सत्तर वर्षांनंतरचं दुसरं स्वातंत्र्य

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2017 04:09 PM2017-08-12T16:09:48+5:302017-08-13T03:08:06+5:30

पानी फाउंडेशन आणि आमीर खान यांनी शोधलेल्या दुस-या वाटेचा दिलासा!

Second freedom of seventy years | सत्तर वर्षांनंतरचं दुसरं स्वातंत्र्य

सत्तर वर्षांनंतरचं दुसरं स्वातंत्र्य

googlenewsNext

- अपर्णा वेलणकर

‘इस कामका केंद्र पैसा नही, लोग होंगे. दया नही स्वाभिमान होगा. कृपा नही कर्म होगा. जो पैसा लगेगा, आपका लगेगा. पसीना बहेगा, आपका बहेगा. वक्त आप देंगे. दिमाग आपका लगेगा. ये काम हमारा नही, आपका होगा’ - गावशिवारातल्या माणसांना हे असं स्वच्छ सांगून आमीर खान या माणसाने दोन वर्षांपूर्वी पहिली कुदळ उचलली. कारण गावातल्या लोकांवर विश्वास टाकण्याची दानत आणि कृतीचा आराखडा या दोन्ही गोष्टी पानी फाउंडेशनकडे होत्या. आज महाराष्ट्रातल्या तब्बल १३२१ गावांनी आपल्या दुष्काळी शिवारात शब्दश: लाथा घालून आपलं पाणी आपण कमावलं आहे.


