तरुणांचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 03:27 PM2019-03-16T15:27:08+5:302019-03-16T16:35:44+5:30

आगामी निवडणुकीत आपला पक्ष हाच तरुणांचा पक्ष आहे, अशी प्रतिमा उभी करणे भाजपा आणि काँग्रेस या दोघांनाही जरुरीचे वाटत असणार. नव्या मतदारांमधील आपली आघाडी टिकवण्यासाठी तरुणांची नाराजी दूर करण्याचे आव्हान भाजपापुढे असेल, तर नाराज तरुणांनी घरी न बसता भाजपाच्या विरोधात मतदान करावे यासाठी विरोधी पक्षांना - खासकरून कॉँग्रेस पक्षाला - आटापिटा करावा लागेल.

Social and political scientist Suhas Palshikar explains the role of young voters in coming General Elections.. | तरुणांचे काय?

तरुणांचे काय?

Next
ठळक मुद्देयेत्या लोकसभा निवडणुकीत तरुण मतदारांचा कल कोणाकडे असेल? बेरोजगारीवर उत्तर न शोधू शकलेल्या भाजपाबद्दल नाराजी दिसेल? मोदींचे आकर्षण कायम असेल? कॉँग्रेसचा पर्याय निवडावासा वाटेल? की मतदानात स्वारस्यच नसेल?

- सुहास पळशीकर

राजीव गांधींच्या पंतप्रधानपदाच्या काळात मतदानासाठीचे किमान वय २१ वरून १८वर आणले गेले. तेव्हापासून हे नवे आणि अगदी तरुण मतदार नेमके कसे मतदान करतात हा कुतूहलाचा विषय राहिला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत तरुणांचा भाजपाला मिळालेला पाठिंबा हा एक चर्चेचा विषय ठरला होता. त्याला अनुसरून आता यावेळीदेखील युवकांच्या पाठिंब्यावर भाजपाची भिस्त राहील, असे बोलले जाते आहे.
मुळात दर पाच वर्षांनी अनेक नव्या मतदारांची मतदार यादीत भर पडते आणि त्यात नव्याने १८ वर्षे वय पूर्ण केलेले मतदार मोठ्या संख्येने असतात ही काही फार मोठी बातमी नाही. उलट सगळे नवयुवक मतदार यादीत नोंदवले जात नाहीत ही खरी बातमी असायला पाहिजे. पण पूर्वीच्या तुलनेत आता अलीकडे झटपट आकडेवारी उपलब्ध होते त्यामुळे निवडणुका आल्या की इतके लाख नवे मतदार नोंदवले गेले आणि अमुक इतके लाख नवे मतदार आहेत या बाबींची चर्चा बहरात येते.
विशेषत: २०१४ मध्ये सगळे काही मोदींच्या मुळे घडले असे मानले गेले आणि त्यामुळे मग तरुणांनी जास्त प्रमाणात भाजपाला मते दिली तेही मोदी फॅक्टरमुळे झाले, असे चित्र रंगवण्यात आले. मग त्याला धरून आता यावेळीही मोदी आहेत म्हणून तरुण भाजपाला मोठ्या प्रमाणावर मते देणार असे काल्पनिक पतंग उडवले जायला लागले आहेत.

वस्तुस्थिती काय आहे?
हे तर खरेच आहे की, २०१४ मध्ये सर्वसाधारण किंवा एकूण मतदारांच्यापेक्षा तरुणांमध्ये भाजपाला मते देणारे जास्त होते. त्याचा फायदा भाजपाला - विशेषकरून जिथे अगदी थोड्या मताने पक्ष निवडून आला तिथे - झाला असणार. मात्र गेल्या खेपेस खूप ठिकाणी भाजपाचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते हे लक्षात ठेवायला हवे. शिवाय, खरा मुद्दा असा आहे की तरुणांनी गेल्याच खेपेस प्रथम भाजपाला जास्तीचे मतदान केले का?
१९९९ पासून सातत्याने एकूण मतदारांमध्ये भाजपाला जेवढी मते मिळाली त्यापेक्षा तरुणांमध्ये जास्त मिळाली आहेत. सोबतच्या तक्त्यात दोन्ही पक्षांना प्रौढ (२५ पेक्षा अधिक वयाचे) आणि तरुण (१८ ते २५) मतदारांमध्ये मिळालेल्या पाठिंब्यात किती फरक आहे ते दाखवले आहे. त्यात तीन गोष्टी स्पष्ट होतात. एक, भाजपाला गेल्या चारही निवडणुकांमध्ये तरुणांमध्ये जास्त मते मिळाली आहेत, दोन, तरुण मतदारांमधली काँग्रेसची कमी लोकप्रियता हीदेखील गेली दोन दशके सातत्याने आहे - तिच्यात मोठी वाढ मात्र झालेली नाही. आणि तीन, २०१४मध्ये भाजपाला तरुणांमध्ये सगळ्यात जास्त आघाडी मिळाली. त्यामुळे या वेळेस आपली आघाडी टिकवणे/वाढवणे हे भाजपाच्या पुढचे आव्हान आहे तर आपली पिछाडी कमी करणे हे काँग्रेसपुढचे.
अर्थात, सातत्याने जवळपास ४५ टक्के किंवा त्याहून जास्त तरुण या दोन्ही पक्षांना मते देत नाहीत. अगदी २०१४ मध्येदेखील ३४ टक्के तरुणांनी भाजपाला आणि १९ टक्के तरुणांनी काँग्रेसला मत दिले होते. त्याच वेळी प्रौढ मतदारांमध्येदेखील भाजपा आणि काँग्रेस दोघांना मिळून एकूण ५० टक्के मतदारांची पसंती होती. हे लक्षात घेतले तर एकूण सर्वसाधारण मतदार किंवा प्रौढ मतदार ज्या प्रकारे मतदान करतात त्याच प्रकारे - पण थोड्याबहुत फरकाने तरुणदेखील मतदान करतात हे स्पष्ट होते.

२०१४मध्ये सर्वसाधारण सर्वच मतदारांमध्ये मोदींविषयी आकर्षण होते आणि त्यांना व्यक्तीश: पाठिंबा देणाऱ्यांचे प्रमाण मोठे होते, त्याचेच प्रतिबिंब तरुण मतदारांमध्ये पडलेले दिसते.. खासकरून पहिल्यांदा मतदान करणारे मतदार (१८ ते २२ वयोगटातले) आणखी मोठ्या प्रमाणावर मोदींना अनुकूल होते असेही त्यावेळी दिसले. या गटातील तब्बल ३६ टक्के मतदारांनी भाजपाला मते दिली तर फक्त १७ टक्क्यांनी कॉँग्रेसला. मात्र अशा पहिल्यांदाच मत देणाऱ्यांचे एकूण प्रमाण जेमतेम आठ टक्के एवढेच असल्यामुळे त्यांचा निवडणुकीच्या निकालावर थेट परिणाम किती झाला हे सांगणे अवघड आहे.
गेल्या पंचवीस वर्षांहून अधिक काळात काँग्रेस हा उताराला लागलेला पक्ष राहिला आहे आणि त्याला आव्हान देणारा मुख्य पक्ष नेहेमीच भाजपा राहिलेला आहे हे लक्षात घेतले म्हणजे तरुणांमध्ये काँग्रेस मागे का आणि भाजपा पुढे का याचे उत्तर मिळते.

आता येत्या निवडणुकीत काय होईल हा खरा प्रश्न आहे.
गेल्या वेळी मोदी हे राष्ट्रीय पातळीवर नव्याने उदयाला आलेले नेतृत्व होते, उलट आता त्यांचे नेतृत्व हे प्रस्थापित नेतृत्व आहे आणि ते सरकार चालवीत असल्यामुळे सरकारच्या कामगिरीबद्दलचे मत आणि मोदींबद्दलचे मत यांची सरमिसळ होऊ शकते - त्याचा फायदा होऊन तरुणवर्ग भाजपाला मते देणार की सरकारच्या सुमार कामगिरीमुळे मोदी आवडत असले तरी भाजपाला मत देताना हात आखडता घेणार हा मुद्दा राहील. मात्र अजूनही धडाडीचे नेते म्हणून एकूण जनतेत आणि त्याहीपेक्षा तरुणांमध्ये मोदींचे स्थान पुष्कळसे अबाधित आहे हे खरेच आहे. ती लोकप्रियता मतांमध्ये परावर्तित होईल का हा मात्र प्रश्न आहे.
गेल्या दोनेक वर्षांत नोकरीचा आणि उपजीविकेचा प्रश्न अधिकाधिक गंभीर बनतो आहे; मनासारख्या नोकºया न मिळालेले सुशिक्षित युवक अस्वस्थ आहेत आणि ते वेगवेगळ्या आंदोलनांमध्ये भाग घेत आहेत. छोट्या शहरांमध्ये आणि ग्रामीण भागात राहणारे तरुण याहून मुश्कील स्थितीमध्ये आहेत. हे सगळे पाहता यावेळी सरसकटपणे तरुण मतदार मोदींच्या मागे जातील का हा प्रश्न शिल्लक राहतो. शिवाय भाजपाला ज्या तरुणांचा नेहेमीच पाठिंबा मिळालेला आहे ते शहरातले, जास्त शिकलेले तरुण पुरुष राहिले आहेत, ग्रामीण, अर्धशिक्षित तरुण आणि तरुण स्रिया यांना भाजपाचे आकर्षण कमीच राहिले आहे.
याचा अर्थ अचानक तरुण मतदार भाजपाच्या विरोधी मतदान करतील अशातला भाग नाही. ज्या राज्यांमध्ये भाजपाला प्रबळ पर्याय आहे तिथे तरुण मतदारांचा एक मोठा हिस्सा भाजपाकडून दुसºया पक्षाकडे जाईलही; पण तरुणांची मुख्य प्रतिक्रिया राहील ती म्हणजे मतदानात स्वारस्य न घेता मतदानापासून दूर राहणे. २०१४चा अपवाद सोडला तर बहुतेक वेळा तरुणांमध्ये मतदानाचे प्रमाण कमी राहिलेले आहे.
सर्वेक्षणातून दिसलेली गोष्ट म्हणजे १९९९ पासून दर निवडणुकीत सरासरी मतदानापेक्षा तरुणांमध्ये ३ ते ६ टक्के कमी मतदान होते. याही वेळी, सरासरी मतदानापेक्षा तरुणांमध्ये दोनेक टक्के कमी मतदान झाले तर त्याचा प्रतिकूल परिणाम अर्थातच भाजपावर होईल.
मग तरीही तरुणांच्या मताची आणि त्यांच्या राजकीय भूमिकेची एवढी चर्चा का केली जाते?
एक तर तरुणांची मते मिळवणारा पक्ष दीर्घकाळ म्हणजे ते तरुण प्रौढ झाल्यानंतरदेखील त्यांचा पाठिंबा मिळवण्याची अपेक्षा करू शकतो. म्हणजेच लांब पल्ल्याच्या राजकारणात आपल्या पक्षाचे पक्के पाठीराखे साकार करण्यासाठी तरुणांचा आज पाठिंबा मिळवणे कोणत्याही पक्षासाठी महत्त्वाचे असते.
दुसरे म्हणजे तरुण मतदार हा नुसता मतदार नाही तर कार्यकर्ता बनू शकतो. घरोघरी प्रचाराला जाणे, बूथवर काम करणे, अशा कामांसाठी उत्साही तरुण जास्त कामी येतात. त्यामुळे ज्या पक्षाला तरुणांचा जास्त पाठिंबा मिळतो त्यालाच कार्यकर्त्यांची फौज उभी करणेदेखील सोपे जाते.
त्यामुळेच, आगामी निवडणुकीत आपला पक्ष हाच तरुणांचा पक्ष आहे अशी प्रतिमा उभी करणे भाजपा आणि काँग्रेस या दोघांनाही जरुरीचे वाटत असणार. नव्या मतदारांमधील आपली आघाडी टिकवण्यासाठी तरुणांची नाराजी दूर करण्याचे आव्हान भाजपापुढे असेल तर नाराज तरुणांनी घरी न बसता भाजपाच्या विरोधात मतदान करावे यासाठी विरोधी पक्षांना - खासकरून कॉँग्रेस पक्षाला - आटापिटा करावा लागेल आणि म्हणूनच बहुधा सगळे जण तरुणांची एवढी चर्चा करताना दिसतात.
............................
(लेखक राज्यशास्त्राचे निवृत्त प्राध्यापक असून, लोकनीती अभ्यास गटाचे सहसंचालक आणि स्टडीज इन इंडियन पॉलिटिक्स या नियतकालिकाचे मुख्य संपादक आहेत.)

suhaspalshikar@gmail.com

Web Title: Social and political scientist Suhas Palshikar explains the role of young voters in coming General Elections..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.