पुणेरी कट्टा- नगरसेवकांचंही म्हणणं जरा ऐकून घ्या.. 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2018 07:00 AM2018-12-23T07:00:00+5:302018-12-23T07:00:05+5:30

आपल्या दैनंदिन अडचणी सोडविण्यासाठी नेहमी आपल्याला आठवण येते ती आपल्या नगरसेवकाची! पण त्याच्याही काही अडचणी असतात त्या कुणीच समजून घेत नाही.... 

Punei Katta- Listen to Corporators | पुणेरी कट्टा- नगरसेवकांचंही म्हणणं जरा ऐकून घ्या.. 

पुणेरी कट्टा- नगरसेवकांचंही म्हणणं जरा ऐकून घ्या.. 

googlenewsNext

 - अंकुश काकडे-  
मी पुणे महापालिकेत २० वर्षे नगरसेवक होतो, त्या काळात मला काही कडू-गोड अनुभव आले, त्यात कडूच जास्त होते! असेच एके दिवशी सकाळी ६ वाजता एका महिलेचा मला फोन आला, बाई जरा जोरातच होत्या, आज आमच्याकडे पाणी का आले नाही, तेव्हा ते कधी येणार, आम्ही अंघोळ केव्हा करायची, ऑफिसला कधी जाणार, असे एक ना शंभर प्रश्न विचारून त्या मला भंडावून सोडत होत्या, मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत होतो, माझं थोडं ऐका तर, ते काही नाही पहिलं पाणी सुरू करा हे पालूपद चालूच, शेवटी रागाने त्यांना म्हटले, तुम्ही वर्तमानपत्र वाचता का? हो म्हटल्यावर २ दिवसांपूर्वीच्या पेपरमध्ये आज पाणी येणार नाही हे निवेदन वाचले की नाही? मग मात्र त्या बार्इंचा पारा जाग्यावर आला. महिन्यातून १, २ वेळा तरी आमची सुप्रभात अशी सुरू होते. 
खरं म्हटलं तर आपण खासदार, आमदार निवडून देतो, खासदार, आमदार हा वर्षातील जवळपास ६ महिने अधिवेशन, मीटिंग, दौरे यामुळे मतदारसंघात त्यांचे फारसे लक्ष नसते, (याला सुप्रिया सुुळे मात्र अपवाद म्हणायला हव्यात अधिवेशन नसेल तेव्हा आपल्या मतदारसंघात सातत्याने संपर्क साधणाºया राज्यातील त्या एकमेव खासदार आहेत.) त्यांचे कामदेखील तेथील नगरसेवकालाच करावं लागतं, अर्थात अनेक वेळा ते काम त्यांच्या कक्षेतलं नसतं, पण नागरिक दिल्लीतील, राज्यातील कुठलंही काम निघालं, की ते लगेच नगरसेवकाला सांगतात, नगरसेवक काम करणारा असेल तर ते करण्याचा प्रयत्न करतो. 
बरं नगरसेवकांची महापालिकेच्या कक्षातील कामे राहिली बाजूला, पण सार्वजनिक नळावर दोन महिलांची झालेली भांडणे सोडविण्याचे काम, हे नगरसेवकांचे काम आहे का? पण त्यातही आम्हाला लक्ष द्यावे लागते, काही वेळा तर अशी भांडणे पोलीस चौकीपर्यंत जातात, नेमकी  कुणाची याची काहीच कल्पना नसल्यामुळे कुणाची बाजू घ्यावी, हा मोठा प्रश्न, शिवाय ज्याच्या विरुद्घ बाजू घेतली ती पुढच्या निवडणुकीच्या वेळी विरोधी प्रचारात आघाडीवर फार पंचाईत होते, पण त्यातूनही आम्ही मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो, अहो हे तर काहीच नाही, नवरा-बायकोचे भांडण, याचाही निवाडा आमच्याकडे येतो, कारण काय, तर नवरा दारू पिऊन येतो, खूप मारतो अशी बायकोची तक्रार, आता बोला काय करायचे आम्ही, शिवाय नवरा-बायको दुसरे दिवशी सकाळी मजेत एकत्र फिरायला जाताना दिसतात. 
असाच एका रात्री फोन आला आमच्या घरातील लाईट गेलीय, मी म्हटलं एमएसईबीला फोन तर तिकडून प्रश्न त्यांचा नंबर सांगा, आम्ही नंबर शोधून देतो, ५-१० मिनिटांनी पुन्हा फोन अहो, तो नंबर लागत नाही, तुम्ही नंबर तर चुकीचा दिला नाही ना? असा उलटा प्रश्न आम्हालाच, आपण समक्ष जाऊन निलायमजवळील कार्यालयात तक्रार करा, असे सांगितल्यावर निलायम कुठं आलं, शेवटी नाईलाजानं आम्हीच आमचा कार्यकर्ता पाठवून त्यांची तक्रार नोंदवून देतो. एप्रिल, मे, जून महिना हा नगरसेवकांच्या दृष्टीने अतिशय कटकटींचा काळ, एप्रिलमध्ये सुरू होतात माँटेसरीतील प्रवेश, मे महिन्यात शाळेतील, तर जून महिन्यात महाविद्यालय प्रवेश. माँटेसरीत प्रवेशासाठी ५ वर्षे पूर्ण हवीत, पण १ च महिना कमी आहे, तरी प्रवेश देत नाहीत, अशी तक्रार आता काय करायचे, अहो मुलाचे वय बसत नाही. त्याला शाळा तरी काय करणार, असे सांगिल्यावर मग आम्हालाच प्रश्न मग तुम्हाला कशाला  निवडून दिलेय? आहे का याला उत्तर. कॉलेजमध्ये प्रवेशासाठी भरावयाचा अर्ज उशिरा भरला. शिवाय मार्कही कमी, त्यामुळे प्रवेश मिळत नाही, आली केस नगरसेवकाकडे, मार्क कमी का पडले तर उत्तर ठरलेले मुलगा आजारी होता, झाले हे आम्ही समजू शकतो, पण फॉर्म का उशिरा भरला तर त्याचे उत्तर ऐकून चक्रावून जायला होते, नाही त्यावेळी आम्ही ट्रीपला गेला होतो, आहे का याला तुमच्याकडे उत्तर. मी मॉडेल कॉलनीतून निवडून आलो होतो. तेथे दीप बंगला चौकात फुटपाथवर भाजी विक्रेते बसत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असे. तेथील नागरिकांनीच मला सूचना केली. या विक्रेत्यांना कुठे तरी भाजी मंडई बांधून द्या सुदैवाने तेथेच जवळच जागा होती, तेथे २०-२२ छोटे गाळे करून दिले. त्यांचीही सोय झाली, शिवाय चौकातील वाहतूककोंडी प्रमाणात कमी झाली, सूचना करणाºयांनी माझे अभिनंदनाचे बोर्डही लावले, कुणी तरी आपण केलेल्या कामाची दखल घेतली याचे समाधान झाले, पण ते फार काळ टिकले नाही, तेच लोक १५ दिवसांनी परत माझ्याकडे आले, तक्रार ऐकून मी तर थक्कच झालो, तक्रार होती अहो हे भाजीवाले भाजी फार महाग विकायला लागलेत! मग मी म्हणालो मग मार्केट यार्डला जाऊन घ्या, पण त्याचेही उत्तर त्यांच्याकडे होतेच, पेट्रोल परवडत नाही! मी ३ वेगवेगळ्या भागातून निवडून आलो, माझा वॉर्डात संपर्क बºयापैकी होता, पण अनेक नागरिक भेटले की पहिला प्रश्न अहो काय सध्या दिसत नाही? आमचे उत्तर नाही आॅफिसमध्ये असतो ना, पण नाही इकडे बºयाच दिवसात आला नाहीत, आता हे महाशय केव्हा बाहेर पडतात ती वेळ लक्षात घेऊन आम्ही तिकडे जायला हवे, नाहीतर यांना दिसावे म्हणून रस्त्याने जाताना आम्ही हातात झेंडा घेऊन फिरावे, जेणेकरून त्यांना आम्ही दिसू.   

 (पूर्वार्ध)
(लेखक प्रसिद्ध राजकीय-सामाजिक कार्यकर्ते आहेत.)

Web Title: Punei Katta- Listen to Corporators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.