महाराष्ट्राच्या कानाकोप-यातल्या कोण्या एका गावात एक चढाओढीची स्पर्धा चालू आहे. जमलेल्या गावक-यांमधून एकूण तीन गट केले आहेत. एक वय झालेल्यांचा- ‘आजोबा’ गट. एक मधल्या कर्त्या पिढीचा- ‘मुलगा’ गट आणि एक अजून शाळा-कॉलेजात शिकणा-यांचा- ‘नातू’ गट!
स्पर्धेचा चेव चढून भोवतीनं उभं कोंडाळं. मध्ये एका मोठ्या घमेल्यात काठोकाठ पाणी भरलंय. आणि तिन्ही गटातल्या प्रत्येकाच्या तोंडात प्लॅस्टिकच्या बारीक नळ्या दिल्यात; कोल्ड्रिंक प्यायच्या स्ट्रॉ! स्पर्धा अशी की ठरलेल्या वेळात एकेका गटाने पुढे यायचं आणि त्या घमेल्याभोवती उभं राहून स्ट्रॉने जोरजोराने पाणी ओढून प्लॅस्टिकच्या बाटल्यांमध्ये भरायचं. जो कमीत कमी वेळात जास्तीत जास्त पाणी ओढून काढेल, तो जिंकला!
- आजोबा गट येतो. भसाभस पाणी ओढतो. टाळ्या, शिट्ट्यांचा कल्लोळ उठतो. लोकांना चेव चढलाय. वेळ संपून आजोबा लोक बाजूला जाईस्तो घमेलं अर्धं होतं. मग मुलगे येतात. त्यांची ताकद मोठी. पाणी ओढून काढायचा दमसास मोठा. मध्ये मध्ये कुणीतरी थोडंसं पाणी घमेल्यात आणून ओततो आहे, पण ते थोडंच!
चढाओढ लावून ‘मुलगे’ पाणी उपसतात. त्यांची वेळ संपेस्तो घमेलंही संपून जातं. ‘नातू’ स्पर्धेला येईतो घमेल्यात पाण्याचा टिपूस नाही.
जो तो चरकतो... एव्हाना कल्लोळ थांबलेला. कुणी कुणाशी बोलेनासं होतं. सगळ्यांच्या लक्षात आलेलं असतं,
हा कुठला खेळ? हे तर आपल्या गावाचं, आपल्या आयुष्याचं चित्र!
आपण असेच चढाओढीने पाणी उपसत राहिलो, तर आपली पोरं जगायला येतील, तेव्हा त्यांच्यासाठी विहिरी-तळ्यांच्या कुशीत, जमिनीच्या पोटात पाण्याचा टिपूस उरणार नाही. कारण गाव दुष्काळी. दरवर्षीचा पाऊस आला-आला, नाही-नाही असा. म्हणजे घमेल्यात पाणी पडतं, ते थोडंच. आपण उपसतो ते मायंदाळ! हे असं कसं चालंल? आपल्याला आपल्या मायबापांनी ठेवलं, आपण आपल्या पोरा-नातवंडांसाठी नाही ठेवलं तर कसं चालंल? पाप ते!!!
- स्पर्धा घेणारे लोक चतुर आहेत. त्यांनी न सांगताच लोकांना कळतं, की कोनीबी जितला, तरी गावाची हार ही!
आता काय करावं?
स्पर्धा घेणारे गणित घालून हिशेब करूनच आलेत. ते सांगतात, हे बघा, किती कमी म्हटला पाऊस, तरी अगदी दुष्काळाच्या वर्षातही हे एवढे एवढे लाख लिटर पाणी पडतंच तुमच्या गावात. पण ते सगळं वाहून नाही का जात? जमिनीत मुरतं कुठं? डोंगरावरून धावणारं पाणी खाली शिवारात थांबलं तर पायजे! त्याशिवाय कसं जमिनीत मुरल ते? असंच होत राह्यलं तर घमेलं रिकामंच नाही का होणार?
मग त्यासाठी काय करावं?
- स्पर्धा घेणारे सांगतात, त्यासाठी गावानं काम करावं. बांध घालावेत, नदी- नाले खोल करावेत. हे एक साधं शास्त्र आहे. पण ते सोपं आहे. ते समजायला इंजिनियरच पायजे असं नाही. पोपटरावांचं हिवरेबाजार नाही का? - त्यांच्यासारखी अनेक गावं ही अशी कामं करून करूनच तर पाणीदार झालीत. त्यांच्या वाटेला दुष्काळ फिरकल्याचं ऐकलंय का कधी? मग जे त्यांच्या गावात होतं, ते तुमच्या गावात का होऊ नये?
