मनू संतांहून श्रेष्ठ?; संभाजी भिडेंच्या भूमिकेवर मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2018 01:02 PM2018-07-09T13:02:43+5:302018-07-09T13:51:03+5:30

''गावपातळीपासून संघटनात्मक बांधणी करुन हजारो अनुयायांना आपल्या मार्गावर चालायला मनुने शिकवले. हा मनु संत ज्ञानेश्वर महाराज तसेच संत तुकाराम महाराज यांच्यापेक्षा श्रेष्ठ होता'', असे वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांनी शनिवारी (7 जुलै) केले होते.

Action will be taken against Sambhaji bhide if any unconstitutional statement found - CM Devendra Fadnavis | मनू संतांहून श्रेष्ठ?; संभाजी भिडेंच्या भूमिकेवर मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

मनू संतांहून श्रेष्ठ?; संभाजी भिडेंच्या भूमिकेवर मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

googlenewsNext

नागपूर :  शिवप्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक संभाजी भिडे गेल्या काही दिवसांपासून वारंवार वादग्रस्त विधानं केल्यामुळे चर्चेत आहेत. आता देखील संभाजी भिडे यांनी मनुसंदर्भात वादग्रस्त विधान केले आहे. भिडेंनी केलेल्या मनुसंदर्भातील विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे विधान केले आहे. ''गावपातळीपासून संघटनात्मक बांधणी करुन हजारो अनुयायांना आपल्या मार्गावर चालायला मनुने शिकवले. हा मनु संत ज्ञानेश्वर महाराज तसेच संत तुकाराम महाराज यांच्यापेक्षा श्रेष्ठ होता'', असे वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांनी शनिवारी (7 जुलै) केले. या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. पुण्यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या पालखी साेहळ्यासाठी दाखल झालेले असताना संभाजी भिडे हे वादग्रस्त विधान केले. दरम्यान, संभाजी भिडे यांच्या व्हिडीओ क्लिपमध्ये असंवैधानिक विधान आढळल्यास कारवाई करू, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. 

(संभाजी भिडे यांच्या मागे अवघी पोलीस यंत्रणा वारी सोडली ‘वाऱ्यावर’)

नेमके काय म्हणाले मुख्यमंत्री ?
'संभाजी भिडे यांची व्हिडीओ क्लिप तपासून पाहू. या व्हिडीओ असंवैधानिक विधान आढळल्यास त्यावर कारवाई करू. सरकार मनूचे समर्थन करत नाही. सरकार ज्ञानोबा-तुकोबांचे विचार, राज्यघटना मानते'- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

त्यामुळे भिडे यांच्या व्हिडीओ क्लिपची तपासणी झाल्यानंतर काय कारवाई होणार,याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. 

संभाजी भिडे यांचे 'मनु'संदर्भातील वादग्रस्त विधान
''गावपातळीपासून संघटनात्मक बांधणी करुन हजारो अनुयायांना आपल्या मार्गावर चालायला मनुने शिकवले. हा मनु संत ज्ञानेश्वर महाराज तसेच संत तुकाराम महाराज यांच्यापेक्षा श्रेष्ठ होता'', असे धक्कादायक विधान संभाजी भिडे यांनी केले होते. पालखी सोहळ्यादरम्यान आपल्या धारकऱ्यांना जंगली महाराज मंदिरात संबोधित करताना ते बोलत होते.
ज्यांचा हिंदुत्वावर विश्वास आहे.त्या सर्वांनी गावागावात सभा संमेलन घ्यावे. देशाला वाचवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्याची आवश्यकता आहे. ‘वैदिक हिंदू धर्म हा अनुभव सिद्ध असून मनाला जिंकून घेण्याची प्रक्रिया म्हणजे धर्माचार होय. धर्म हा आचरणातून बळकट होतो. त्याला अधिक बळकटी देण्यासाठी संघटनांची गरज असून सर्व हिंदू धर्मियांनी एकत्र यायला हवे,’ असे भिडे यावेळी म्हणाले तसेच बाष्कळ विदर्भाला वेगळे राज्य हवंय पण ते वढू रायगडाला मान्य  नाही असेही ते यावेळी म्हणाले.

गेल्यावर्षी पालखीत नंग्या तलवारींसह सहभाग
गेल्या वर्षी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी नंग्या तलवारी घेऊन पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते, त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. यंदा पोलिसांनी शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना नोटीस बजावली होती. परंतु भिडे व धारकरी हे वारीत सहभागी होण्यावर ठाम होते. संचेती चौकात बँक ऑफ महाराष्ट्रच्या समोर पोलिसांनी बॅरिगेट लावून धारकऱ्यांना अडवून धरले. पालखी गेल्यानंतर धारकरी मागून चालत जातील असे नंतर ठरवण्यात आले. दरम्यान संभाजी भिडे यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले. तसेच तुकाराम महाराजांच्या पालखीचे सारथ्यही केले. पालखी गेल्यानंतर धारकऱ्यांनी संचेती चौक ते संभाजी पुतळ्यापर्यंत फेरीसुद्धा काढली. 
 

Web Title: Action will be taken against Sambhaji bhide if any unconstitutional statement found - CM Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.