स्वातंत्र्यानंतर देशाच्या सीमांसंदर्भात उपेक्षाच : अरुणकुमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 08:59 PM2018-01-24T20:59:37+5:302018-01-24T21:02:46+5:30

स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाने सीमेची नेहमी उपेक्षाच केली. याचाच फायदा पाकिस्तान व चीन हे देश घेत गेले. आजही आपल्या देशाच्या अधिपत्याखाली नेमकी किती बेटं येतात याची माहिती नाही. जगभरात सुरक्षेसंदर्भातील परिस्थिती बदलत आहे. त्या हिशेबाने दुसऱ्या  देशांचा अभ्यास करणे अनिवार्य झाले आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सहसंपर्कप्रमुख अरुणकुमार यांनी केले.

After independence boundaries of the country neglected : Arun Kumar | स्वातंत्र्यानंतर देशाच्या सीमांसंदर्भात उपेक्षाच : अरुणकुमार

स्वातंत्र्यानंतर देशाच्या सीमांसंदर्भात उपेक्षाच : अरुणकुमार

Next
ठळक मुद्दे‘राष्ट्रीय सुरक्षा-वर्तमान परिस्थिती’वर व्याख्यानाचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आपल्या देशात धर्मसंस्कृतीसंदर्भात समाजात प्रचंड अभ्यास व जागरुकता आहे मात्र हाच दृष्टिकोन सीमेबद्दल दिसून येत नाही हे दुर्दैव आहे. स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाने सीमेची नेहमी उपेक्षाच केली. याचाच फायदा पाकिस्तान व चीन हे देश घेत गेले. आजही आपल्या देशाच्या अधिपत्याखाली नेमकी किती बेटं येतात याची माहिती नाही. जगभरात सुरक्षेसंदर्भातील परिस्थिती बदलत आहे. त्या हिशेबाने दुसऱ्या  देशांचा अभ्यास करणे अनिवार्य झाले आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सहसंपर्कप्रमुख अरुणकुमार यांनी केले. हिंदू धर्म-संस्कृती मंदिरातर्फे अमृतमहोत्सवी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. याचे प्रथम पुष्प गुंफताना त्यांनी ‘राष्ट्रीय सुरक्षा : वर्तमान परिस्थिती व समाजाचे कर्तव्य’ या विषयावर उद्बोधन केले.
सायंटिफिक सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का, संघाचे महानगर संघचालक राजेश लोया, हिंदू धर्म-संस्कृती मंदिरचे अध्यक्ष गुरुनाथ (बापू) भागवत हे प्रामुख्याने उपस्थित होते. सुरक्षा हा गुंतागुंतीचा विषय होत आहे. केवळ युद्ध, आक्रमण यांच्याभोवतीच आता सुरक्षेची व्याप्ती राहिलेली नाही. सीमेच्या पलिकडून देशाच्या आत वातावरण कलुषित करून समाजात दरी निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत. आपल्या देशाला मोठी सागरी सीमा आहे व येथे हजारो द्वीप आहेत. मात्र नेमके बेट व द्वीप किती याची संख्या राज्यकर्त्यांकडे नाही. चीनमध्ये भारताच्या विविध क्षेत्रांचे अध्ययन करण्यासाठी ५०० हून अधिक अध्ययन केंद्र आहेत. तेथील बुद्धिवंत लोक भारताचा सखोल अभ्यास करत आहेत. आपल्याकडे मात्र बुद्धिवंत म्हणजे केवळ चर्चासत्र, कार्यशाळा, भाषणे यापुरतेच मर्यादित आहेत. बुद्धिवंतांनी देशाची सुरक्षा हा आपला विषय मानला पाहिजे, असे प्रतिपादन अरुणकुमार यांनी केले. प्रकाश एदलाबादकर यांनी संचालन केले तर बापू भागवत यांनी आभार मानले.
पाक-चीनबाबत स्पष्ट धोरण का नाही ?
स्वातंत्र्यापासून राज्यकर्त्यांनी कधीही पाकिस्तान व चीनबाबत स्पष्ट धोरण स्पष्ट केले नाही. भारत हा आपला शत्रू आहे व त्याला हरतऱ्हेने  कमकुवत करायचे आहे, हे पाकिस्तानचे धोरण स्पष्ट आहे. चीनचेदेखील यासंदर्भात धोरण स्पष्ट आहे. मग या देशांसंदर्भात आतापर्यंत आपणच धोरण स्पष्ट का ठेवले नाही, असा प्रश्न अरुणकुमार यांनी उपस्थित केला.
पाक-चीनकडून अस्थिरता निर्माण करण्याचे प्रयत्न
आता देशाची शक्ती जगात दिसत असताना पाक व चीनकडून देशविघातक शक्तींना बळ देऊन भारतात अस्थिरता निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत व पुढील काळात हे प्रयत्न आणखी ताकदीने होतील, असेदेखील ते म्हणाले. ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून मनोवैज्ञानिक युद्धनीतीचा वापर करण्यात येत असून नागरिकांच्या भावना भडकवण्याचा प्रयत्न होत आहे. जलीकट्टूचा विरोध करणाऱ्या ४७ ‘फेसबुक पेजेस’पैकी २७ पाकिस्तानमधून संचालित होत होते. काश्मीरमध्ये अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या २०० ‘व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप’चे ‘अ‍ॅडमिन’ पाकिस्तानमधील होते. चीन व पाकिस्तानकडून शहरी भागातील नक्षलवादाला खतपाणी घालण्यात येत आहे. पुढील काळात हे प्रकार वाढतील, असे प्रतिपादन यावेळी अरुणकुमार यांनी केले.
समलैंगिकांच्या विवाहावर चर्चा कशाला ?
पाकिस्तान व चीनकडून आपल्या संस्कृतीवर आघात घालण्याचेदेखील मनसुबे समोर येत असून समलैंगिकांचे विवाह हादेखील त्यातीलच प्रकार असल्याचे भाष्य त्यांनी केले. समलैंगिकांच्या विवाहाच्या मुद्द्यावर देशाच मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. प्रसारमाध्यमांमध्येदेखील बातम्या रंगल्या. मात्र ही देशाची संस्कृती नाही. देशाच्या मूल्यांवर प्रहार करण्याचे प्रयत्न ‘सोशल मिडीया’च्या माध्यमातून सीमेपलीकडून होत असल्याचे ते म्हणाले.

Web Title: After independence boundaries of the country neglected : Arun Kumar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.