स्मरण - निर्मळ- निर्मोही नेता .....

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2019 06:00 AM2019-04-21T06:00:00+5:302019-04-21T06:00:15+5:30

कोणतीही उपाधी कोणाच्याही मागे उगीचच लावली जात  नसल्याच्या काळात केशवराव जेधे यांच्यामागे देशभक्त ही उपाधी लागली  ती त्यांनी समर्पितपणे जगलेल्या जीवनामुळेच. पुण्याच्याच नव्हे, तर राज्याच्या राजकारणात एकेकाळी महत्त्वाचे स्थान असलेल्या केशवरावांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या नातवाने  केलेले स्मरण... 

Remembrance - Nirmal - Nirmohi Leader ..... | स्मरण - निर्मळ- निर्मोही नेता .....

स्मरण - निर्मळ- निर्मोही नेता .....

Next

- संताजी जेधे-  

केशवराव जेधे यांचा जन्म २१ एप्रिल १८९६ रोजी पुण्यात झाला. केशवरावांसह एकूण चार बंधू होते. केशवराव सर्वात धाकटे. त्यामुळे मोठ्या तिघांचेही लाडके. त्यांनी घरातले अर्थकारण पाहायचे व केशवरावांनी लष्कराच्या भाकरी भाजायच्या, असे त्यांच्या शालेय वयातच ठरून गेले होते. बाबूराव जेधे हे बंधू पुण्याच्या समाजकारणात महत्त्वाची भूमिका बजावत होते. त्यांच्यापासूनच केशवरावांनी दीक्षा घेतली. फर्ग्युसन महाविद्यालयात इंटरपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर केशवराव खऱ्या अर्थाने कार्यरत झाले.
महात्मा फुले यांच्यापासून त्यांनी प्रेरणा घेतली. समाजातील विषमतेवर त्यांचा पहिल्यापासून रोष होता. ती कशामुळे आली, याचा अभ्यास करतानाच त्यांना तत्कालीन सवर्णांच्या अन्य समाजावर असलेल्या धार्मिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय वर्चस्व जाणवले. ते कमी व्हावे, यासाठी काय करता येईल यादृष्टीने ते विचार करू लागले. महात्मा फुले यांच्या निधनानंतर त्यांनी सुरू केलेल्या विचारांना वेगळे वळण लागून तत्कालीन महाराष्ट्रात एक वेगळाच वाद सुरू झाला. बहूजन व अभिजन असे त्या वादाचे काहीसे स्वरूप होते. दिनकरराव जवळकर यांच्या मार्गदर्शनात केशवरावांची जडणघडण झाली.
केशवराव त्यात हिरीरीने पडले व कुशाग्र बुद्धिमत्तेमुळे अल्वावधीतच बहुजनांचे नेते म्हणून पुढे आले. त्यावेळच्या पुण्याच्या काँग्रेसमध्ये उच्चवर्णीयांचाच भरणा होता. काकासाहेब गाडगीळ हे त्यांचे धुरीण. काँग्रेसला तळापर्यंत न्यायचे तर बहुजनांचा त्यात सहभाग झाल्याशिवाय ते शक्य नाही, हे काकासाहेबांनी बरोबर ओळखले. त्यांनीच केशवरावांना आपली, काँग्रेसची, देशाच्या स्वातंत्र्याची भूमिका पटवून दिली. बहुजनांसाठी बराच संघर्ष केला, मात्र सत्तेच्या किंवा समाजाच्या मुख्य प्रवाहात गेल्याशिवाय त्यांच्यासाठी काहीच करणे शक्य नाही, हे लक्षात आल्यावर केशवरावांनीही फारसे आढेवेढे न घेता काँग्रेसप्रवेश केला. त्यांच्या या एका निर्णयामुळे तोपर्यंत राज्यात अन्य विचारांच्या तुलनेत बरीचशी पिछाडीवर असलेली काँग्रेस बहुजनांची काँग्रेस म्हणून पुढे आली. केशवराव बरीच वर्षे काँग्रेसमध्ये राहिले. स्वातंत्र्यानंतर त्यांना राज्यसभेची खासदारकीही मिळाली.