सोपं आहे. पण करावं लागेल. पाण्यासाठी घाम गाळावा लागेल.
- गावातले म्हातारे-कोतारे, तरणे-तरण्या अगदी मुलंसुद्धा कुदळफावडी हातात घेऊन शिवारात निघतात. म्हणतात, आपण एकत्र येऊ, आपल्या गावात पडणारा पाऊस आपण अडवू, जमिनीत जिरवू. पाणी धावत असल तर त्याला चालायला लावू, चालतं पाणी वाटेत थांबवू, थांबलं की त्याला जमिनीत जिरवू... मग आटलेल्या विहिरींना पान्हा फुटल. दुष्काळ हटल!
पण हे कसं करावं? बंधारे कुठं, कसे घालावे? चर कुठं कसे खोदावे? सीसीटी म्हणजे काय अस्तंय? कंपार्टमेंट-कंटूर बंडिंग कसं करत्यात? त्याची आखनी कोन करनार? मापंबिपं कोन घेनार? गावातल्या लोकान्ला हे कस्काय जमावं?
- तर भल्तंच होतं. स्पर्धा घेणारे लोक सांगतात, आम्ही शिकवतो तुम्हाला. शिकलात की जमल. मग शहरातून आलेली ती माणसं गावातल्याच काहींना सोबतीला घेऊन नाचून, गाऊन, गप्पा मारून, गोष्टी सांगत सांगत गावकºयांच्या मनात शिरू लागतात. अवघड गोष्टी चुटकीसरशी सोप्या होत जातात. गावातलेच प्रशिक्षक मग अख्ख्या गावाला शिकवतात. गावकºयांना वाटतं, आयला, इत्कं सोपं हाय व्हय हे? जमल की!
हा सगळा प्लॅन एका सुपरहिरोने ठरवला आहे, हे गावकºयांना माहिती असतं. आता तो हिरो एवढा पैसेवाला, एकेका पिक्चरला कोटीकोटीच्या खाली बोलत नाही. द्यावे का नाही त्यानं एकेका गावाला दहा-बारा लाख? आणावी पोकलेनची धुडं आणि काढावं की खणून शिवार!! त्याला काय लाग्तंय? पण तो हिरो आणि त्याची माण्सं मोठी तत्त्वाची पक्की! लोकांना तोंडावर सांगतात, आम्ही तुम्हाला ज्ञान देऊ, पैसे नाही! काम गावाने करायचं. घाम गावाने गाळायचा.. पाणी गावाला मिळेल.
- मग नवी स्पर्धा लागते. जे गाव जास्तीत जास्त पाणी जमिनीत मुरवणार, ते जिंकणार!
गावं भिडतात. भांडणं सोडून, जुनी वैरं विसरून, राजकारण बाजूला ठेवून, बाई-बाप्याचा भेद मिटवून, दलिताचा खांदा बामणाच्या-मराठ्याच्या खांद्याला भिडवून, हिंदू-मुसलमानाची कटकट गाडून गावंच्या गावं कामाला भिडतात. कुणी मुलीचं लग्न पुढे ढकलतं, कुणी घरातलं मरण उरकून लगोलग कामाला येतं, कुणी म्हातारे काम झेपत नाय म्हणून पाचशे रुपये पेन्शनीतले चाळीस-पन्नास खर्चाला देतात, बायका भाकरीच्या चळती भाजतात, सीमेवरचे जवान रजा टाकून कुदळ-फावडी उचलायला गावात येतात... एवढंच कशाला, तालुक्याला लाल दिव्याचा रुबाब करणारे सरकारी भाऊसायेब गावापुढे नरमतात. म्हणतात, तुमी येवढं करताय, काय मदत हवी बोला! जिल्हाधिकारी महोदय गावात येतात, ते गावाच्या नावाने जलयुक्त शिवारातल्या निधीचा चेक घेऊनच! म्हणतात, सरकार आहे तुमच्या बाजूने, आता मागं हटू नका!
- हे मोठं आक्रीतच!
