बापरे! १५ दिवसांत १ हजारावर डेंग्यू रुग्ण, तातडीने उपाय करण्याचे हायकोर्टाचे मनपाला निर्देश

By राकेश पांडुरंग घानोडे | Published: August 30, 2023 05:38 PM2023-08-30T17:38:50+5:302023-08-30T17:40:08+5:30

येत्या ६ सप्टेंबरपर्यंत मागितला कारवाईचा अहवाल

1000 dengue patients in 15 days, HC directed Nagpur municipal corp to take immediate measures | बापरे! १५ दिवसांत १ हजारावर डेंग्यू रुग्ण, तातडीने उपाय करण्याचे हायकोर्टाचे मनपाला निर्देश

बापरे! १५ दिवसांत १ हजारावर डेंग्यू रुग्ण, तातडीने उपाय करण्याचे हायकोर्टाचे मनपाला निर्देश

googlenewsNext

नागपूर :डेंग्यू हा जीवघेणा आजार शहरामध्ये पाय पसरत आहे. गेल्या १५ दिवसांत १ हजार २४५ डेंग्यू संशयित रुग्ण आढळून आले आहेत. ही धक्कादायक परिस्थिती असल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी डेंग्यूवर नियंत्रण मिळविण्यासाठी तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश महानगरपालिकेला दिले. तसेच, येत्या ६ सप्टेंबरपर्यंत कारवाईचा अहवाल सादर करण्यास सांगितले.

यासंदर्भात पारडी येथील ॲड. तेजल आग्रे यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्तिद्वय अतुल चांदूरकर व वृषाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, ॲड. तेजल यांनी डेंग्यूच्या वाढत्या प्रकोपाकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. २०२१ मध्ये १ हजार ४०७ तर, २०२२ मध्ये ५६ संशयित रुग्ण आढळून आले होते. गेल्यावर्षी डेंग्यू नियंत्रणात होता. परंतु, यावर्षी पुन्हा या आजाराने तोंड वर काढले आहे. काही दिवसांपूर्वी भरतवाडा येथील पाच व्यक्तींचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला. याशिवाय इतरही काही ठिकाणी डेंग्यू रुग्णांच्या मृत्यूच्या घटना घडल्या. परिणामी, महानगरपालिकेने डेंग्यूचे आक्रमण परतवून लावण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे ॲड. तेजल यांनी सांगितले. त्यानंतर न्यायालयाने या आजाराचा धोका लक्षात घेता वरील निर्देश दिले.

या उपाययोजना करण्याची मागणी

शहरातील नाल्या, गडर, मोकळे भूखंड इत्यादी ठिकाणी साचलेले पाणी रिकामे करावे, डेंग्यूचे तातडीने निदान व्हावे यासाठी वैद्यकीय किट्सचा पुरेसा पुरवठा करावा, अकस्मात परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रभावी योजना तयार करावी, डेंग्यूसंदर्भात जनजागृती करावी, खराब टायर गोळा करून त्यांची विल्हेवाट लावावी इत्यादी उपाययोजना करण्याची मागणी ॲड. तेजल यांनी केली आहे.

Web Title: 1000 dengue patients in 15 days, HC directed Nagpur municipal corp to take immediate measures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.