निमित्त- पुण्यातील पेठांमधील उरुस...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2019 07:00 AM2019-05-19T07:00:00+5:302019-05-19T07:00:03+5:30

ग्रामीण भागात मार्गशीर्ष महिना सुरू झाला, की सर्व गावांमध्ये यात्रा सुरू होतात. पुण्यातदेखील वेगवेगळ्यापेठांमध्ये वर्षानुवर्षे अशा यात्रा होतात. अर्थात, त्याला आपण उरूस असे म्हणतो... ग्रामीण भागात मार्गशीर्ष महिना सुरू झाला, की सर्व गावांमध्ये यात्रा सुरू होतात.पुण्यातदेखील वेगवेगळ्यापेठांमध्ये वर्षानुवर्षे अशा यात्रा होतात. अर्थात, त्याला आपण उरूस असे म्हणतो. त्याविषयी...

occasion - Urus in Pune's Peth ... | निमित्त- पुण्यातील पेठांमधील उरुस...

निमित्त- पुण्यातील पेठांमधील उरुस...

googlenewsNext

- अंकुश काकडे- 
ग्रामीण भागात मार्गशीर्ष महिना सुरू झाला, की सर्व गावांमध्ये यात्रा सुरू होतात. त्या पौष महिन्यापर्यंत सुरू असतात. अर्थात, यांपैकी अनेक ठिकाणी श्री खंडोबा, भैरवनाथ, म्हसोबा यांच्या यात्रा असतात. साधारण २-३ दिवस त्या यात्रा होतात. पहिला दिवस सकाळी धार्मिक विधी, दुपारी बैलगाडा शर्यत, रात्री तमाशा तोही दुसऱ्या दिवशी दुपारी १२ पर्यंत असायचा, तर सायंकाळी कुस्त्यांचा फड रंगायचा. जिल्ह्यातील नामवंत पैलवान अशा ठिकाणी आपली उपस्थिती लावत. काही ठिकाणी तर राज्यातील अतिशय गाजलेले नामवंत पैलवानदेखील आवर्जून येत. साधारणत: देवाला गोड पुरणपोळीचा नैवेद्य, तर येणाऱ्या पाहुणे मंडळींना तिखट मटण-भाकरी-भात यांचे जेवण. काही ठिकाणी जेवणाच्या बरोबर सोमरसही आवर्जून असायचा. काही मंडळी केवळ त्यासाठीच तिकडे जायची.

