पद्मश्री डॉ. सदाशिवराव गोरक्षकर- संग्रहालयशास्त्रातले खंदे जाणकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 07:00 AM2019-07-21T07:00:00+5:302019-07-21T07:00:02+5:30

संग्रहालयशास्रातले खंदे जाणकार, इतिहासाचे अभ्यासक आणि सांस्कृतिक निरीक्षक अशा बहुविध ज्ञानाने समृद्ध असलेल्या पद्मश्री डॉ. सदाशिवराव गोरक्षकर यांचे नुकतेच देहावसान झाले. एका विलक्षण व्यक्तिमत्त्वाच्या सहवासातल्या या आठवणी !

Padmashri Dr. Sadhashivra Gorakskar. Knowledgeable museologist. | पद्मश्री डॉ. सदाशिवराव गोरक्षकर- संग्रहालयशास्त्रातले खंदे जाणकार

पद्मश्री डॉ. सदाशिवराव गोरक्षकर- संग्रहालयशास्त्रातले खंदे जाणकार

Next


-श्रीराम खाडीलकर

भारतातल्या सांस्कृतिक ठेव्याचे संरक्षण आणि संवर्धन करण्याच्या प्रक्रियेत तसेच आपल्या संस्कृतीच्या उन्नयन प्रक्रियेत संग्रहालयशास्त्र तसेच इतिहासातल्या प्रचंड ज्ञानाच्या आधारे मोलाची कामगिरी बजावलेले व्यक्तिमत्व अशीच पद्मर्शी डॉ. सदाशिवराव गोरक्षकर यांची ख्याती होती. पुरातन संदर्भ हवा असताना सदाशिवरावांना फोन केला तर आपले काम त्या क्षणाला होणार याची पक्की खात्री असायची. त्यांच्या देहावसानामुळे आता खरी आणि नेमकी माहिती क्षणार्धात मिळवणे कोणालाच शक्य होणार नाही. त्यांनी हा विश्वास अत्यंत पर्शिम घेऊन निर्माण केलेला होता.

जागतिक कीर्ती असलेले मुंबईतले छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय आणि गोरक्षकर यांचे नाते अतुट होते. संग्रहालयाला जनताभिमुख करण्याचे मोलाचे काम त्यांनी केले. 1964 मध्ये गॅलरी असिस्टंट म्हणून सेवेमध्ये रूजू झालेले सदाशिवराव गोरक्षकर 1974 मध्ये म्युझियमचे संचालक झाले आणि 1996 पर्यंत ते अविरत कार्यरत होते.

म्युझियमचे संचालक असलेल्या काळात असंख्य आव्हानांना त्यांनी तोंड दिले. संपूर्ण म्युझियमला फेरीवाल्यांनी विळखा घालून संपूर्ण परिसर विद्रुप आणि अस्वच्छ केला होता. सुमारे दीड वर्ष लढा देऊन तो वेढा त्यांनी उठवला. जहांगिर आर्ट गॅलरी आणि म्युझियम यांच्या जागेत एक बांधकाम झाले होते. तेसुद्धा दूर करण्यासाठी बरेच र्शम त्यांना करावे लागले. याबरोबर मुंबईच्या एका महापौरांनी म्युझियमच्या समोर असलेले शिल्प काढून त्याजागी दुसरे शिल्प उभारण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. ते रोखण्याची कामगिरी त्यांनी केली. अन्यथा, आज आपल्याला त्या ठिकाणी दुसरेच शिल्प दिसले असते. संपूर्ण म्युझियमला वेगळा चेहरा देण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी केले. 
 म्युझियम पाहताना वस्तुंना हात लावायची सवय लोकांना असते, ती बदलायची कशी असा प्रश्न गोरक्षकरांना पडायचा. म्युझियम कसे बघावे हे सर्वसामान्यांना शिकवले जायला हवे असे त्यांना नेहमी वाटत असे. म्हणूनच त्यांनी मुंबईतल्या त्यांच्या म्युझियमच्या की गॅलरीची खूप विचार करून मांडणी केली. ती पाहिली म्हणजे कुठे काय काय असेल याचा अंदाज प्रेक्षकाला येत असतो. म्हणूनच ती मांडणी खूप महत्त्वाची असते. त्याबद्दल काय विचार केला आहे ते  बर्‍याचदा समजावून सांगत असत. 

