हिमालयातला येती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2019 06:04 AM2019-05-05T06:04:00+5:302019-05-05T06:05:07+5:30

हिमालयात खरेच ‘येती’ अस्तित्वात आहेत? हिमालयातल्या भटकंतीत निदान आम्हाला तरी कधी ते दिसले नाहीत. अनेक ठसे दिसले; पण ते ‘येती’चे कशावरून? उष्णतेमुळे हिम वितळून ठसे रूंदावतात, सैल होतात.  पावलांचे ठसे मोठे होतात.  उंचावर ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते.  काहीसे अंधूक दिसायला लागते, काही भासही होऊ शकतात.  येती ही अशीच काल्पनिक धारणा असू शकते, मात्र शास्त्रीय पद्धतीने त्याच्या मुळाशी जायला हवे.

Yeti - myths and reality! | हिमालयातला येती!

हिमालयातला येती!

Next
ठळक मुद्देहिमालयात खरेच येती आहेत हे वास्तव की भाकडकथा?

- उष:प्रभा पागे

हिमालयात खरेच ‘येती’ (हिममानव) आहेत? त्यांना प्रत्यक्ष पाहिलेय कोणी? तिथल्या हिमशिखरांचे ते संरक्षण करतात? या केवळ भाकडकथा की ते खरोखरच अस्तित्वात आहेत? 
‘येती’च्या संदर्भात आजही अनेक वाद, प्रतिवाद आहेत. भारतीय सैन्यदलाने नेपाळ-चीन सीमेवर मकालू बेस कॅम्पजवळ मोठय़ा प्राण्याच्या पावलांचे ठसे दिसल्याचा दावा नुकताच केला आणि ‘येती’ (हिममानव) पुन्हा चर्चेत आले. त्याचे अस्तित्व मात्र इतक्या वर्षांत अद्यापही सिद्ध झालेले नाही. 
‘येती’ हा एक महाकाय, उंचावर राहणारा आणि अस्वलासारखा दिसणारा प्राणी आहे, असे तिबेटी लोक त्याचे वर्णन करतात. हिमालयातील दंतकथेनुसार येती या प्राण्याला अद्याप कोणीच पाहिलेले नाही, पण यावरून तो अस्तित्वातच नाही असेही म्हणता येणार नाही. ज्याप्रमाणे कित्येक वर्षांच्या संशोधनानंतर मानवाला कृष्णविवराचा फोटो मिळवण्यात यश मिळाले त्याप्रमाणे संशोधन सुरूच ठेवल्यास कधी ना कधी येतीच्या अस्तित्वाबद्दल काहीतरी ठोस माहिती कदाचित आपल्याला मिळूही शकेल. शक्यता अशीही आहे की येती हा पूर्णपणे काल्पनिक प्राणी असून, ज्याचे ठसे मिळाले तो कदाचित वेगळ्याच प्रजातीचा जीव असू शकेल. पण जे काही असेल त्याचा शास्त्रीयरीत्या शोध घेऊन त्याचे निष्कर्ष जगासमोर मांडले गेले पाहिजेत.
अनेक नेपाळी दंतकथांमध्ये ‘येती’चा उल्लेख आढळतो. पहिले एव्हरेस्टवीर तेनसिंग नोर्गे यांनीही त्यांच्या आत्मचरित्रात त्याचा उल्लेख केला आहे. पर्वतांवर दानव, येती यासारखे उग्र प्राणी असून, ते पर्वतांचे संरक्षण करतात, अशी लामांनी त्यांच्याविषयी समजूत करून दिली होती.  याखेरीज तेनसिंगच्या वडिलांनी दोनवेळा येतीला पाहिले असल्याचे त्यांनी पुस्तकात आधी नमूद केले होते; परंतु दुसर्‍या आवृत्तीच्या वेळी त्यांनी स्वत:च त्यावर शंका उपस्थित केली आणि हा एखादा वेगळा किंवा काल्पनिक प्राणी असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला होता. 
मुळातच ‘येती’बद्दल फारशा आख्यायिका नाहीत. हिमालयात राहणार्‍या लोकांचा असा विश्वास आहे की तो महाकाय केसाळ प्राणी आहे. त्याला ते अपशकुनी मानतात. येती दिसणे म्हणजे हवामानाने रौद्र रूप घेणे किंवा विपरीत घटनांचा तो संकेत असल्याचे त्यांना वाटते. एव्हरेस्टवर तेनसिंग यांना काही ठसे मिळाले होते, त्यावेळी शेरपांना ते येतीचेच असल्याचे वाटत होते; पण जोवर शास्त्रीय पुरावा मिळत नाही तोवर त्याचे अस्तित्व मानण्यास त्यांचा नकार होता. 
येतीच्या संदर्भात ब्रिटिश लोकांची वर्णने 1832 सालापासून आहेत. उत्तर मोहिमेच्या ट्रेकमध्ये एका ब्रिटिश ट्रेकरला काही ठसे आढळून आले होते. तेव्हाही शेरपा यांनी ते येतीचेच असल्याचा निर्वाळा दिला होता. बाहेरून आलेल्या व्यक्तींनी स्थानिक लोकांना येतीच्या संदर्भात माहिती विचारली तर ‘येती’ आहेच, असे छातीठोकपणे ते  सांगत. शेरपा आणि स्थानिक लोकांवर दंतकथांचाही मोठा पगडा आहे. त्यामुळेही येती नाहीत, यावर विश्वास ठेवण्यावर त्यांचा नकार आहे.          
हिमालयात जाणार्‍या आमच्यासारख्या गिर्यारोहकांनाही येतीचे खूप आकर्षण वाटायचे. एव्हरेस्ट परिसरात तर येतीची ‘खोपडी’ ठेवलेली आहे. त्याचाही शास्त्रीयदृष्ट्या अभ्यास झाला; पण ही खोपडी नक्की कुणाची, याबाबत अनेक तर्कवितर्क अद्याप कायम आहेत. त्यामुळे येतीचे अस्तित्व सिद्ध होऊ शकले नाही. 
हिमालयात ज्यावेळी आम्ही गिर्यारोहणाला जात असू, तेव्हा आम्हालाही काही ठसे दिसत असत, पण आजवर कधीच ‘येती’सदृश कोणताच प्राणी आम्हाला तिथे दिसला नाही. काही प्राण्यांचे अस्तित्व जाणवायचे; पण त्यांचे दर्शन मात्र कधी घडले नाही. 
हिमालयात भटकंती करताना, अनेकदा कित्येक ठसे आम्हालाही दिसले, पण ते कुणाचे असावेत याचा काहीच अंदाज बांधणे शक्य नव्हते. मात्र हेही तितकेच खरे की, येतीच्या अस्तित्वाचे पुरावे म्हणून ज्या महाकाय ठशांचे वर्णन केले जाते, तसे भलेमोठ्ठे ठसे आम्हाला कधीही दिसले नाहीत. एव्हरेस्ट पर्वतावर येतीचा शोध घेण्यासाठी 1954 मध्ये ब्रिटिश आणि हिंदी गिर्यारोहकांची एक खास तुकडी गेली होती. मात्र या तुकडीलाही प्रत्यक्ष येती दिसला नाही. 
हिमालयात ‘यती’चे अस्तित्व आहे की नाही, याचा शोध कॅमेरा ट्रॅपिंगमधून घेतला तर यावर काहीतरी प्रकाश पडू शकेल. या भागांमध्ये हिमबिबळ्याचे अस्तित्व दिसून आले आहे, ब्राउन बेअर असल्याचेही उल्लेख आहेत. खरे तर हिमालयात ब्राउन बेअर आढळत नाहीत; पण येतीचे उल्लेख त्याच्याशी मिळतेजुळते आहेत. 
आर्मीला जे ठसे मिळाले, ते एकेरी रांगेत आहेत, ही लक्षात घेण्यासारखी बाब आहे; पण यावरून काही अंदाज बांधणे चुकीचे ठरू शकेल. उष्णतेमुळे ठसे रूंदावतात आणि सैल होतात. हळूहळू हिम वितळल्यामुळे पावलांचे ठसे मोठे होतात हे त्या ठशांमागील कदाचित सत्य असू शकते. उंचावर गेल्यानंतर ऑक्सिजनचे प्रमाण कमी व्हायला लागते. काहीसे अंधूक दिसायला सुरुवात होते आणि समोरून कुणी गेलेय असा भासही होऊ शकतो. येती ही काल्पनिक धारणादेखील असू शकते. मात्र त्याच्या मुळाशी जायला हवे. तोपर्यंत तरी त्याच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह कायमच राहील. दंतकथा आणि इतर ऐकीव गोष्टींमधून हा येती कायम डोके वर काढत राहील.

