घरोघरच्या निरुपा रॉय

By admin | Published: November 11, 2016 05:57 PM2016-11-11T17:57:14+5:302016-11-12T15:03:46+5:30

अन्यायाचं राजकारण करून सहानभूती मिळवून सत्ता गाजवण्यात भारतीय बायका प्रसिद्ध आहेत. कुटुंब पातळीवर त्याची सुरु वात होत असते.

Nirupa Roy from house to house | घरोघरच्या निरुपा रॉय

घरोघरच्या निरुपा रॉय

Next

 
- सचिन कुंडलकर

अन्यायाचं राजकारण करून 
सहानभूती मिळवून सत्ता गाजवण्यात 
भारतीय बायका प्रसिद्ध आहेत. 
कुटुंब पातळीवर त्याची 
सुरु वात होत असते. 
मराठी सिरीअलच्या 
लेखकांना लाज वाटेल 
आणि त्यांची मान शरमेने 
खाली जाईल इतके सुंदर एपिसोड 
भारतातल्या गृहिणी 
घरात बसून तयार करत असतात. 
पोटच्या पोरांना 
नवऱ्याच्या विरोधात नेऊन 
आपल्या बाजूने वळवणे 
हाच याचा उद्देश असतो. 
पितृसत्ताक पद्धतीविरुद्ध 
मुलांना वापरून घेऊन बायका बंड करीत असतात.