मग तो हिरो पण येतो बायकोला घेऊन. दोघं गावची भाजीभाकरी खातात, उन्हात छत्री न घेता फिरतात, मातीत राबतात, शिवारात बसून गप्पा करतात. एका गावातलं शेंबडं पोर त्या हिरोला रुबाबात सांगतं,
तुमी तो ‘तारे जमीन पर’ पिच्चर काडला का नाय? आता आमी ‘पानी जमीन पर’ काडनार हाय!!
एकच धूम उडून जाते. स्पर्धा संपल्यावर विजय कुणाचा ते जाहीर होतं. बक्षिसं मिळतात. पण गंंमत म्हणजे हरत कुणीच नाही. हरतो तो दुष्काळ!
गावागावात पाणी अडतं. साठतं. पाऊस तेवढाच पडतो, पण गावची तळी-विहिरी सगळ्यांच्या पोटात पाणी असतं ना मुरलेलं!!!
दरवर्षीच्या उन्हाळ्यात सरकारी टॅँकरवर जगणारी गावं म्हणतात, आता यंदा आमीच आजूबाजूच्या गावांना पाणी देऊ! गावागावात एकच ऐकायला येऊ लागतं.. अहो, एक बादली भरायची तर आधी पन्नास-पंचावन्न हॅण्डपंप मारायला लागायचे, आता पाच पंप मारले, की भरलीच बादली. पयला मारला की पानी!!!
हे लई जंक्शन काम गेली दोन वर्षं सातत्याने, चिकाटीने सुरू आहे.
२०१६ आणि २०१७ च्या उन्हाळ्यातले प्रत्येकी पंचेचाळीस दिवस असे एकूण नव्वद दिवस हे असं झपाटल्यासारखं काम करून महाराष्ट्रातल्या 1321 गावांनी मिळून त्यांच्या भरड-दुष्काळी जमिनीच्या पोटात तब्बल ९,६२९ कोटी लिटर्स इतक्या पाण्याची साठवणक्षमता तयार केली आहे.
म्हणजे मोजा किती रुपयाचे किती टॅँकर!
- पण पाण्याचं मोल कधी करतात का?
आणि त्यातून गावातल्यांना पटलेली एकजुटीची ताकद, त्यांना मिळालेला आत्मविश्वास, त्यांनी कमावलेलं ज्ञान, गावच्या मातीत रुजलेल्या शहाणपणाचं जुगाड शहरी ज्ञानाशी जमवण्याची तरकीब... या सगळ्याचं गणित घालत गेलं, तर गावकºयांच्या भाषेत सांगायचं म्हणजे, लय मोट्टी व्हईल की ही बेरीज!
***
हे सगळं स्क्रीप्ट एका सुपरहिरोने लिहिलंय.
त्यासाठी त्याने तज्ज्ञ माणसं जमवली, त्यांच्यावर विश्वास टाकला, गाव-शिवारात जाऊन नवं शहाणपण शिकायला वेळ काढला, प्रश्न समजावून घेतला, त्यावर उत्तर काढायची चोख व्यवस्था उभी केली, आपली ‘ब्रॅण्ड इमेज’ आणि त्याभोवतीची विश्वासार्हता वापरून बड्या उद्योगपतींकडून निधी, शासनाकडून सहकार्य, इतर सेलिब्रिटीजकडून सहभाग, माध्यमांकडून ‘लक्ष’ मिळवलं. शिवाय स्वत: घाम गाळून कामही केलं.
- पण ही कोण्या सिनेमाची गोष्ट नाही.
आमीर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांनी स्थापन केलेल्या ‘पानी फाउंडेशन’ या संस्थेच्या वतीने गेल्या दोन उन्हाळ्यांमध्ये महाराष्ट्रात प्रत्यक्ष पार पडलेल्या कामाचा हा - अतिसंक्षिप्त असा - लेखाजोखा आहे. कलावंत म्हणून विचारी आणि प्रयोगशील असलेल्या आमीरची ‘सुपरस्टार’ ओळख देशाला नवी नाही. पण समाजाला भेडसावणाºया समकालीन समस्या-प्रश्नांचा खोलात शिरून उलगडा करणारा त्याचा प्रवास सुरू झाला तो ‘सत्यमेव जयते’ या गाजलेल्या टीव्ही-शो पासून! त्या-त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांना सन्मानाने निमंत्रित करणं, त्यांच्या पुढ्यात बसून विनम्र औत्सुक्याने प्रश्न समजावून घेणं, उत्तराच्या दिशा शोधणं, ही उत्तरं कृतीत उतरवणारी खटपटी माणसं शोधून त्यांचं काम पुढे आणणं हे सगळं ‘सत्यमेव जयते’साठी करता करता आमीरला दिशा सापडत गेली असावी.
