मेट्रो ३ : मुंबईच्या पोटातली कालवाकालव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 06:03 AM2018-12-02T06:03:00+5:302018-12-02T06:05:08+5:30

जमिनीच्या खाली एकवीस मीटर खोल धावणारं कित्येक किलोमीटर लांब भुयार खोदून ‘मुंबई मेट्रो-३’ची उभारणी चालू आहे. काय चाललंय त्या तिथे.. आत? - एक शोध !

Metro 3: The secret hidden in the core of Mumbai | मेट्रो ३ : मुंबईच्या पोटातली कालवाकालव

मेट्रो ३ : मुंबईच्या पोटातली कालवाकालव

Next
ठळक मुद्देजमिनीच्या पोटातून मुंबईची मेट्रो जाणार हे माहिती असतं ज्याला-त्याला. पण वरून सगळं शहर रोजच्या लयीत धावत असताना त्याच्या पोटात मात्र एक नवी दुनिया उभी राहाते आहे, त्या दुनियेची कल्पना करणंही अशक्य.

- स्नेहा मोरे

(छायाचित्र : दत्ता खेडेकर)

मुंबई म्हटलं की, त्यासोबत लाखो लोकांची खच्चून भरलेली स्वप्नं, धडपड, यश-अपयश, सळसळता उत्साह आणि अपरिहार्य वेग हे सगळं ओघानं आलंच. मुंबई दिवसा जेवढी धावपळीची असते, तितकीच रात्री निवांत ! या नगरीचे किती चेहरे. तुम्ही हाडाचे मुंबईकर असा वा नसा, पण हे शहर तुम्हाला कवेत घेतंच. या शहराचं प्रेमही डंख असावा इतकं थेट. एकदा ती सुई रक्तात टोचली, की मुंबईतल्या माणसाला मुंबईविना जगणं अशक्यच होतं.
- आणि हे जगणंही रोज, हरक्षणी नव्या आव्हानांचं. साधं घरून आॅफिसात आणि आॅफिसातून घरी पोहचणं हीदेखील रोजची शौर्यकथाच असते ! या रोजच्या युद्धात हल्ली मुंबईने एक नवी आघाडी उघडलीय. मेट्रो. मेट्रोच्या भुयारी मार्गांचं काम सुरू असलेले मुंबईचे रस्ते हल्ली छाताडात खोदल्या जाणाऱ्या भुयारांनी छिन्नविछिन्न होऊन रणभूमीवर घायाळ पडलेल्या अपमानित योद्ध्यासारखे रक्तबंबाळ आहेत. त्यांच्या विव्हल छाताडांवरची अजस्र यंत्रसामग्री, त्याचा कर्कश्श घरघराट, त्या वेटोळ्यात अडकलेल्या वाहनांची धुरकट कोंडी आणि त्यातून तिळातिळाने पुढे सरकू पाहणारा हतबल मुंबईकर हे हल्लीचं चित्र रोज दिसतं.
- जमिनीच्या पोटातून मुंबईची ही मेट्रो जाणार हे माहिती असतं ज्याला-त्याला. पण वरून सगळं शहर रोजच्या लयीत धावत असताना त्याच्या पोटात मात्र एक नवी दुनिया उभी राहाते आहे, त्या दुनियेची कल्पना करणंही जिथे केवळ अशक्य, तिथे प्रत्यक्षच त्या जगात ‘उतरायला’ मिळालं तर? जिच्या अंगाखांद्यावर आपलं आयुष्य घडतं, त्या मुंबईच्या ‘पोटात’ शिरता आलं तर?
२६/११. मुंबईच्या काळजावर खंजिराने कोरलेली तारीख.
त्याच दिवशी मुंबईच्या ‘पोटात’ शिरायला मिळणार होतं. दुपारी साडेतीनच्या सुमारास ट्रॅफिकमधून वाट काढत कसंबसं आझाद मैदान गाठलं. मेट्रोसिनेमा समोरचं गेट थेट प्रकल्पाच्या प्लाण्टमध्ये पोहोचतं. तिथून आत शिरले. डोक्यावर हेल्मेट आणि सेफ्टी शूज नसल्याने इंजिनिअर्सनी हटकलं, मग आझाद मैदानातल्या एमआरसीसीच्या आॅफिसमध्ये जाणं आलं. मेट्रो प्रकल्पात भागीदार असणाºया सर्वांना या मैदानात छोटे-छोटे तात्पुरते गाळे उभारून दिले आहेत, आम्ही सगळे तिथे जमलो. एका सिनिअर इंजिनिअरने सर्वांची आरोग्य तपासणी केली आणि फिटनेस सर्टिफिकेट देऊन बोगद्यात जाताना काय काळजी घ्यावी याविषयीचे नियम सांगितले. त्या कार्यालयात मुंबई मेट्रोच्या आतापर्यंत झालेल्या कामाचा आढावा घेणारे छायाचित्रांचे कोलाज लावले होते, त्यावरून नजर हटेना. मुंबापुरीच्या पोटात इतकी कालावकालव होतेय?
