गर्दीचे गणित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 06:01 AM2019-04-21T06:01:00+5:302019-04-21T06:05:02+5:30

काय असते सभेच्या गर्दीचे गणित? कशी मोजायची असतात माणसे? गर्दी मोजणाऱ्यांकडे शास्रोक्त पद्धत असते की भावनेच्या आहारी जाऊन गर्दी कमी-जास्त होते?

political gimmicks for crowd pulling in election | गर्दीचे गणित!

गर्दीचे गणित!

Next
ठळक मुद्देमैदानावरची गर्दी आटली, आता अदृश्य श्रोत्यांना पकडण्याची धडपड!

- यदु जोशी

प्रत्येक सभेचा आणि प्रत्येक मैदानाचा एक इतिहास असतो. गर्दीने खचाखच भरलेल्या हजारो लोकांच्या राजकीय सभा आणि त्या त्या ठिकाणची मैदाने यांचेही नाते अतूट असेच आहे.
मुंबईतील शिवाजी पार्क, बीकेसी ग्राउंड, पुण्यातील एसपी कॉलेज मैदान, एसएसपीएमएस मैदान, नागपुरातील कस्तूरचंद पार्क, नाशिकमधील गोल्फ क्लब मैदान, कोल्हापुरातील तपोवन मैदान वा गांधी मैदान, अमरावतीतील सायनकोर मैदान.. या ठिकाणांची सभा म्हटली की विशाल जनसमुदाय नजरेसमोर येतो.
गर्दीने खच्चून भरलेल्या अशा अनेक सभा या मैदानांनी वर्षानुवर्षे अनुभवल्या. आपल्या नेत्याला ऐकण्यासाठी हजारो लोक येतात. प्रचंड उत्साह त्यांच्यामध्ये असतो. घोषणाबाजीने परिसर दुमदुमून जातो. दोन तास आधीपासून लोक यायला सुरुवात होते. पहिल्या-दुसऱ्या फळीतील नेते आधी भाषणे करून वातावरण तयार करतात आणि मग बड्या नेत्याचे भाषण होते. सभेच्या निमित्ताने लोकांचा मैदानाशी संबंध येतो तो फारतर चार तासांसाठी. ते मैदान मात्र त्या सभेची साक्ष नेहमीच देत राहाते.
नेता एकेक संवाद बोलतो आणि समर्थक ते कानात साठवून ऐकतात. टाळ्या-शिट्ट्यांचा प्रतिसाद देतात. नारेबाजी होत राहाते. सभेच्या वेळी आणि सभेनंतर मीडिया, सोशल मीडियातून चर्चा सुरू होते ती सभेला किती गर्दी होती याची.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर्धा येथील अलीकडच्या प्रचार सभेला कमी गर्दी होती, हे सांगणारे फोटो सभेनंतर लगेच व्हायरल करण्यात आले. त्यावर तोड म्हणून भाजपने लगेच सभेला असलेल्या मोठ्या गर्दीचे फोटो व्हायरल केले. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नागपुरातील सभेच्या निमित्तानेही असेच सोशल मीडिया वॉर रंगले.
पूर्वी सभेला आलेले लोक जमिनीवर बसायचे. मग त्याची जागा सतरंजीने घेतली. आता खुर्च्या टाकल्या जातात. जागा मिळेल तिथे बसून घेत नेत्याला ऐकणाऱ्यांची गर्दी कमी होत गेली तसंतसे सभांच्या व्यवस्थापनाला महत्त्व येत गेले. त्यातच व्हीव्हीआयपींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आणि त्यानंही सभांचे स्वरूप बदलत गेले.
एक काळ असा होता की भाषण देणाºया नेत्याला खºया अर्थाने डोळ्यात साठवून घेता येत होते. मंचापासून केवळ पाच-दहा फुटावर लोक बसत. आता सुरक्षेच्या कारणावरून किमान साठ फुटांपर्यंतच्या ‘डी’मध्ये कुणालाही प्रवेश नसतो. एखाद्या व्यक्तीला मंचाच्या दिशेने काही वस्तू फेकता येणे शक्य होऊ नये, गर्दीतील काहींनी मंचावर धावून जाण्याचा अचानक प्रयत्न केला तर त्यांना मध्येच रोखता यावे यासाठी ही काळजी घेतली जाते.
‘डी’ची मोकळी जागा सोडावी लागत असल्याने पब्लिकसाठीची जागा आक्रसली. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची श्रीपेरांबुदूरमधील सभेत स्फोट घडवून हत्या करण्यात आल्यानंतर व्हीव्हीआयपींच्या सभांमधील सुरक्षाव्यवस्था कडेकोट होत गेली. सभेच्या परवानगीसाठीचे नियम अधिक कडक करण्यात आले. रात्री १० नंतर आणि पहाटे ६ पूर्वी कोणतीही प्रचार सभा नियमानुसार घेता येत नाही.
मोठ्या सभांच्या आयोजनाचा खर्च लाखोंच्या घरात असतो. त्याची अधिकृत आकडेवारी कोणताही पक्ष देत नाही. जाहिरातबाजीवर मोठा खर्च केला जातो. एलईडी स्क्रीनवर बघून सभेतील शेवटच्या माणसालादेखील आज सभेचा आनंद घेता येतो. सर्वच पक्षाच्या मोठ्या नेत्यांच्या सभा त्यांच्या पक्षाच्या यंत्रणेमार्फत फेसबुक लाइव्ह केल्या जातात. त्यामुळे राज्याच्या कुठल्याही कोपºयातील सभा त्याचवेळी कुठेही बसून ऐकता-बघता येतात.
सभेच्या ठिकाणी ‘सेल्फी पॉइंट’ ही कल्पना कशी वाटते? १९९५ पासून विविध पक्षांच्या सभांचे आयोजन करण्याचा अनुभव असलेले अनंत खासबारदार यांनी अलीकडे कोल्हापुरातील युतीच्या मोठ्या सभेत हा अभिनव फंडा वापरला. सभेच्या ठिकाणी २६ सेल्फी पॉइंट त्यांनी तयार केले. अटलबिहारी वाजपेयी, बाळासाहेब ठाकरे, नरेंद्र मोदी यांचे फोटो किंवा गाजलेल्या वाक्यांजवळ उभे राहून तुम्हाला सेल्फी घेता येईल. त्याला उत्साही युवकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना आदी पक्षांनी आणखी एक फंडा काढलाय. तो म्हणजे सभेच्या ठिकाणी एक मोबाइल नंबर दिला जातो. तो डायल करताच तुम्ही एकतर पक्षाचे सदस्य होता किंवा पक्षाच्या यंत्रणेशी जोडले जाता.
वक्ता कसा आहे, यावर तर गर्दीचे गणित अवलंबून असतेच; पण गर्दी जमवण्याच्या युक्त्या पूर्वीही वापरल्या जायच्या, आजही वापरल्या जातात. आजच्या डिजिटल जमान्यात त्याचे स्वरूप आणखी बदलले आहे.
प्रत्यक्ष सभेला फार गर्दी होणार नाही, हे राजकीय पक्षांनीही जणू आता गृहीत धरले आहे. त्याऐवजी गर्दीत उपस्थित नसलेल्या श्रोत्यांपर्यंत सभेचे भाषण अथवा त्यातील कळीचे मुद्दे आधुनिक माध्यमांद्वारे कसे पोहोचतील याकडे आता लक्ष दिले जात आहे. आजच्या राजकीय सभांसाठी प्रत्यक्ष श्रोता आणि अदृश्य श्रोता यांनाही अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. यापुढच्या काळात ते आणखीच वाढत जाईल.

शक्तिप्रदर्शनासाठी
मोठ्या सभांची गरज

मोठ्या नेत्यांच्या सभांसाठी तारखा न मिळणे, या सभांच्या आयोजनासाठीचा खर्च, एका सभेसाठी पक्षातील प्रमुख कार्यकर्त्यांना ऐन प्रचारात अडकून राहावे लागणे यामुळे मोठ्या सभांची संख्या अलीकडे कमी झाली आणि कॉर्नर मीटिंग्ज वाढल्या. सोशल मीडिया, टीव्ही ही प्रचाराची अन्य प्रभावी माध्यमे उपलब्ध झाली. त्यामुळे प्रचंड मोठ्या सभा यापुढील काळात कमी कमी होत जातील, असे म्हटले जाते. असे असले तरी त्या-त्या पक्षाला शक्तिप्रदर्शनासाठी बड्या नेत्यांच्या प्रचंड सभांची आवश्यकता नेहमीच भासत राहणार आहे. त्यातून लोकांमध्ये पक्षाच्या ताकदीबद्दल एक मेसेज जातो. कुंपणावर असलेली मते वळविण्यात काहीअंशी यशदेखील येते. सभेच्या गर्दीची चर्चा पुढील काही दिवस होत राहाते. डिजिटलचा बोलबाला वाढत जाईल तशी मोठ्या सभांना गर्दी जमविणे राजकीय पक्षांना कठीण होत जाणार आहे.

गर्दी मोजण्याचे सोपे गणित!
काय असते सभेच्या गर्दीचे गणित? कशी मोजायची असतात माणसे? गर्दी मोजणाºयांकडे शास्रोक्त पद्धत असते की भावनेच्या आहारी जाऊन गर्दी कमी-जास्त होते? असे एक ना अनेक प्रश्न निर्माण होतात.
१९९५ पासून मुंबईत एका मोठ्या राजकीय पक्षाच्या सभांचे आयोजन करणाºयांपैकी प्रमुख आणि सभाशास्राचा अत्यंत अचूक अभ्यास असलेल्या एका व्यक्तीने (नाव न छापण्याच्या अटीवर) गर्दीचे गणित सोप्या शब्दांत समजवून सांगितले.
सभेतील प्रत्येक डोके तर मोजणे शक्य नाही. मग कशी मोजायची सभेतील गर्दी? साधे गणित असे आहे की माणसे जमिनीवर बसलेली असतील तर प्रत्येकाला दोन बाय दोनची जागा लागते; म्हणजे चार चौरस फूट. खुर्च्यांवर बसलेली असतील तर चार बाय चारची म्हणजे आठ चौरस फूट जागा लागते. दोन लाख चौरस फुटाचे मैदान असेल आणि सगळे खाली बसलेले असतील तर साधारणत: ४० ते ४२ हजारांची गर्दी असते. कारण सभेचा मंच, सुरक्षेच्या कारणामुळे आणि इतर कारणांनी मोकळी सोडलेली जागा ही २ लाख चौरस फुटातून वजा करून मग हिशेब करावा लागतो. मैदानात फक्त खुर्च्याच असतील तर साधारणत: २४ ते २५ हजारांची गर्दी आहे, असे समजावे.

दर माणशी तीनशे ते पाचशे रुपये
मोठ्या सभांना येणाºयांना कॅप देणे, काहीवेळा फूड पॅकेट्सचे वाटप, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, अ‍ॅम्ब्युलन्स, फिरत्या टॉयलेट्सची सोय अशी काळजी आयोजकांकडून घेतली जाते. सभेसाठी गर्दी जमविण्याचीही एक वेगळी व्यवस्था असते. काहीवेळा पैसे देऊन गर्दी जमविली जाते. सभांना गर्दी पुरविणारे काही लोक मुंबई-ठाण्यात आहेत. दिल्लीमध्ये तर अशा संस्थांची कार्यालये आहेत. तेथून मागणीनुसार गर्दीचा पुरवठा केला जातो. अर्थात, त्यासाठी पैसे मोजावे लागतात. तीनशे ते पाचशे रुपयांचा रेट दर माणशी सध्या सुरू आहे असे म्हणतात. कॉर्नर सभा, लहान सभांना गर्दी जमविण्यासाठी मिमिक्री कलाकार, लहान-मोठे गायक, कवि, डान्स गु्रप्स.. यांना प्रचार काळात मोठी मागणी असते.


(लेखक ‘लोकमत’च्या मुंबई आवृत्तीत वरिष्ठ सहायक संपादक आहेत.)

yadu.joshi@lokmat.com

 

 

 

Web Title: political gimmicks for crowd pulling in election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.