कारण २०१६ च्या दुष्काळात जेव्हा रेल्वेच्या वाघिणींमधून पाणी पोचवण्याची वेळ आली, तेव्हा अस्वस्थ झालेल्या आमीरने आपल्या टीमसह शोधाशोध सुरू केली. पाणी जातं कुठे? पडतं ते कितीही कमी असलं तरी पोटापुरेसं हमखास असतं, तर मग ते मागे का उरत नाही? हिवरेबाजारसारखी गावं पाणलोटाची कामं करून ‘पाणीदार’ होतात, म्हणजे याचं तंत्र आहे. मग दुष्काळात होरपळणारी इतर गावं ते का वापरत नाहीत?
‘जो एक जगह हो सकता है, वो सब जगह क्यूं नही? ऐसी क्या चीज है, जो रोकती है?.. ऐसा क्या कर सकते है जिससे लोगोंको लौ मिले, आग मिले...’ - एवढीच सुरुवात होती, असं आमीर सांगतो.
पुढे सत्यजित भटकळ यांच्या नेतृत्वाखाली पानी फाउंडेशनने ‘पाण्यासाठी ठिणगी पेटवणारं’ एक आंदोलन अत्यंत अकटोविकटीच्या शिस्तीने - आणि मुख्य म्हणजे कसलीही घोषणाबाजी न करता शांत संयमाने - उभं केलं. त्याची रीत शोधली. त्यासाठी व्यवस्था उभारल्या. आमीर खान नामक जादूचा करिष्मा वापरून लोकांचा उत्साह पेटवणं शक्य आहे, पण त्या आगीला दिशा द्यायची तर प्रशिक्षणाची चोख व्यवस्था उभारावी लागेल, हे गमक सापडल्यावर त्यासाठी जिवाचं रान केलं. गावातूनच प्रशिक्षक निवडले. त्यांना प्रशिक्षण दिलं आणि चोख पूर्वतयारीने खजिन्याची चावी थेट गावकºयांच्या हाती दिली.
- पुढे काय झालं, ते आकडे सांगतात!
आणि ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेच्या निमित्ताने गावागावांतून उभं झालेलं स्वावलंबनाचं तुफानही!!
***
हा देश ‘सेलिब्रिटीज’च्या वेडाने पागल होणाºयांचा! एखाद्यावर जीव टाकला, म्हणजे माणसं कमरेचं सोडून द्यायला तयार होतात. आपला आवडता ‘हिरो’ त्याच्या दारात, गॅलरीत क्षणभर दिसावा म्हणून त्याच्या घरासमोर रात्री-बेरात्री रांगा लावताना, प्राणप्रिय स्पोटर््स्टारच्या महत्त्वाच्या मॅचच्या दिवशी देव पाण्यात बुडवताना, फेवरिट गायक-गायिकेच्या कॉन्सर्टमध्ये चेकाळून बेशुद्ध होताना कुण्णाला कसली पर्वा नसते. या अपरंपार वेडाच्या भरवशावर अमर्याद संपत्ती कमावणारे, प्रसिद्धीच्या शिखरावरले तारे-तारका आपण ज्यांच्यामुळे इथवर पोचलो, त्यांच्यासाठी म्हणून ‘वरून खाली’ उतरलेले या देशाने क्वचितच पाहिले आहेत. या मंडळींची ‘उत्तरदायित्वा’ची कल्पना चॅरिटी शोमध्ये फुकट नाचणं-गाणं-खेळणं किंवा फार तर आपण कमावलेल्या समुद्रातल्या दोनचार बादल्या उचलून देणग्या दिल्याच्या कृतकृत्यतेने मिरवण्यापुरतीच! आपली लोकप्रियता वापरून आपल्या वाडवडिलांची स्मारकं उभी करण्यासाठी वरून लोकांच्याच खिशात हात घालणाºया सेलिब्रिटीजचं ‘ब्लॅकमेलिंग’ही या देशाने अनुभवलेलं आहे.

