नाटकवाल्यांच्या कविता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 06:00 AM2019-06-02T06:00:00+5:302019-06-02T06:00:04+5:30

राजीव नाईक, रवींद्र लाखे आणि माया पंडित हे तीनही कवी अस्सल नाटकवाले आहेत. 1990च्या पिढीतल्या नाटकवाल्या लोकांनी  लिहिलेल्या या कविता आहेत.  त्यात एकटेपण, तुटलेपण जसे आहे, तसे  विस्कटलेपण आणि गवसलेपणही आहे.  मराठी काव्य परंपरेला जोडणार्‍या आणि  नवतेचा शोध घेणार्‍या या कविता आहेत.

Poems of Rajiv Naik, Ravindra Lakhe and Maya Pandit.. | नाटकवाल्यांच्या कविता

नाटकवाल्यांच्या कविता

Next
ठळक मुद्देया कविता नाट्यपूर्ण आणि नादमय आहेत. या नाट्यमयता असलेल्या कवितांमध्ये काही स्वगतं आहेत, काही संवाद आहेत, विराम आहेत, विविध पात्न आहेत तर काहीवेळा विधानंही आहेत. काही कविता या चक्क नाट्यप्रवेशासारख्या आहेत तर काही नाट्यछटेसारख्यासुद्धा !

- अतुल पेठे

नाटककार राजीव नाईक, नाट्यदिग्दर्शक रवींद्र लाखे आणि लेखिका, अनुवादक तसेच अभिनेत्नी माया पंडित या तिघांच्या कवितांचे स्वतंत्न संग्रह मागील वर्षात आलेले आहेत. त्यांच्या  कविताबिविता, संपर्क क्षेत्नाच्या बाहेर,  अवस्थांतराच्या कविता आणि तल्खली या चारही काव्यसंग्रहांकडे मी समीक्षक या नात्याने पहात नाही हे प्रथम स्पष्ट करतो. तर या तीनही कवींच्या कविता मला कशा आणि का भावल्या ते सांगायचा प्रयत्न करणार आहे. 
हे तीनही कवी अस्सल नाटकवाले आहेत. 1990च्या पिढीतल्या नाटकवाल्या लोकांनी लिहिलेल्या या कविता आहेत. त्यात जसे एकटेपण, तुटलेपण आणि विस्कटलेपण आहे तसेच गवसलेपणही आहे. या तिघांच्याही कविता मराठी काव्य परंपरेला जोडणार्‍या आणि नवतेचा शोध घेणार्‍या आहेत. हे कवी ज्या विस्कळीत आणि अघटित काळाचे प्रतिनिधी आहेत, ते त्या काळाचे दर्शन मोठय़ा जबाबदारीने आणि ताकदीने त्यांच्या त्यांच्या कवितांतून घडवताना इथे दिसत आहेत. त्यांच्या या कविता नाट्यपूर्ण आणि नादमय आहेत. या नाट्यमयता असलेल्या कवितांमध्ये काही स्वगतं आहेत, काही संवाद आहेत, विराम आहेत, विविध पात्न आहेत तर काहीवेळा विधानंही आहेत. काही कविता या चक्क नाट्यप्रवेशासारख्या आहेत तर काही नाट्यछटेसारख्यासुद्धा ! आता हे तीनही कवी नाटकवाले असल्याने त्यांच्या कवितांवर नाट्यमयता साधण्याचा परिणाम झालेला आढळतो.
राक्षस, पर्‍या, देव आणि भुतंखेतं 
एकाच पंक्तीला जेवायला बसलेली 
आणि माझ्या हातांत वाढायची भांडी. 
नव्हत्याचं होतं झालेलं थोडं अप्रूप वाटलेलं 
(कविताबिविता - राजीव नाईक)

गाढवं ओझं वाहताना   पाहिली आहेस कधी?
पाठीवर ओझं पडलं की   चालायला लागतात.. 
हा त्यांचा गुण   अवगुण ठरवला गेला.. 
तो कोणी ठरवला तर   माणसांनी. 
(संपर्क क्षेत्नाच्या बाहेर - रवींद्र लाखे)

आगीनंतर काय होतं? जळलेल्याचं जातं !
खाकपण हेच उरतं नसलेल्यांशी नातं.
चटका बसलेले हात, धगीत पोळलेली पात
वणवलेल्या जंगलावर धुराचे फिरावे हात
तसे तुम्ही विचारता, काय बिघडलं आतल्याआत?
(तल्खली - माया पंडित)

तसेच राजीव नाईक आणि रवींद्र लाखे यांच्या काही कवितांमध्ये नाटकाची भाषाही आढळते. उदाहरणार्थ -

पहिल्या बॅटनपासून शेवटच्या बॅटनपर्यंत
स्पॉट्सची संख्या कशी कमी कमी होत गेलेली
त्यात, पुढे पुढे करणार्‍याला
फुट्स, एफओएचचा भरणा 
जाऊदे, मागेच बरं 
प्लॅटफॉर्मचा सहारा आणि कट -लाइट्सची साथ.
(कविताबिविता - राजीव नाईक)

अल्झायमर झाल्यावर
लेखकाने लिहिली एक संहिता.
तरुण रंगकर्मी वाचताहेत ती.
भंबेरी उडते आहे वाचताना.
दिग्दर्शक नट नेपथ्यकार प्रकाशयोजनाकार
यांना कळत नाहीये
कुठले भान ठेवावे जागरूक 
स्वत:चे की लेखकाचे?
(अवस्थांतराच्या कविता - रवींद्र लाखे)

आता हे तीनही संग्रह ज्या क्र माने वाचले त्या क्र माने मी आता त्यांच्यावर लिहीत आहे. प्रथम राजीव नाईक यांच्या कविताबिविता या काव्यसंग्रहाविषयी बोलू. आता कविताबिविता हा शब्द वाचताच मनात येतं की बिविता ही भानगड काय? कविता आपल्याला माहीत असतात; पण बिविता कुठे असतात? तर हा काव्यसंग्रह वाचल्यानंतर लक्षात येतं की, कविता आपण वाचतो आणि बिविता आपल्या मनात उमटतात.
करताकरविता  करवतो कविता
सृष्टीच्या  समष्टीच्या  संचिताच्या.
होय - नाही म्हणता
होऊन जातात बिविता
त्याच्या  तिच्या  त्यांच्या.
(गंमत म्हणजे संपर्कक्षेत्नाच्या बाहेर या रवींद्र लाखेंच्या
काव्यसंग्रहात बिविता याच नावाने कविता आहे.) या  बिवितांमुळे वाचकाला त्याचा स्वत:चा अवकाश मिळतो. नाटक पाहताना प्रेक्षकाने एकरूप होण्यापेक्षा अलिप्त होऊन पहाणे म्हणजे शहाणे होणे, हे जसे मानले जाते तसेच इथे कवितांबाबत होते.
आयुष्याचा अवधी एका विचाराएवढाच असतो  खरं तर 
खोटं तर अशा अनेक क्षणांचं मिळून होतं आयुष्य
चांगल्या नाटकाचा आणखी एक गुण म्हणजे जगण्यातील क्षणिक अद्भुततेला ते नाटक स्पर्श करते. हा गुण राजीव नाईक यांच्या कवितेत ठायी ठायी आढळतो. ही अद्भुतता जगण्यातले नवे प्रांत दाखवते. त्यातूनच आयुष्य विस्तारते. वाचक विचार करू लागतो. या संवादात भाषा महत्त्वाचा घटक आहे. मराठी नाटक करताना मराठी नाटकातील भाषा नादमय वजनाने बोलणे आपण कायमच महत्त्वाचे मानत आलो आहोत. राजीव नाईकांच्या कवितेमध्ये हे नादमय भाषेचे भान दिसते. 
कविताबिविता - मौज प्रकाशन / 
संपर्क क्षेत्नाच्या बाहेर आणि अवस्थांतराच्या कविता - 
कॉपर कॉइन प्रकाशन / तल्खली - शब्द प्रकाशन

atulpethe50@gmail.com
(लेखक प्रयोगशील रंगकर्मी आहेत.)

(उत्तरार्ध पुढच्या अंकात)

Web Title: Poems of Rajiv Naik, Ravindra Lakhe and Maya Pandit..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.