‘येती’ नव्हे, अस्वल!
भारतीय सैन्यदलाला नेपाळ-चीन सीमेवर मकालू बेस कॅम्पजवळ जे ठसे सापडले ते ‘येती’चे असल्याचा दावा केला जात होता. हे ठसे नक्की कुणाचे, याचा शोध घेण्यासाठी नेपाळ सरकारने तज्ज्ञांचे एक पथक त्या ठिकाणी धाडले. त्यांच्या म्हणण्यानुसार हे ठसे ‘येती’चे नसून ‘अस्वला’चे असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. 

‘मेत्री’ आणि ‘चत्री’
शेरपांच्या समजुतीप्रमाणे ‘येतीं’चे दोन प्रकार आहेत. एक ‘मेत्री’ म्हणजे नरभक्षक व दुसरा ‘चत्री’ म्हणजे पशुभक्षक. या दोन्ही येतींचे पाय मागील बाजूस वळलेले असतात, त्यातील ‘चत्री’ जातीचा येती अधिक मोठा, एखाद्या अस्वलासारखा दिसतो, असा दावा अनेक शेरपा करतात. प्रसिद्ध शास्त्रज्ञ ज्युलियन हक्सलेदेखील येती म्हणजे अस्वलासारखा प्राणी असल्याचे मानत; पण काहीजणांच्या मते येती हा मोठय़ा माकडासारखा दिसणारा पशू आहे.
(लेखिका ज्येष्ठ गिर्यारोहक आणि ‘गिरिप्रेमी’ संस्थेच्या संस्थापिका आहेत.) 
मुलाखत व शब्दांकन : नम्रता फडणीस

Web Title: Yeti - myths and reality!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.