संचालक असल्याने म्युझियमच्याच आवारात गोरक्षकरांना राहायला बंगला होता. त्यामुळे ते उशिरापर्यंत संग्रहालयात काम करत बसायचे. या कामाला त्यांनी स्वत:ला वाहूनच घेतले होते. एक एक विषय घेऊन त्यावर म्युझियममध्ये प्रदर्शन भरवायचे हा त्यांचा हट्ट होता. स्वत:च स्वत:ला आव्हान द्यायचे आणि त्यासाठी अतोनात धडपड करून ते प्रकल्प यशस्वी करून दाखवयाचा हेच त्यांचे जगणे होते. सुरूवातीला तर विविध माध्यमात साकार झालेल्या गणपतीच्या प्रतिमा या विषयावरही त्यांनी प्रदर्शन भरवले. अशा प्रदर्शनाचा मुख्य फायदा काही मोजक्याच पण ख-या अभ्यासकांना नेहमीच होत गेला. नंतर कृष्णप्रतिमा या विषयावरही त्यांनी प्रदर्शन भरवले. शिल्पांमधला कृष्ण, वस्त्रांवर दिसणारी कृष्णप्रतिमा, लघुचित्रांमधला कृष्ण, दैनंदिन वापराच्या वस्तूंवरचे कृष्णदर्शन यानिमित्ताने त्यांनी घडवले. असे प्रदर्शन उभे करण्यासाठी मुळात म्हणजे कोणत्या गावात किंवा कोणाच्या संग्रहात नाहीतर कोणत्या संग्रहालयात आपली गरज असलेली कोणती कलावस्तू आहे याचा तपशिलवार अभ्यास असावा लागतो. तो तर त्यांचा होताच. त्याबरोबरच त्या विषयावर केलेल्या नोंदी, निघणारे निष्कर्ष आणि अभ्यास करण्यायोग्य तपशील लिखित रूपात प्रकाशितही करावा लागतो. ते कामसुद्धा त्यांनी भरपूर मेहनत घेऊन केले. 

आपण मेहनतीने उभे केलेले प्रदर्शन पाहून झाल्यावर प्रेक्षकांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी गोरक्षकर कायम उत्सुक असायचे. त्यावेळी  त्या प्रचंड विद्वान व्यक्तिमत्त्वात लपलेले बालक क्षणभर दिसत असे. गोरक्षकरांना भेटणे, त्यांच्याशी फक्त फोनवर बोलणे हा विलक्षण अनुभव असायचा. त्यांच्याशी साधालेल्या प्रत्येक संवादातून नेहमीच वेगळी माहिती आणि ज्ञानही मिळत असे.

विदेशातल्या भारत महोत्सवाच्या निमित्ताने मृग या विषयावर भरपूर अभ्यास करून एक प्रदर्शन उभे करून ते गोरक्षकरांनी बहुधा जपानला नेले. त्या प्रदर्शनाचे खूपच कौतुक झाले होते. जवळपास डझनभर विषयांवर अशी प्रदर्शने त्यांनी भरवलेली मी पाहिली आहेत. खास करून मौल्यवान कलावस्तू विदेशात नेल्या जाऊ नयेत असे मतप्रदर्शन केलेल्या गोरक्षकरांच्या सूत्रसंचालनाखाली विदेशात भरलेल्या प्रदर्शनातल्या कलावस्तू सुखरूप परत येतायत काय याकडे अनेकांनी डोळे लावले होते. सगळ्या कलावस्तू जशा होत्या तशा म्हणजेच सुखरूप परत आल्याने गोरक्षकरांच्या विरोधकांचा हिरमोड झाला.

 मेरीटाईम इंडिया हे गोरक्षकरांच्या आयुष्यातले सगळ्यात महत्त्वाचे प्रदर्शन होते. या प्रदर्शनाची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नोंद घेतली गेली. या प्रदर्शनासाठी त्यांनी अविरत पर्शिम घेतलेले मी पाहिले आहेत. नौकानयन हा विषय साधा वाटला तरी त्याचे अभ्यासाच्या आधारे संदर्भासह तपशील मिळवणे हे आव्हानच होते. या प्रदर्शनाच्या निमित्ताने वरूण या देवतेचे सर्वात प्राचीन शिल्प तर गोरक्षकरांनी मिळवलेच त्याचबरोबर नौकेचे संदर्भ असलेले देशभरातले ऐतिहासिक तपशील मुंबईत आणून त्यांची कालानुक्रम लावून अप्रतिम मांडणी केली. अशी अनेक प्रदर्शने त्यांनी भरवली आणि गैरसरकारी संस्था असूनही हे शक्य करून दाखवले. भारताची प्रतिमा जागतिक स्तरावर उंचावलेली असावी यासाठी ट्रस्टच्या म्युझियमचे संचालक असूनही त्यांच्यावर भारत सरकारने परदेशात प्रदर्शने आयोजित करण्याची तसेच अनेक कार्यशाळांमध्ये बैठकांमध्ये भारताची बाजू भक्कमपणे मांडण्याची जबाबदारी वेळोवेळी सोपवली यातच त्यांचे महत्त्व अधोरेखित होते.

