प्रेमाचे तीन चेहेरे

By admin | Published: May 30, 2015 02:40 PM2015-05-30T14:40:51+5:302015-05-30T14:40:51+5:30

प्रेम. एकच भावना, पण पडद्यावर दिसलेली या भावनेची अभिव्यक्ती किती वेगळी . आणि किती विचारात पाडणारी! या ‘प्रेमा’चा एक चेहेरा हिणकस, दुसरा विचारी आणि तिसरा जे हरवलं त्याच्या शोधाचा! - ‘कान’मध्ये भेटलेले हे तीन प्रेमरंग घेऊन मी परतलो आहे.

Three faces of love | प्रेमाचे तीन चेहेरे

प्रेमाचे तीन चेहेरे

Next
>- अशोक राणे
 
"तुला आवडली का ती फिल्म?’’
माझ्या शेजारी बसलेल्या एका फ्रेंच समीक्षकाला जेव्हा मी ‘मार्गारिता अँड ज्युलियन’ या फ्रेंच चित्रपटाबद्दल विचारलं तर त्यानं ताडकन मलाच हा प्रश्न विचारला.
‘‘मला आवडला, नावडला ते राहू दे. मला तुझं मत जाणून घ्यायची उत्सुकता आहे.’’ असं मी म्हणताच तो म्हणाला.
‘‘नाही मला अजिबात आवडली नाही.’’
पुढे आम्ही आणखी काही बोलणार तेवढय़ात चित्रपट सुरु झाला आणि अर्थात आमचं बोलणंही थांबलं. आदल्या दिवशीच आम्ही’ मार्गारिता अँड ज्युलियन’ पाहिला होता आणि त्या दोन दिवसात मी चार सहा जणांशी, जणींशी त्याविषयी बोललो होतो.  मुख्य स्पर्धा विभागात असलेल्या या चित्रपटात बहीण, भाऊ यांच्यातील शरीरसंबंध आणि त्यावरुन त्यांच्या कुटुंबात उठलेलं वादळ असा कथाभाग होता. तो अनेकांच्या पचनी पडला नाही.. अगदी फ्रेंचांच्याही!
सोळाव्या शतकात एका सरदाराच्या घरात घडलेल्या या घटनेचा ऐतिहासिक आधार असलेल्या या गोष्टीवर ज्याँ ग्रॉल्त या फ्रान्स्वा त्रुफो यांच्या पटकथाकाराने 1973 मध्ये पटकथा लिहिली होती . 1973 मध्येच जन्मलेल्या व्हेलेरी डोन्झने त्या पटकथेचा आधार घेऊन स्वतंत्रपणो पटकथा लिहिली आणि तिचं दिग्दर्शन केलं. लहानपणी आपल्या आपल्यातच वावरणा:या या भावंडांमध्ये एकमेकांविषयी कमालीची ओढ आहे. तरुणपणी त्या ओढीचं रुपांतर शारिरीक आकर्षणात  होतं आणि मग पुढचा सारा अटळ संघर्ष वगैरे वगैरे. महोत्सवाच्या कॅटलॉगमध्ये त्याचं जे कथासार दिलंय त्यात असं म्हटलंय की, नैतिकतेच्या पल्याड जाणारं या दोघांतलं प्रेम, अनावर शारीरिक ओढ आणि त्यासाठी निर्णायक क्षणाला जाण्याची असोशी हा या कथेचा गाभा आहे. असेल, अशी एखादी घटना कधी काळी किंवा आजच्या काळात घडलीही असेल. परंतु बहीण-भावात ही अशी वासना येते कशी याचा शोध घेण्याचा प्रय} झाला असता तर या चित्रपटामुळे हादरून जायचं काही कारण नव्हतं. मात्र तसं होत नाही. काही तरी प्रचंड धक्कादायक, सनसनाटी करावं असा हेतू असावा हे स्पष्टपणो जाणवतं..आणि तिथेच मग हा चित्रपट अनेक प्रश्न समोर उभे करतो. फ्रेंच प्रेक्षकांना, समीक्षकांना त्याबद्दल काय वाटलं ते म्हणूनच मला जाणून घ्यायची इच्छा होती. आवडला म्हणणारा सोडाच परंतु नीट चर्चा करावी, बोलावं असं एकालाही वाटलं नाही. उलट त्यांच्यात अस्वस्थता होती. समाज जे सहजी स्वीकारणार नाही किंबहुना हादरून जाईल ते कलाकृतीतून मांडतांना कलाकाराने जबाबदारी ओळखून वागायला हवं याची आवश्यकता या चित्रपटाने निश्चितच अधोरेखित केली. 
‘मॉन रॉय’ (इंग्लिश टायटल ‘माय किंग’) या दुस:या फ्रेंच चित्रपटाने मात्र सर्वार्थाने एक प्रगल्भ चित्रपट पाहिल्याचं समाधान दिलं. मेवेन या चाळीशीला आलेल्या दिग्दर्शिकेने आपल्या या चित्रपटातून नातेसंबंधातलं बाईचं पिचलेपण, तिची घुसमट, त्यातून तिचं बाहेर पडणं आणि नव्याने जगण्याची सुरुवात करणं हे सारं अतिशय बारकाईने आणि विलक्षण जाणतेपणाने आणलंय. 