पण मुळातच चळवळ्या असलेल्या केशवरावांचे मन काही सत्तेत रमेना.  काँग्रेसमधील राजकीय उलाढालींना कंटाळून त्यांनी आणखी काही सहकाºयांना बरोबर घेत शेतकरी कामगार पक्षाची स्थापना केली. जेधे-मोरे, जेधे-जवळकर, जेधे-गाडगीळ अशा बºयाच जोड्या त्यावेळी राज्यात गाजल्या, याचे कारण केशवरावांचा सहृदय स्वभाव हेच होते. मैत्री, प्रेम, आपुलकी यांना त्यांच्या लेखी फार महत्त्व होते. आपल्या विचारांशीही ते कायम प्रामाणिक असत. त्यामुळेच आचार्य अत्रे यांनी ज्यावेळी महात्मा फुले यांच्यावर चित्रपट काढणार असल्याचे जाहीर केले, त्यावेळी काहीही न बोलता केशवरावांनी त्यांना आर्थिक मदत केली. स्वत: अत्रे यांनीच त्याचा उल्लेख केला आहे.
केशवरावांमुळे पुण्याच्या बंदिवान मारुतीजवळच्या त्यांच्या ‘जेधे मॅन्शन’ला त्या काळात अतोनात महत्त्व प्राप्त झाले. महात्मा गांधी यांच्यापासून पंडित नेहरू, यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या तत्कालीन अनेक नेत्यांचा या मॅन्शनमध्ये पाहुणचार झाला आहे. साचलेल्या तळ्यासारखे नव्हे, तर वाहत्या गंगेसारखे त्यांचे जीवन होते. त्यामुळे त्यांना प्रसंगी प्रवादही सहन करावे लागले आहेत. समाजाचे कार्य करण्यासाठी जेधे यांनी ‘मजूर,’ ‘कैवारी’ अशी वृत्तपत्रेही चालविली. ‘देशाचे दुष्मन’ हे त्यांनी लिहिलेले पुस्तक आक्षेपार्ह ठरून त्यांना सहा महिन्यांची कारावासाची शिक्षा झाली होती. शिक्षेचा खटला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चालविला व जेधेंना दोषमुक्त ठरविले. पुणे येथे छत्रपती मेळा त्यांनी काढला होता. महापालिकेच्या आवारात आता असलेला महात्मा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठीही त्यांनी बरेच काही केले.
केशवराव जेधे सामाजिक सुधारणेच्या चळवळीत दाखल झाले ते वैयक्तिक स्वार्थ किंवा प्रतिष्ठा यासाठी नाही. त्यांना आपल्या बहुजन समाजाचे खरेखुरे हित व्हावे, असे वाटत होते. त्यांची जी काही राजकीय कृती होत असे त्यात फक्त हाच विचार असे. अखेरपर्यंत ते सामाजिक जीवनात कार्यरत होते. अखेरच्या काळात त्यांचा जयंतराव टिळक यांच्याशी बराच स्नेह जुळला. सर्वपक्षीय गोवा विमोचन समितीचे ते अध्यक्ष होते. संयुक्त महाराष्टÑ समितीचे पहिले अध्यक्ष तेच होते. आचार्य अत्रे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारवाडा येथे १२ नोव्हेंबर १९५९ रोजी झालेल्या सभेत भाषण करताना अचानक त्यांना अर्धांगवायूचा झटका आला व त्यातच त्यांचे निधन झाले. या थोर व्यक्तिमत्त्वाला त्यांच्या जयंतीनिमित्त मानाचा मुजरा.
(लेखक केशवराव जेधे यांचे नातू आहेत.)

Web Title: Remembrance - Nirmal - Nirmohi Leader .....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे