तनुश्री दत्ता वाद आणि सिनेमाचा कॉंन्ट्रॅक्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2018 06:10 AM2018-10-07T06:10:00+5:302018-10-07T06:10:00+5:30

कितीही प्रयत्न केला तरी सिनेमा निर्मितीचं काम 100 टक्के सिस्टीमच्या र्मयादेत राहून, सगळे नियम पाळून करता येत नाही. त्यामुळे कलाकाराने सिनेमा साइन करताना केलेला कोणताच करार त्याच्या/तिच्या हक्कांचं 100 टक्के संरक्षण करणारा होऊ शकत नाही. तनुश्री दत्ता यांच्यावर ओढवलेला प्रसंग आणि त्यातून उभ्या राहिलेल्या वादाचं मूळदेखील त्यावेळच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये छापलेल्या ओळींमध्ये दडलेलं असावं.

Tanushree Datta controversy and film contract | तनुश्री दत्ता वाद आणि सिनेमाचा कॉंन्ट्रॅक्ट

तनुश्री दत्ता वाद आणि सिनेमाचा कॉंन्ट्रॅक्ट

googlenewsNext

-योगेश गायकवाड

कितीही प्रयत्न केला तरी सिनेमा निर्मितीचं काम 100 टक्के सिस्टीमच्या मर्यादेत राहून, सगळे नियम पळून करता येत नाही. त्यामुळे अभिनेत्याने सिनेमा साइन करताना केलेला कोणताच करार त्याच्या/तिच्या हक्कांचं 100 टक्के  संरक्षण करणारा होऊ शकत नाही. कारण सगळ्या अटी-शर्ती डिफाईन करणं शक्यच होत नाही. तनुश्री दत्ता यांच्यावर ओढवलेला प्रसंग आणि त्यातून उभ्या राहिलेल्या  वादाचं मूळदेखील त्यांच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये छापलेल्या ओळींच्या मध्ये दडलेलं असावं.

दहा वर्षांपूर्वी हॉर्न ओके प्लीज सिनेमामध्ये एक आयटम सॉँग करण्यासाठी तनुश्री यांना आमंत्रित केलं गेलं. अशावेळी निर्माता आणि कलाकार यांच्यात जो लिखित करार केला जातो त्यात कोणत्या मुद्दय़ांचा समावेश असतो ते बघू, कारण साधारणपणे असाच काहीसा करार तनुश्रीसोबत केला गेला असणार. 

1. अभिनेत्रीला अमुक मिनिटांच्या एका आयटम सॉँगच्या चित्रीकरणात आयटम गर्ल/अभिनेत्नी म्हणून अमुक एक दिवस द्यावे लागतील. त्या कामाचे त्यांना अमुक दिवसांच्या क्रे डिटने तमुक पैसे मिळतील. दिवसभरात किती तास शूटिंग चालेल, दांडी मारली, आजारी पडली तर काय? असे सर्वसाधारण मुद्दे निर्मात्याच्या बाजूने असतात.

2. तर कलाकारांच्या बाजूने, चित्रीकरणाचे दिवस वाढले तर काय? गाण्यात काही जिवावर बेतणारे स्टण्टस आहेत का? त्यापैकी कोणते स्टण्ट कलाकार स्वत: करणार आणि कुठे डमी वापरणार? अभिनेत्रीने घालावयाचे कपडे साधारण कसे असतील? कपड्यांविषयीच्या या मुद्दय़ात आपल्याला किती एक्स्पोज करावं लागेल याचा अंदाज अभिनेत्रीला येतो.

3. अभिनेत्रीच्या बाजूने डील करणारी एखादी व्यावसायिक एजन्सी किंवा मॅनेजर असेल तर कॉन्ट्रॅक्ट बारकाईने लिहिलं जातं. म्हणजे बेड सीन, किसिंग सीन करणार की नाही याचे तपशीलपण आधी ठरवून तसा उल्लेख करारामध्ये केला जातो. पण नवीन कलाकारांना इतकं  काटेकोर राहणं परवडत नाही. 

4. अर्थात, कितीही बारकाईने कॉन्ट्रॅक्ट तयार केलं तरीही निर्मात्याच्या बाजूने शेवटी एक मुद्दा असतोच, तो म्हणजे, ‘चित्रपटाच्या निर्मितीशी संबंधित सर्व क्रि एटिव्ह निर्णय घेण्याचा, बदलण्याचा अंतिम अधिकार हा दिग्दर्शक आणि निर्मिती संस्थेचा असेल.’ 
- आणि या कलमाच्या आड लपत निर्माता/दिग्दर्शक मग पुढे मनमानी करतात.

5.  विशेषत: महिला कलाकारांच्या बाबतीत करारामध्ये किंवा तोंडी बोलूनसुद्धा अशा किती गोष्टी तुम्ही आधी ‘डिफाईन’ करू शकता? चुंबन दृश्य चित्रित करायला होकार दिला तरी ते करते वेळी समोरच्या पुरुष कलाकाराचे हात कुठे असतील? साइड डान्सर्स आयटम गर्लला खांद्यावर उचलून घेतील तेव्हा ते कुठे आणि कसा स्पर्श करतील? गालावरून हात फिरवणं हे इण्टीमेट अँक्शनमध्ये मोडेल की  कॅज्युअल डान्स स्टेपमध्ये? अशा असंख्य गोष्टी असतात ज्या कॉन्ट्रॅक्टमध्ये डिफाईन करणं तर दूरच; पण बोलतासुद्धा येत नाहीत. आणि अशा या लिखित किंवा नैतिक कराराचं उल्लंघन झाल्याचं सिद्ध कसं करायचं?

6. शूट करताना पुरूष कलाकाराने महिला कलाकाराला कमरेभोवती हात घालून जवळ ओढायचं आणि दोघांनी एकमेकांच्या नजरेत नजर घालून समोरासमोर अगदी जवळ येऊन उभं राहायचं, असा जर शॉट नृत्य दिग्दर्शकाने कोरिओग्राफ केला असेल तर कमरेभोवतीचा तो स्पर्श प्रोफेशनल कमिटमेण्ट म्हणून केलेला आहे की चान्स मारण्यासाठी केलेला आहे, हे ठरवायचं कसं? 

7. आयटम गर्ल किंवा हिरोईनला ओढून अगदी जवळ घ्यायचं. अगदी म्हणजे किती हे कोण ठरवणार? त्याने ओढलं जवळ आणि त्यांचा परस्परांना निकट स्पर्श झाला. एकदा नाही तर रिहर्सलच्या वेळी झाला, टेक्निकल रिहर्सलच्या वेळी झाला आणि ऐनवेळी दिग्दर्शकाने पाच- सहा रिटेक करायला सांगितल्याने त्या दरम्यानही झाला तर मग अशावेळी याला योगायोग म्हणायचा, अनवधानाने घडलेली कृती म्हणायची, अपघात म्हणायचा, सिनेमात काम करायचं (तेही आयटम सॉँग करायचं) म्हटल्यावर  इतना तो चलता है म्हणायचं, जनरल चान्स मारणं म्हणायचं की लैंगिक छळ म्हणायचं ??? 

- तर हे ठरविण्यासाठी कोणतेही मीटर अस्तित्वात नसल्याने हे फक्त त्या महिलेच्या सिक्स्थ सेन्सवरूनच ठरवता येतं. त्या अभिनेत्रीला तो स्पर्श जर नकोसा वाटला तर तो स्पर्श सर्वार्थाने नकोसा याच वर्गात मोडला पाहिजे.

(लेखक फिल्ममेकर, दिग्दर्शक आहेत.)

yogmh15@gmail.com 

Web Title: Tanushree Datta controversy and film contract

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.