतिपादन मानव उत्क्रांतीवादाचे जनक डार्विन यांचे पणतू आणि मानववंश शास्त्रज्ज्ञ डॉ. फेलिक्स पॅडेल यांनी येथे केले.
आदिवासी समाजातील देशभरातील विविध सामाजिक संस्थांच्या एकीकृत मंच असलेल्या आदिवासी समन्वय मंच, अ.भा.आदिवासी परधान समाज संघटन, आदिवासी विद्यार्थी संघ आणि विविध आदिवासी संघटनांच्यावतीने अकरावा जागतिक आदिवासी अधिकार दिवसानिमित्त बुधवारी धंतोली येथील बचत भवन सभागृहात परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या परिसंवादाचे प्रमुख वक्ते म्हणून डॉ. पॅडेल बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी केंद्रीय मंत्री खा. फग्गनसिंह कुलस्ते, राजस्थानचे माजी मंत्री महेंद्रजितसिंग मालविया, ओडिशाचे आमदार भोला मुंडारी, प्रभू टोकिया, अशोक बाबुल, साधना मीना, राजमाता राज राजेश्वरी, मुकेश बिरवा, आनंदराव कोवे, अमित कोवे, दिनेश मडावी, शिव भानुसिंग मंडलोई, इंदिरा मरकाम, मुकुंदा उईके आदी व्यासपीठावर होते.
डॉ. पॅडेल म्हणाले, जल, जमीन, जंगल नष्ट केले जात आहेत. विकासाच्या नावावर आदिवासींना हटविले जात आहे. आदिवासी आजही शिक्षणात मागे आहेत; कारण स्वातंत्र्यानंतर त्यांची संस्कृती व भाषा ही शाळेत उपलब्धच करून देण्यात आलेली नाही. देशभरातील आदिवासी आपल्या अधिकारासाठी लढत आहेत. देशात विविध ठिकाणी आदिवासींचे आंदोलन सुरू आहे. परंतु या आंदोलनाला विकास विरोधी आंदोलन ठरविले जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी डॉ. पॅडेल यांनी ओडिशातील आदिवासी भाषेतील एक गीतही व्हायोलिनवर सादर केले. अशोक चौधरी यांनी प्रास्ताविक केले. डॉ. शांतिकर वसावा यांनी संचालन केले. एच.सी. माथे यांनी आभार मानले.

ब्रिटिशांनी केलेल्या अन्यायाबद्दल आदिवासींची मागितली जाहीर माफी
आदिवासी समाजावर जगभरात अन्याय केला जात आहे. आॅस्ट्रेलिया आणि कॅनडाच्या पंतप्रधानांनी मोठे मन दाखवून त्यांच्या देशात आदिवासींवर झालेल्या अन्यायाबाबत जाहीर माफी मागितली. भारतातील आदिवासींवर ब्रिटिशांनी अन्याय केला. त्यांच्या भांडवलवादी धोरणामुळेच आदिवासींवर अन्याय झाला. आजही तो अन्याय सुरू आहे, त्यामुळे एक ब्रिटिश नागरिक या नात्याने मी आदिवासी समाजाची जाहीर माफी मागत असल्याचे डॉ. फेलिक्स पॅडेल यांनी यावेळी जाहीरपणे सांगितले.

देशभरातील आदिवासींनी एकजूट व्हावे
यावेळी माजी मंत्री खा. फग्गनसिंह कुलस्ते यांनी आदिवासींनी आपल्या अधिकारांसाठी एकजूट होण्याचे आवाहन केले. देशभरातील आदिवासी एकत्र आले तर त्यांचे अधिकार कुणीही हिरावू शकणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. दिनेश मडावी यांनी सुद्धा आदिवासींनी आपली एकजूट दाखवून द्यावी, असे आवाहन केले. राजमाता राजेश्वरी, महेंद्रजित सिंग मालविया, भोला मुंडारी, प्रभू टोकीया,आदींनीही आपले विचार व्यक्त केले
आदिवासी भाषा-संस्कृतीचे रक्षण व्हावे
आदिवासी भाषा आणि संस्कृती ही अतिशय जुनी व समृद्ध आहे. आदिवासीतील काही शब्द इंग्रजीमध्ये सुद्धा आलेले आहेत. परंतु ही भाषा आणि संस्कृती नष्ट होत चालली आहे, त्याचे रक्षण करण्याची गरज आहे, असे डॉ. फेलिक्स पॅडेल म्हणाले.