लहानपणी आम्ही जो हिंदी सिनेमा पाहायचो, त्यात कुणीतरी कुणावर तरी अन्याय करीत असे आणि मग काही वर्षांनी कुणीतरी त्याचा बदला घेत असे. मला बदल्याचे प्रसंग फार आवडत असत. विशेषत: शक्ती कपूर वगैरे लोकांना सिनेमातल्या हिरॉइनी हाणामारी करून सिनेमाच्या शेवटी लोळवत असत तेव्हा मजा येत असे किंवा हिरो बदला घेण्यासाठी व्हिलनचा खून करत असे तेव्हा फार बरे वाटत असे. 
वर्षानुवर्षे भारतामध्ये रामायणच सिनेमाच्या रूपात पुन्हा पुन्हा बनवले जात असे. राखी ही नटी स्वत: बदला घेत नसे. ती तिची मुले अनेक वर्षांनी परत येऊन अमरीश पुरीला मारतील या आशेवर जगत असे. वणवण फिरत असे. रेखा मात्र आपली कामे इतरांना सांगायची नाही. ती स्वत:च बदला घ्यायची. कारण रेखाला मुले होणेच मान्य नव्हते. 
आपल्यावरून इतरांवर नजर गेली तर आपले सौंदर्य कोण पाहील? मुले झाली की तरुण सुना येणार. त्या सुना कपडे काढून बागेत नाचणार. मग प्रेक्षक त्यांनाच पाहत बसणार. त्यापेक्षा नकोच ते. ती हृतिक रोशनची आजी झाली पण आई वगैरे होण्यात तिने वेळ घालवला नाही. डायरेक्ट आजी आणि ती पण हृतिकची. उगाच कुणी सायडी नाही. रेखा बदला घ्यायची तेव्हा ती आपले रूप संपूर्ण बदलून येत असे. प्रेक्षक सोडून तिला त्या नव्या रूपात कुणी ओळखत नसे आणि मग ती व्हिलनला प्रेमात पाडून योग्य वेळी त्याचा बदला घेत असे. श्रीदेवी सहसा मनुष्यरूपात बदला घेत नसे. ती नागीण बनून यायची. मला अजूनही स्वप्नांत तिचे ते भप्पकन उघडणारे नागिणीचे घारे डोळे येतात आणि मी घाबरून जागा होतो.
मी कुणावर कधी इतका अन्याय केलेला नाही की कुणी माझा बदला घ्यावा. कधीतरी पार्किंग करताना मागच्याची गाडी ठोकली आहे. फारतर फार कधी सिनेमाच्या सेटवर आरडओरडा करून लोकांचे थोडे अपमान केले आहेत. एका मैत्रिणीचा नवरा शाकाहारी होता, त्याला मासे खायची आवड निर्माण केली आहे. 
एक बिचारा मित्र फार लहानपणी लग्न करून पस्तीशिलाच कंटाळला होता त्याची काही हुशार, तरतरीत आणि देखण्या मुलींशी ओळख करून दिली आहे. पण कुणी माझा अगदी बदला घ्यावा असे हातून अजून काही घडलेले नाही. 
अमरीश पुरी बिचारे! किती बायकांकडून किती मार खाऊन घ्यावा त्या माणसाने? आमचे सर्वच्या सर्व बालपण अमरीश पुरी, शक्ती कपूर, सदाशिव अमरापूरकर ह्यांची अनेक स्त्री-पुरुषांकडून शेवटी होणारी पिटाई बघण्यात गेले. मला अमरापूरकर प्रत्यक्ष भेटले तेव्हा सेटवर पहिले काही दिवस त्यांचा उगाच राग येत असे. पण तो व्यर्थ होता. कारण तो राग त्यांचे लहानपणीचे सिनेमे पाहून मनात तयार झाला होता. प्रत्यक्षात किती सौम्य आणि शांत माणूस. त्यांचा बदला कुणी कशाला घ्यावा? 
आपल्या घरातील आया माझ्यासारख्या घरबैठ्या मुलाला नेहमी, ‘मी लग्न करून घरात आले तेव्हा मला घरात कसे सगळ्यांनी वाईट वागवले’ ह्याच्या गोष्टी सांगत बसतात. कुणीही सुज्ञ बालक आपल्या आईने सांगितलेल्या तिच्यावर झालेल्या अन्यायाच्या कहाण्यांमधून सुटका करून घेऊ शकत नाही. कारण भारतीय बायका ह्या नेहमी अन्यायाचे राजकारण करून सहानभूती मिळवून सत्ता गाजवण्यात प्रसिद्ध आहेत. कुटुंब पातळीवर त्याची सुरु वात होत असते. मी होते म्हणून ह्या सगळ्यांना सहन केले. एखादी असती तर केव्हाच हे घर सोडून पळून गेली असती. माणसे ओळखायला शिक. आपल्या घराण्यात हे तात्या तसे आहेत. हे अण्णा असे आहेत. ही बाबी आतल्या गाठीची आहे. तो बाबा नुसते गोड बोलतो. मराठी सिरीअलच्या लेखकांना लाज वाटेल आणि त्यांची मान शरमेने खाली जाईल इतके सुंदर एपिसोड भारतातल्या गृहिणी घरात बसून तयार करत असतात. ह्याचा मूळ उद्देश हा सर्व पोटच्या पोरांना नवऱ्याच्या विरोधात नेऊन आपल्या बाजूने वळवणे हाच असतो. पितृसत्ताक पद्धतीविरुद्ध बायका मुलांना वापरून घेऊन बंड करीत असतात. अशा बायकांकडून गृहिणी असण्याचे इतके मोठे भांडवल केले जाते की विचारता सोय नाही. 