देशातली विविध संग्रहालये काहीतरी उपक्रम करतायत. पण, मुंबईतले छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय काहीच करत नाही अशी टीका श्रीमती पुपुल जयकरांनी केली, तेव्हा पंतप्रधानपदी असलेल्या श्रीमती इंदिरा गांधी यांना आमंत्रित करून वस्तुस्थिती दाखवून देण्याचे काम गोरक्षकरांनी केले. त्यावेळी इंदिराजींची म्युझियमला काही मिनिटांपुरती ठरलेली भेट तासभर लांबली आणि सरकारी संग्रहालयांना मिळणा-या सगळ्या सुविधा मुंबईची शान असलेल्या या म्युझियमलाही मिळायला लागल्या. याचे श्रेय फक्त एकट्या गोरक्षकरांनाच द्यावे लागेल. या घटनेपासून गोरक्षकरांचे आणि इंदिराजींचे संबंध खूपच चांगले झाले.

कार्ल खंडाळावाला आणि मोती चंद्र अशांसारखे संग्रहालयशास्त्रातले जाणकार गोरक्षकरांच्या ज्ञानावर आणि प्रत्येक कामगिरीवर खूश असायचे यातच त्यांचे सारे मोठेपण सामावलेले आहे. आपल्या हयातीत जगभर फिरताना लक्षावधी रुपये खर्च करून सवरेत्तम दर्जाची लघुचित्रे कार्ल खंडाळावाला यांनी स्वत:च्या खाजगी संग्रहासाठी खरेदी केली आणि त्यांच्या खंडाळ्याच्या  बंगल्यात ठेवली होती. आपल्यानंतर त्यांचे काय होणार याची त्यांना काळजी वाटत असे. राज्यशासन तो संग्रह जतन करण्याचे काम नक्कीच करू शकेल असा सल्ला त्यांना देण्यात आला. आपल्या संग्रहातली सगळी लघुचित्रे ती जिथे ठेवली आहेत त्या बंगल्यासह एकही पैसा न घेता शासनाच्या ताब्यात देण्याची तयारी कार्ल खंडाळावाला यांनी दाखवली होती. मात्र शासनाच्या उदासीन वृत्तीमुळे कोट्यवधी रुपयांची मौल्यवान लघुचित्रांची संपत्ती कपर्दिकही खर्च न करता स्वीकारण्याची साधी तयारीही दाखवली गेली नाही. या प्रकाराने खंडाळावाला निराश झाले. अशा स्थितीत केवळ गोरक्षकरांवर विश्वास ठेवून ती अनमोल लघुचित्रे खंडाळावाला यांनी गैरसरकारी प्रिन्स ऑफ वेल्स म्हणजे आजच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालयाकडे निश्चिंत होऊन सोपवली. कारण, त्या म्युझियमचे संचालक डॉ. गोरक्षकर होते. गोरक्षकरांच्या अखत्यारीत लघुचित्रांचा तो अनमोल ठेवा सुरक्षित राहील याची खंडाळावाला यांना पक्की खात्री होती.

एकदा तर आपल्या देशातले अत्यंत प्रसिद्ध असलेले नटराजाचे प्रसिद्ध शिल्प गायब झाल्याची घटना घडली होती. प्रयत्नपूर्वक ते मिळवले गेले. तसेच त्यानंतर काही वर्षांनी प्रदर्शनासाठी विदेशात पाठवलेल्या काही शिल्पांना किरकोळ इजा पोहोचल्याच्या घटना घडल्या होत्या. सर्वात कळस म्हणजे सुमारे सहा फूट उंचीचे चुनखडीच्या दगडात घडवलेले  ‘दीदारगंजची चामरधारिणी’ नावाचे जगप्रसिद्ध भारतीय शिल्प एका आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाच्या निमित्ताने भारताच्याबाहेर पाठवण्यात आले होते. प्रदर्शन झाल्यानंतर जेव्हा ते शिल्प भारतात परत आले तेव्हा त्या शिल्पाला इजा पोहचलेलीअसल्याचे लक्षात आले. अशा कलावस्तू हाच तर त्या-त्या देशाचा अनमोल ठेवा असतो, संपत्ती असते. तिलाच धक्का लागल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली. अशा परिस्थितीत विविध थरांमधून संताप व्यक्त केला गेला आणि ते स्वाभाविकही होते. असा मौल्यवान कलाकृतीच्या रूपातला ठेवा देशाच्या बाहेर जाताच कामा नये अशी सूचना राष्ट्रीय स्तरावरील तीन तज्ज्ञांनी केली. त्यात देवांगना देसाई आणि स्वाली यांच्यासमवेत डॉ. सदाशिवराव गोरक्षकर सुद्धा होते. त्यांनी ज्या सूचना केल्या होत्या त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली किंवा नाही याची कल्पना नाही. मात्र, त्यानंतर कोणत्याही कलावस्तूची देशाबाहेर तोडफोड झाल्याचे ऐकिवात आले नाही.

अनेक गोष्टींबद्दलची डॉ. गोरक्षकरांची मते ठाम होती आणि ती वेळोवेळी ते व्यक्तही करत असत. प्रमोद नवलकर हे राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री असताना ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या वास्तूंचे नामकरण करताना व्हिक्टोरिया टर्मिनसला जगन्नाथ शंकरशेठ यांचे नाव देणे योग्य होईल आणि पुण्याजवळ असलेल्या नॅशनल डिफेन्स अँकॅडमीला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देणे योग्य ठरेल, रेल्वेस्टेशनला योग्य ठरणार नाही असे स्पष्टपणे सांगितले होते. पुरातन वास्तू काय किंवा वस्तू काय, त्यांच्या जतनाचे तसेच संवर्धनाचे काम करताना येणा-या मुख्य अडचणी म्हणजे सरकारी बाबू लोकांचा असहकार आणि राजकीय इच्छाशक्तीचा अभाव या आहेत असे गोरक्षकरांचे ठाम मत होते.  संग्रहालयाचे संचालक म हणून काम करताना आलेल्या अनुभवातून त्यांचे असे मत बनले होते. याच कारणामुळे सगळी वस्तूसंग्रहालये सरकारी नसावीत तर ती स्वायत्तच असावीत असा त्यांचा सतत आग्रह असायचा. मुंबईतले छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय आजवर स्वायत्त राहू शकले यामागे ज्यांचे प्रयत्न कारणीभूत आहेत त्यात संचालक डॉ. गोरक्षकरांचाही समावेश आहे.

आपण जी गोष्ट करायची ती शंभर टक्के अचूक, नेमकी आणि आपल्याच मनाजोगी झाली पाहिजे तसा त्यांचा आग्रह असे. मग ते संग्रहालयातले प्रदर्शन असो किंवा त्यांच्या घरातली एखादी गोष्ट असो. सेवानिवृत्तीनंतर कुठे आणि कसे राहायचे याचा पूर्ण विचार त्यांनी आधीच करून ठेवला होता. आदिवासींमध्ये राहून उर्वरित आयुष्य जगायचे हा त्यांचा ध्यास होता. मुंबईची गर्दी आणि गोंगाटापासून दूर नदीच्या काठावर स्वत:ला हवे तसे घर बांधून त्यात राहायचे हे त्यांचे स्वप्न होते. ते प्रत्यक्षात आले आणि एक दिवस फोन आला,  ‘श्रीराम, नव्या घरात कधी येतोयस?’
 

प्रत्यक्षात तिथे गेल्यावर त्यांच्या मनात होते तसेच घर त्यांनी बांधले.  आसर्‍यापुरताच भिंती आणि छत असलेले घर असावे.अशी गोरक्षकरांची कल्पना होती. तसेच ते नदीच्या काठावर होते. घराला भिंतींपेक्षा खिडक्याअधिक होत्या. भवताली छानसे शेत होते. शहरातल्या वॉचमनचे  काम तिथे त्यांनी पाळलेल्या -होडेशियन जातीसारखा एक विलक्षण चपळ कुत्रा होता तो करायचा. अशा  स्वप्न पाहून ते प्रत्यक्षात आलेल्या मनाजोग्या वास्तूमध्येच त्यांनी प्राण सोडले. 

संस्कृतीरक्षणाच्या ध्येयाने भारलेल्या गोरक्षकरांचे जीवन म्हणजे एखाद्या ध्यासाने झपाटलेल्या कर्मयोगी पुरूषाचे जगणे होते. त्यांच्या कार्याची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना पद्मर्शी देऊन सन्मानित करत त्यांच्या कार्याचा गौरव केला. ज्या विषयात मौजमजा नाही. आर्थिक लाभही फारसा नाही. मानमरातब आणि सामाजिक प्रतिष्ठाही फारशी नाही अशा या विषयात त्यांची गादी पुढे चालवणारा आजतरी कोणी दिसत नाही. म्हणूनच त्यांची उणीव यापुढे सतत भासत राहील यात शंका नाही.

(लेखक ज्येष्ठ कला समीक्षक आणि दृश्यकला अभ्यासक आहेत.)

shriramk1@rediffmail.com
 


 


 

Web Title: Padmashri Dr. Sadhashivra Gorakskar. Knowledgeable museologist.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.