पाच वर्षांत पूर्व विदर्भात ५०२ मातांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 10:13 AM2018-05-16T10:13:32+5:302018-05-16T10:13:50+5:30

मातामृत्यू रोखण्यासाठी प्रशासन स्तरावर विविध उपाययोजना, प्रकल्प राबविले जात असले तरी मातामृत्यूचे सत्र कायम आहे. यामुळे ‘शून्य माता मृत्यू’ची उद्दिष्टपूर्ती कधी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

502 mothers die in eastern Vidarbha in five years | पाच वर्षांत पूर्व विदर्भात ५०२ मातांचा मृत्यू

पाच वर्षांत पूर्व विदर्भात ५०२ मातांचा मृत्यू

Next
ठळक मुद्दे‘शून्य माता मृत्यू’ची उद्दिष्टपूर्ती कधी?आरोग्य विभागाकडे शहरातील मृत्यूची नोंदच नाही

सुमेध वाघमारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मातामृत्यू रोखण्यासाठी प्रशासन स्तरावर विविध उपाययोजना, प्रकल्प राबविले जात असले तरी मातामृत्यूचे सत्र कायम आहे. यामुळे ‘शून्य माता मृत्यू’ची उद्दिष्टपूर्ती कधी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. २०१२ ते १७ या पाच वर्षांत पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये ५०२ मातांचा मृत्यू झाला. यात सर्वाधिक मृत्यू गडचिरोली येथे झाले. मृत्यूचा आकडा ११९ आहे. त्या खालोखाल वर्धेत १०० तर चंद्रपुरात ९९ मृत्यूची नोंद आहे. विशेष म्हणजे, यात नागपूर शहरातील माता मृत्यूची संख्या नाही. मृत्यूचा आकडा वाढत असल्याने आरोग्य विभाग त्याची नोंद घेत नसल्याचे धक्कादायक वास्तव आहे.
माता मृत्यू कमी व्हावा यासाठी राज्यात ‘प्रधानमंत्री सुरक्षा मातृत्व अभियान’ (पीएमएसएमए) ही योजना सुरू करण्यात आली आहे.
ज्या मातांचे हिमोग्लोबिन कमी आहे, ज्यांना उच्च रक्तदाब आहे, पोटातील बाळाची वाढ व्यवस्थित झालेली नाही, प्लेटलेटची संख्या कमी आहे आदी माता या अतिजोखमीच्या गटात येतात. या मातांना तातडीने सर्व सुविधा आहेत तेथे प्रसुतीसाठी पाठवले जाते.
परिणामी, अनेक गर्भवती महिलांना या योजनेंतर्गत उपचार मिळाले आहेत. यामुळे मृत्युदर कमी होण्यास मदत झाली झाली आहे. मात्र, रुग्णालयातील हलगर्जीपणा, गंभीर रक्तस्राव, संसर्ग, इजा, अ‍ॅनिमिया, वाढलेला रक्तदाब आणि मुलाच्या जन्माच्या वेळी झालेली दुखापत यामुळे प्रसुतीच्या वेळी माता मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञाचे म्हणणे आहे.

जोखमीच्या मातांची काळजी आवश्यक
आजही ग्रामीण भागात प्रसूतींच्या आवश्यक वैद्यकीय सोई उपलब्ध नाहीत. योग्य प्रशिक्षण प्राप्त कर्मचारी नाहीत. तिथे जोखमीच्या मातांना कशा तातडीने सोई मिळतील हा प्रश्न आहे. माता मृत्यूमध्ये अ‍ॅनिमियापीडित मातांची संख्या सर्वाधिक असते. यामुळे शासनाने नववी ते अकरावीच्या मुलींना लक्ष्य करून याविषयी जनजागृती व उपचाराची सोय उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
-डॉ. वैशाली खंडाईत, स्त्री रोग, प्रसूती तज्ज्ञ

पाच वर्षानंतरही फारसा फरक नाही
नागपूर उपसंचालक आरोग्य विभागाने उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार, २०१२-१३ मध्ये भंडारा जिल्ह्यात १४, गोंदियात २०, चंद्रपुरात १८, गडचिरोलीत २९, वर्धेत १५, नागपूर जिल्ह्यात १०, असे मिळून नागपूर विभागात १०६ माता मृत्यूची नोंद झाली. तर, २०१६-१७मध्ये भंडाऱ्यात १४, गोंदियात ९, चंद्रपुरात १७, गडचिरोलित २६, वर्धेत २६, नागपूर जिल्ह्यात ७ असे मिळून नागपूर सर्कलमध्ये ९९ माता मृत्यूची नोंद आहे.

नागपूर शहरातील मृत्यूच्या नोंदीला दिली बगल
२०१२ ते २०१६ या पाच वर्षात इतर जिल्ह्याच्या तुलनेत सर्वाधिक मृत्यू एकट्या नागपूर शहरातील रुग्णालयात झाले आहेत. ६४५ मृत्यूची नोंद आहे. सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे २०१६ पर्यंत माता मृत्यू नोंद घेतली जात होती. परंतु मृत्यूचा आकडा दुप्पट होत असल्याने २०१७ पासून शहरातील मृत्यूच्या आकड्याची नोंद घेणेच बंद केले आहे. या लपवाछपवीमुळे माता मृत्यूचे प्रमाण कसे रोखणार, असाही प्रश्न तज्ज्ञांकडून उपस्थित केला जात आहे.

Web Title: 502 mothers die in eastern Vidarbha in five years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य