‘आपली आई आपल्या वडिलांपेक्षा जास्त चांगली आहे. तिने खूप सहन केले आहे. वडील एक तर अन्यायी आहेत किंवा लेचेपेचे आहेत’ अशी शिकवण खूप अनावश्यक आणि सतत बडबड करून भारतीय आया आपल्या मुलांना देत राहतात. आमच्या पिढीत बहुसंख्य बायका घरी बसून घरकाम करीत असत. घराबाहेर पडून कष्ट करून कामात यश मिळवणाऱ्या बायकांविषयी त्यांच्या मनात असूया तयार होत असे आणि मग त्यातून गृहिणी असण्याचे आणि घरकामाला प्रतिष्ठा मिळण्याचे फार मोठे भांडवल करणे भारतातल्या बायकांनी सुरू केले. मराठी साहित्यातील अनेक बायकांची आत्मचरित्रे आपण वाचली तर ती स्वत:विषयी कमी आणि नवऱ्याविषयी जास्त अशी असतात. मला लहानपणी कोणताही हिंदी सिनेमा पाहून घरी आलो की अशी भीती वाटायची की कोणत्याही क्षणी आई उठेल आणि आपल्याला काका, मामा, आजी, आजोबा, शेजारच्या ठमाकाकू, मागच्या अंगणातील शकूमावशी ह्यांचे बदले घ्यायला लावेल. ‘तुझे अपने मां की सौगंध’ असे काहीसे म्हणून. मग मी काय करणार? मला व्यायाम करायला हवा. घोडेस्वारी, बंदुका चालवायला शिकायला हवे. चालत्या ट्रेनवर उभे राहून पुणे सोडून बदला घ्यायला आईच्या माहेरी जाता यायला हवे. 
कॉलेजात, उमेदवारीच्या दिवसात आमच्या सोबत काम करणाऱ्या तरु ण मुलीसुद्धा मी हे करीन आणि मी ते करीन असे म्हणणाऱ्या असल्या तरी संध्याकाळी सात नंतर त्यांना घरी सोडायला जावे लागत असे. त्यांना प्रवासाला गेल्यावर आपापले सामान उचलता येत नसे. वय वाढले तरी साधे ड्रायव्हिंग करता येत नसे. त्या मुली समाज मला हे करू देत नाही, समाज मला ते करू देत नाही असे बोलत बसायच्या. 
कधीतरी कोणत्यातरी कोपऱ्यातल्या नाटकाच्या स्पर्धेत एखादी ढाल मिळाली कीआपण अभिनय क्षेत्रातील राणी असल्यासारख्या वागायच्या. खूप बडबड करणाऱ्या आणि मला हे करायचे आहे, मला ते करायचे आहे असे बोलणाऱ्या त्या सर्व मुली श्रीमंत आणि कर्तृत्ववान मुलांशी लग्न करून साडी पदरात गुंडाळल्या गेल्या किंवा सरळ अमेरिकेला पसार झाल्या. गप बसून काम करणाऱ्या आणि नाव कमावणाऱ्या हुशार मुली मी आमचे पूर्वेचे आॅक्सफर्ड गाव सोडून मुंबईला येईपर्यंत पाहिल्या नव्हत्या. 
अशा सर्व मुली आपापल्या घरात बसून दुस्वासाची भावना निर्माण करून समाजात आणि कुटुंबात मोठ्या प्रमाणावर चुकीचे राजकारण करताना आपल्याला दिसतात. मराठी सिरीअल चालतात त्या ह्या सगळ्या रिकाम्या बायकांमुळे. 
घरकाम आणि कुटुंब चालवणं ही फार सुंदर गोष्ट आहे आणि ती महत्त्वाची आहे, पण त्याचे प्रमाणाबाहेर भांडवल करण्याइतकी ती अवघड नाही. गृहिणी बनून घर चालवणं हा आपला वैयक्तिक निर्णय असतो. त्यासाठी सतत दुसऱ्याला जबाबदार धरून सर्वांच्या मनात आपल्याविषयी सहानुभूती तयार करण्याचे मूर्खासारखे प्रयत्न करणे भारतीय गृहिणींनी थांबवायला हवे.
आईच्या हातचा स्वयंपाक, तिची चव, तिने भोगलेले कष्ट ह्या गोष्टी प्रमाणाबाहेर मोठ्या करून घरात त्याचे बॅनर करून लावायची गरज नसते. नवरा हा नेहमी दुष्ट नसतो आणि लेचापेचा नसतो. घरातल्या लहान मुलांसमोर चुकीची बडबड करणे बंद केले तर ती मुले आपल्या कौटुंबिक राजकारणातून मोकळी होऊन बाहेर पडून काहीतरी चांगले काम करतील ह्याची काळजी पालक म्हणून दुपारचा वेळ रिकामा असणाऱ्या बायकांनी घ्यायला हवी. 
आणि जो कष्ट करून घरासाठी आणि कुटुंबासाठी पैसा कमावतो आणि घर कष्टाने वर आणतो किंवा आणते त्या स्त्रीची किंवा पुरु षाची किंमत घरी बसून वरणभात करून आणि जुन्या कापडाचे पडदे शिवून दुपारी टीव्ही बघणाऱ्या व्यक्तीपेक्षा जास्त असणार ह्याचे साधे आणि व्यावहारिक ज्ञान भारतीय गृहिणीला यायला हवे. 
खरे तर फार पूर्वीच यायला हवे होते. पण उशिरा आले तरी बिघडणार नाही. आपण निरु पा रॉय होणे आतातरी बंद करूया. कारण काळ बदलला आहे.

Web Title: Nirupa Roy from house to house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.