आल्प्समध्ये स्किईंग करतांना जबर जखमी झालेली आणि अनेक ऑपरेशन्स करुन बरी होत आलेली टोनी फिजियोथेरपी सेंटरमध्ये उपचार करुन घेते आहे. या निमित्ताने तिला बराच काळ तिथे रहावं लागतं. हा सर्व काळ ती अधून मधून आपल्या आयुष्याकडे, विशेषत: वैवाहिक जीवनाकडे पाहते आणि तिला जाणवतं की आपला नवरा  पुरुषप्रधान व्यवस्थेचा अर्क होता तरी आपण का म्हणून हा नातेसंबंध इतका काळ टिकवला. बाईला एकटीने समाजात राहता येत नाही आणि म्हणून मग पुरुषाचा आधार वाटतो या समजुतीत आपण आपलं  व्यक्तीमत्व, अवघं स्वत्वच गमावून बसलो याची तिला जाणीव होते. ती हळूहळू भानावर येत जाते. दरम्यान सेंटरमधला स्टाफ आणि तिचे इतर सहचर त्यांच्याशी जुळून येणा:या निर्मळ, निरपेक्ष नात्यातून तिला नात्यांचा अर्थ उलगडायला लागतो. नाती असावीत पण ती जर एखाद्याला-एखादीला चिरडून टाकणार असतील तर ती निकालात काढली पाहिजे हे सार चित्रपटातून येतंच परंतु तिचं तिला येणारं भान हा कथाप्रवास विलक्षण आहे.  ‘मॉन रॉय’ मनात भरतो. कारण त्याचं तेच वेगळेपण!
‘व्हॅली ऑफ लव्ह’ या आणखी एका फ्रेंच चित्रपटात पती-पत्नी नातेसंबंधाचा एक अनोखा वेध घेण्यात आलाय.  
इझाबेल आणि एरार या फार पूर्वीच विभक्त झालेल्या आणि आता साठी ओलांडलेल्या पूर्वाश्रमीच्या जोडप्याला दोन स्वतंत्र पत्रं येतात. अमेरिकेत वास्तव्य असलेल्या त्यांच्या मुलाने हे पत्र त्यांना आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलंय त्यात त्याने दोघांना कॅलिफोर्नियातील डेथ व्हॅलीत यायचं निमंत्रण दिलंय. तो त्या दोघांना  तिथे एक दिवस ‘भेटणार’ आहे दूरदूर र्पयत निजर्न डोंगर असलेल्या उजाड प्रदेशात अंगाची लाहीलाही करणा:या उन्हातून एकत्र भटकावं लागतं. त्यातही येरार तिला सतत बजावतो आहे की आपण केवळ सातच दिवस राहणार. ती त्याला समजावण्याचा वगैरे प्रय} करते. एका मोठय़ा हॉटेलात  दोन स्वतंत्र खोल्यात राहणारे यथावकाश एकाच खोलीत येतात कारण दोघांच्याही तब्बती ढासळलेल्या आहेत. कोणीतरी सोबतीला हवंच आहे. इथे आल्यापासून रोज एकत्र ब्रेकफास्ट करणं, लंच-डिनर घेणं आणि एकत्रीतपणो मुलाने पत्रत नमुद केलेल्या ठिकाणाचा शोध घेणं या दरम्यान मुलाने आपल्याला हे असं का बोलावलं असावं याचा ते कधी स्वतंत्रपणो तर कधी एकत्रीतपणो शोध घेतात..कदाचित त्याच्या मनात असं तर नसावं की आपण इतक्या वर्षानी अशा अडनिड ठिकाणी भेटावं आणि आठवडाभर एकमेकांच्या सहवासात रहावं..असेल तसंही असेल किंवा नसेल.. त्याने काय साधणार आहे..आणि त्याचा आता उपयोग तरी काय.. किंवा मग असं तर नसावं की..तर्कामागून तर्क..हाती नेमकं काहीच लागू न देणारे.! शिवाय मुलाने आत्महत्या का केली असावी याचा आपापला शोध. त्याच्या पत्रत त्याच्या बॉयफ्रेंडचा उल्लेख आहे. त्याला एडस् तर झाला नसावा.? जीवाला घर लावणारी एक शंका..या दरम्यान स्वतंत्रपणो आणि एकत्रितपणोही पूर्वीच्या सहजीवनातले क्षण आठवणं, त्याच्या विखुरलेल्या खुणा शोधणं वगैरे चालत राहतं.. आणि एक दिवस डोंगराच्या एका घळीत त्यांचा मुलगा दिसतो. तो मागे राहिलेल्या इझाबेलला सांगत येतो. ती भावविवश होत मुलाला हाका मारीत त्या दिशेने जाते.
इझाबेल हूपर्ट आणि येरार देपाद्यरु या जागतिक ख्यातीच्या ज्येष्ठ फ्रेंच कलाकारांनी आपल्या अभिजात अभिनयाने या व्हॅली ऑफ लव्ह ला अक्षरश: चार चाँद लगाये है. सगळं कसं अंर्तमनात चाललेलं आणि काही शोधायचंय पण शोधायचंही नाही असा सारा हा कथाभाग या दोघांनी अप्रतिमपणो दाखवलाय. पूर्वीचा हँडसम येरार देपाद्यरू आता आडवातिडवा सुटलाय, पोटाचा नगारा झालाय. पण काही फरक पडलेला नाही. कॅलिफोर्नियात मैलोन मैल कुठे झाडं नाहीत, सावलीचा आधार नाही आणि वर रणरणतं ऊन यात या दोघांनी ज्या सहजतेने आपलं काम केलंय त्याला तोड नाही.
(समाप्त)
 
(कान महोत्सवासाठी उपस्थित असलेले लेखक ख्यातनाम चित्रपट समीक्षक आणि जगभरच्या चित्रपट-संस्कृतीचे अभ्यासक आहेत.)
 

Web Title: Three faces of love

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.