- या सगळ्या पचपचीत पार्श्वभूमीवर आमीर खान या संवेदनशील अभिनेत्यानं उभं केलेलं ‘दातृत्वा’चं मॉडेल मोठं कल्पक आणि ठसठशीत. खरंतर या कामाला ‘दातृत्व’ हा शब्द जोडणंही फारसं उचित नाही. कारण दातृत्वामध्ये असलेला उपकृततेचा, ‘घेत्यां’चं पांगळं परावलंबित्व कायम ठेवणाºया ‘देत्यां’च्या उद्धट मदतीचा वास या कामाला नाही.
- इथे आहे ती स्वावलंबनासाठी प्रेरित करणारी शक्ती आतून पेटवणारी ठिणगी!!
‘वॉटर कप’ स्पर्धेच्या दुसºया पारितोषिक वितरण कार्यक्रमात शांतिलाल मुथा यांनी पानी फाउंडेशनच्या कामाचं मर्म नेमकं उलगडलं होतं... स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताच्या गावागावांत पहिल्यांदाच कुणीतरी सांगायला गेलं, की आम्ही तुम्हाला एक तंत्र शिकवतो, ते शिका आणि कृतीमध्ये वापरा. हे शिकून, समजून घ्याल आणि एकजुटीने कामाला भिडाल, तर तुमचे प्रश्न तुम्ही स्वत: सोडवू शकाल. तुम्हाला कुणावरही अवलंबून राहायची गरज नाही. ना सरकारवर, ना अधिकाºयांवर, ना कुणा देत्या पैसेवाल्यावर!
फुगत गेलेल्या शहरांनी, संपत्ती-ज्ञान-माहितीचा संचय केलेल्या मोजक्या समृद्ध समूहांनी, सत्तेचा माज कधी न विसरलेल्या नेत्यांनी आणि गावखेड्यातल्या गोरगरिबांना सतत टाचेखाली ठेवण्याच्या सवयीत मुरलेल्या शासनयंत्रणांनी खेड्यांना सतत ‘घेत’ राहण्याची सवय लावली. त्यांच्या उपजत स्वाभिमानाचा फणा मोडला. गावशिवारातल्या अर्धशिक्षितांनी अनुभवातून कमवलेल्या हिकमतीला वाव देतील अशा साध्या शक्यतासुद्धा व्यवस्थेत ठेवल्या नाहीत. देणारे देत नाहीत म्हणून आपली ही अशी अवस्था असा एक विचित्र, हतबल न्यूनगंड हाच आपल्या खेड्यांचा स्वभाव बनत गेला.
शासनाने पैसे पाठवले, ते वाटेत गळले. योजना दिल्या, त्या अर्ध्यामुर्ध्या पोचल्या. पंचायत राजने अधिकार दिले पण ते वापरावे कसे, याची मेख कुणी शिकवली नाही. स्वयंसेवी संस्थांनी अन्यायाची जाणीव दिली, संघटनाचा मंत्र दिला पण कृतीचं तंत्र शिकवणं राहून गेलं. दाते असतीलच कुणी, तर त्यांनी पैसे दिले; पण ज्ञान आणि माहितीच्या चाव्या आपल्याच कनवटीला खोचलेल्या ठेवल्या.
- ‘इस कामका केंद्र पैसा नही, लोग होंगे. दया नही स्वाभिमान होगा. कृपा नही कर्म होगा. आपको कोई पैसा नही देगा. जो पैसा लगेगा, आपका लगेगा. पसीना बहेगा, आपका बहेगा. वक्त आप देंगे. दिमाग आपका लगेगा. ये काम हमारा नही, आपका होगा’ - असं स्वच्छ सांगण्याची हिंमत आमीर आणि त्याच्या टीमने कमावली, कारण गावातल्या लोकांवर विश्वास टाकण्याची दानत त्यांच्याकडे होती, असावी.
या विश्वासाला सार्थ ठरवत आज महाराष्ट्रातल्या तब्बल १३२१ गावांनी आपल्या दुष्काळी शिवारात शब्दश: लाथा घालून आपलं पाणी आपण कमावलं आहे. जी आहेत ती गावं प्रयत्न सुरूच ठेवतील. पुढच्या उन्हाळ्यात आणखी गावं यात येतील. हे सगळं ‘मॉडेल’ कदाचित देशभरातही जाईल.
खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पानी फाउंडेशनच्या कामाचे खंबीर पाठीराखे आहेत. ते म्हणतात, हे काम सरकारने करायचं ठरवलं असतं, तर नसतं झालं. ते लोकांचं झालं, म्हणून लोकांनी केलं! स्वत:च्या लोकप्रियतेचं वलय, मूलभूत कामासाठी आर्थिक रसद उभी करण्याची ताकद, सरकार दरबारीचं वजन आणि मुख्य म्हणजे ‘गोष्ट रंजक करून सांगण्याची’ आपल्या व्यवसायातून कमावलेली इल्म वापरून आमीर खान याने आपल्या सहकाºयांच्या मदतीने सामाजिक उत्तरदायित्व निभावण्याचं एक वेगळं मॉडेलच जन्माला घातलं आहे.
स्वातंत्र्याला सत्तर वर्षं होत असताना या देशातल्या नागरिकांना स्वत:चे प्रश्न स्वत:च्या हाती घेऊन एकजुटीने अशक्य ते शक्य करण्याची हिकमत शिकवणारं हे तंत्र मोठं जादूई आणि जिंदादिल आहे.
त्यात एकजुटीची अपरिहार्यता आहे, त्यामुळे भेदाभेद बाजूला ठेवण्याची जणू सक्तीच आहे!
सरकारकडे आशेने डोळे लावून बसण्याच्या त्रयस्थ हतबलतेऐवजी सरकारी यंत्रणांना आपल्या मागे ओढत आणण्याचा कृतिशील पुढाकार आहे.
टाटा, अंबानी, बजाज यांसारख्या बड्या उद्योग-घराण्यांसकट एरवी आत्ममग्न असलेल्या सुस्त शहरी नागरिकांना खेड्यांशी थेट जोडण्याची अजिजी नव्हे, तर आमंत्रण आहे.
- आणि सत्यजित भटकळ यांच्या शब्दात सांगायचं, तर वरवर वेड्या वाटणाºया आशावादाचा विजय आजही, अजूनही शक्य आहे, हा दिलासा!

 


(लेखिका लोकमत वृत्तसमुहाच्या फिचर एडिटर आहेत. aparna.velankar@lokmat.com)

 







 

 


 

 

 

Web Title: Second freedom of seventy years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.