पुण्यातदेखील वेगवेगळ्या पेठांमध्ये वर्षानुवर्षे अशा यात्रा होतात. अर्थात, त्याला आपण उरूस असे म्हणतो. साधारणत: चैत्र-वैशाख महिन्यांत हे उरूस साजरे होतात. अशाच काही उरसांचा वेध आज आपण घेत आहोत. अर्थात, यामध्ये काही उरसांची माहिती मिळते त्याला ऐतिहासिक, धार्मिक किंंवा सामाजिक अधिकृतपणा मिळत नाही. काही उरूस तर शेकडो वर्षांपासून होत आहेत. आज जी मंडळी तो साजरा करीत आहेत, तीदेखील त्याबाबत सविस्तर अधिकृत माहिती देऊ शकत नाही. पणजोबा-आजोबा-वडिलांपासून येथे उरूस होतोय तोच आम्ही पुढे चालू ठेवलाय, असेच उत्तर अनेक ठिकाणी मिळते. पण, सद्गुरू जंगलीमहाराज आणि रोकडोबा यांचा होणारा उरूस याला मात्र अधिकृत इतिहास आहे, हे पाहायला मिळते.
शिवाजीनगरमधील सद्गुरू जंगलीमहाराज यांनी ४ एप्रिल १८९० रोजी समाधी घेतली आणि तेव्हापासून महाराजांचा उरूस सुरू झाला. जंगलीमहाराज मंदिरात सर्व धार्मिक पंथांतील लोक येत असतात. महाराजांना गल्लफ चढविण्याचा मान त्या वेळेपासून शिरोळे घराण्यातील कै. रंगराव, कै. लक्ष्मणराव, कै. भाऊसाहेब व आता श्रीकांत शिरोळे यांच्याकडे आहे. त्यानंतर रात्री उशिरा संदल याचा मानसुद्धा याच शिरोळे घराण्याकडे असून ती परंपरा आजपर्यंत पुढे चालू आहे. संदल, पालखी, छबिना, भजन-कीर्तन असे धार्मिक कार्यक्रम नित्यनेमाने येथे चालू असतात. पूर्वपरंपरागत शिरोळे, बहिरट ही तेथील खानदानी मंडळी. त्यांनी हा उरूस चालू केला आणि आज जवळपास १३० वर्षे सध्याची तरुण पिढीदेखील तो उत्साहात साजरा करीत आहे. सध्या तेथील परिसर हा मोबाईल मार्केटमुळे फुलला असल्यामुळे मंदिराची विद्युतरोषणाई व इतर धार्मिक कार्यक्रमही मोठ्या प्रमाणात होतात. या उरसाचं एक वैशिष्ट्य म्हणजे येथे दारू, मांसाहार, तमाशा, कुस्ती असे काही नसते. जंगलीमहाराजांचा उत्सव झाला, की लगेच दुसऱ्या दिवशी हनुमान जयंतीला रोकडोबा महाराज उरूस असतो. शिवाजीनगर गावठाणात होणारा हा उरूसदेखील पुरातन काळापासून चालू आहे. उरसाच्या दिवशी गावठाणातील प्रत्येक घरातून रोकडोबांना नैवेद्य दिला जातो. या दोन्ही उरसांत गावाकडचे पारंपरिक कार्यक्रम नसतात.
औध येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ. औध हे गाव ग्वाल्हेरच्या शिंंदे घराण्याला दत्तक दिलेले गाव होते. हे आज सांगीतले तर आश्चर्य वाटेल; पण गेली कित्येक वर्षे मे महिन्याच्या एका रविवारी या भैरवनाथाचा उरूस होतो. पूर्वी पालखी सोहळा, छबिना, रात्रभर तमाशा, दुसऱ्या दिवशी कुस्त्यांचा आखाडा असे त्याचे स्वरूप. आता मात्र बदलत्या काळात तमाशा वगैरे बंद झालेत. तसेच पूर्वीसारखा कुस्त्यांनादेखील प्रतिसाद मिळत नाही, ही खंतही दत्तात्रय गायकवाड यांनी व्यक्त केली. वर्गणी काढून हा साजरा होतो. गायकवाड, रानवडे, कलापुरे, जुनवणे, चोंधे अशी तेथील जुनी मंडळी आजही उरसाची परंपरा पुढे नेत आहेत. वेताळमहाराज टेकडी आपणा सर्वांना माहीत आहे. अनेक जण सकाळ-संध्याकाळी तेथे फिरण्यासाठी, व्यायामासाठी जातात. वेताळमहाराजांचे वास्तव्य तेथे होते, त्यावरूनच त्या टेकडीला हे नांव प्रचलित झालं. चैत्र पाडव्याला भल्या पहाटे ४ वाजता गोखलेनगर येथील वेताळमहाराज मंदिरापासून टेकडीवरील मुख्य मंदिरापर्यंत पालखी पळवत नेऊन ती पुन्हा गोखलेनगर येथे येते. उरूस तेथे साजरा केला जातो. हे जागृत देवस्थान आहे, असे नागरिक सांगतात. या उरसाची सुरुवात रामोशी समाजाच्या लोकांनी केली, असे समजते. आजही पालखीचा मान त्यांच्याकडेच आहे. पैलवान शंकर जाधव यांचे कुटुंबीय तो मान सांभाळत आहेत. आता वडारवाडीतील दीप बंगला चौकातील महालेनगरमध्ये अक्षय तृतीयेला साजरा होणारा म्हसोबाचा उरूस हादेखील जवळपास ५० वर्षांपासून सुरू आहे. म्हसोबादेवाची पालखी, छबिना, रात्रभर तमाशा, देवाला गोड नैवेद्य तर पाहुणे मंडळींना तिखटाचे जेवण आजही वर्षानुवर्षे चालू आहे. कै. प्रमोद महाले, कै. रामभाऊ कांबळे, कै. महंमद इनामदार यांनी सुरू केलेला हा उरूस आता त्यांची पुढील पिढी पुढे नेत आहे.  दर वर्षी १४ मे रोजी साजरा होणारा दत्तवाडीतील म्हसोबारायाचा उरूस. १९६२च्या पानशेत पुरानंतर झालेली ही वसाहत. सर्व जाती-धर्मांचे लोक येथे आपणास पाहावयास मिळतात. साधारणत: १९६४-६५च्या दरम्यान फाळके, केंजळे, राऊत, शेंडकर या त्या वेळच्या मंडळींनी छोटेसे म्हसोबाचे मंदिर बांधले आणि हा उरूस सुरू झाला. सुरुवातीच्या काळात या उरसाचं स्वरूप अगदी मर्यादित होतं; पण पुढे-पुढे येथील वस्ती वाढत गेली. बैठी घरं जाऊन आता तेथे सर्वत्र ३-४ मजली भव्य इमारती पाहावयास मिळतात. शहरात येणारा मोठा मार्ग असल्यामुळे मुख्य रस्ता हा बाजारपेठेने फुलून गेलाय. आता तर भव्य दुमजली मंदिर झालंय. येथे असलेल्या पीरबाबाला चादर चढवून उरसाची सुरुवात होते, हे या उरसाचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. त्यानंतर ३-४ दिवस तेथील जत्रा खरोखर पाहण्यासारखी असते. एके दिवशी बालजत्रा भरवली जाते. येणाºया सर्व बाळगोपाळांना मोफत खेळ, जादूचे, मनोरंजनाचे कार्यक्रम तर गेली काही वर्षे तिसºया दिवशी कुस्तीचा आखाडा ‘अखिल दत्तवाडी श्री’ किताब श्रीफल, चांदीची गदा, रोख रुपये २१ हजार हे प्रथम, तर चषक आणि १८ हजार रुपये रोख असे दुसरे बक्षीस अशा ८ गटांत स्पर्धा होतात. पै. नीलेश गायकवाड यांच्या पुढाकाराने ह्या स्पर्धा होत असतात. रक्तदान, आरोग्य शिबिराचं आयोजन याचबरोबर भजन-कीर्तन, पालखी, छबिना, तमाशा, सांस्कृतिक कार्यक्रम आजही होतात. 
    (पूर्वार्ध)

(लेखक प्रसिद्ध राजकीय-सामाजिक कार्यकर्ते आहेत.)

Web Title: occasion - Urus in Pune's Peth ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे