टोमॅटो महाग का झाला? भाव वाढला पण शेतकऱ्यांना होईना फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2023 09:54 AM2023-07-16T09:54:00+5:302023-07-16T09:54:40+5:30

टोमॅटोचे उत्पादन कमी झाल्यामुळे काही दिवसांपासून किरकोळ बाजारात ताे 150 ते 200 रुपये किलो झाला आहे. वाढलेल्या भावाचा शेतकऱ्यांना मात्र फार विशेष फायदा होताना दिसत नाही. शेतकऱ्यांच्या टोमॅटोला किलोमागे सरासरी 80 रुपये इतकाच भाव मिळत आहे. 

Why did tomatoes become expensive? The price increased but the farmers benefited | टोमॅटो महाग का झाला? भाव वाढला पण शेतकऱ्यांना होईना फायदा

टोमॅटो महाग का झाला? भाव वाढला पण शेतकऱ्यांना होईना फायदा

googlenewsNext

योगेश बिडवई, 
मुख्य उपसंपादक 

यंदा पहिल्या हंगामात शेतकऱ्यांना टोमॅटोला किलोमागे केवळ ७ ते १० रुपये भाव मिळाला. दुसऱ्या हंगामात तर नीचांकी ५ रुपयांपर्यंत भाव होता. त्यामुळे टोमॅटो उत्पादकांसाठी तो आतबट्ट्याचाच खेळ झाला. अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकला. काहींनी शेतात गुरे सोडून दिले, त्याची छायाचित्रेही वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाली. मात्र शहरातील लोकांचे त्याकडे फारसे लक्ष गेले नाही. तोट्यात विकण्यापेक्षा नंतर अनेक शेतकऱ्यांनी प्लॉट तसेच सोडून दिले. मग काय, उत्पादन घसरले. त्यातच उशिराचा पाऊस, बदलते हवामान, वाढलेले तापमान याचाही देशभरातील उत्पादनाला फटका बसला आणि आता आठ-पंधरा दिवसांपासून भाव वाढले आहेत. मात्र शेतकऱ्यांकडून ८० रुपये किलोने घेतलेला टोमॅटो आपल्या घरापर्यंत येईपर्यंत मध्यस्थांच्या साखळीमुळे १५० ते २०० रुपये किलो होतात. मध्यस्थांची नफेखोरी महागाईला आमंत्रण देते. 

उत्पादन खर्च किती? 
एक किलो टोमॅटोचा उत्पादन खर्च सरासरी १३ रुपयांपर्यंत येतो. बाजार समितीत नेईपर्यंत हा खर्च १६ ते १७ रुपयांवर जातो. एकरी साधारण एक लाखापेक्षा जास्त खर्च येतो. उत्पादन कमी झाले तर खर्च वाढतो. 

शेतकऱ्यांना मोठा फटका 
शेतकऱ्यांनी यावर्षी मार्च महिन्यात सरासरी भाव ५-१० रुपये, एप्रिलमध्ये ५-१५ रुपये आणि मे महिन्यात तर केवळ २.५० ते ५ रुपये किलो दराने टोमॅटो विकले. त्यामुळे शेतकऱ्यांना किती फटका बसला असेल, याची कल्पना येते.  

मी दोन एकरावर टोमॅटो लागवड केली होती. मात्र मे व जूनच्या सुरुवातीला मला किलोमागे केवळ २ ते ४ रुपये भाव मिळाला. बाजारात नेण्याचा खर्चही वसूल होईना. त्यामुळे तो प्लॉट मी तसाच सोडून दिला. टोमॅटोचा शेतातच चिखल झाला. माझा दोन लाखांचा खर्च वाया गेला.  
- अमृत कापडणीस, 
टोमॅटो उत्पादक, सटाणा, नाशिक

कसे आहे गणित? 
राज्यात सातारा, जुन्नर आणि नाशिकमध्ये टोमॅटोचे चांगले उत्पादन होते. औरंगाबाद पट्ट्यातही आता टोमॅटो पीक घेतले जाते.  
सातारा, पुणे व अहमदनगर जिल्ह्यात एप्रिल ते ऑगस्टपर्यंत बाजारात टोमॅटो येतो. त्यानंतर नाशिकपासून इतर ठिकाणी आवक वाढते. 
राज्यनिहाय टोमॅटोच्या उत्पादनाचा कालावधी भिन्न आहे. टोमॅटो काढणीचा काळ डिसेंबर ते फेब्रुवारीदरम्यान असतो. जुलै-ऑगस्ट आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर या काळात टोमॅटोचे उत्पादन कमी असते. 
 

 

 

Web Title: Why did tomatoes become expensive? The price increased but the farmers benefited

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.