प्रत्येकाला जॅकेट, सेफ्टी शूज आणि हेल्मेट मिळालं आणि आम्ही सगळे मेट्रो टीमचाच एक भाग असल्यासारखे दिसू लागलो.
- आता मुंबईच्या धावत्या रस्त्यांखालून, भल्याथोरल्या टोलेजंग इमारतींच्या खालून धावणाºया मेट्रोच्या नव्याकोºया भुयारात पायी फिरायचं होतं. पायात हे भारी बूट. त्यांचं वजन भलतंच जास्त होतं. हळूहळू पावलं उचलता यायला लागली. मेट्रो प्लाण्टच्या दिशेने जात असताना जागोजागी त्या बोगद्यात लावण्यात येणारे रूळ, गोलाकार आकार होण्यासाठी लावण्यात येणाºया भल्या मोठ्या अर्धवर्तुळाकार पट्ट्या, लोखंडी शिगा असे वेगवेगळ्या मटेरिअल्सचे ढिगारे. त्यातून वाट काढत अखेर तिथे पोहोचलो, तर बांधकाम साइटवर असणाºया लिफ्टसारखा रस्ता होता ! पण पुढे गेल्यानंतर लक्षात आलं की ती लिफ्ट नसून जमिनीच्या पातळीपासून साधारण ५-६ मजले खाली उतरण्यासाठी बनविण्यात आलेलं मेटल कम्पार्टमेण्ट होतं. एका वेळी पाचच माणसं खाली उतरू शकतात, अशी रचना. ती पाच माणसं खाली पोहोचली की पुढच्या पाच माणसांनी उतरायचं.
एका मागोमाग सगळे शब्दश: मुंबईच्या पोटात उतरत होतो, तर सगळीकडे अत्यंत खुमासदार शैलीत लिहिलेल्या सूचनांचे फलक. या सूचना अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत काम करणाºया कामगारांसाठी लावलेल्या. पत्नीची आठवण येऊन स्वप्नात शिरलेल्या एका कामगाराच्या चित्राशेजारी लिहिले होते... ‘काम के वक्त सपने देखना घातक हो सकता है’. जसजसे मजले खाली उतरत होतो, तसतसे आजूबाजूचा रस्त्याचा कठडा वर वर चाललेला आणि आपण त्या मुंबईच्या पोटात, खालीखाली उतरतोय. बोगद्यात शिरण्यापूर्वी प्रत्येकाला एक टोकन देण्यात आलं. प्रत्येकाचं ओळखपत्रही जमा करण्यात आलं. प्लाण्टमध्ये फिरताना कुणी वाट चुकलं, तर त्या टोकन आणि ओळखपत्रावरून शोधणं सोपं जावं म्हणून ही खबरदारी.
आम्ही बोगद्याच्या सुरुवातीला पोहोचलो. कशाचा काही अंदाजच न येऊन नजरबंदी व्हावी, अशी अवस्था झालेली. खाली उतरण्यापूर्वी सोबतच्या इंजिनिअरने कल्पना दिली होती, आपल्याला आझाद मैदानाच्या बोगद्यातून सुरुवात करून गिरगावकडे कूच करायचीय. त्यामुळे एरव्ही रस्त्यांच्यावरून आझाद मैदानापासून गिरगावकडे जातानाचा मार्ग आठवला- इथून बस स्टॉपला जायचं किंवा मग चर्नीरोडपर्यंत ट्रेन मग पायपीट करत गिरगाव असं सगळं आठवलं; पण आजच्या मार्गाचा अनुभव वेगळाच होता. एवढ्या मोठ्या बोगद्याकडे पाहताना मनात आलं, हीच मुंबईची नाभी ! आता यातून शिरायचं मुंबापुरीच्या पोटात...!!
बोगद्यात प्रवेश केला, मैदानाच्या वरच्या बाजूला पाहिलेल्या त्या अर्ध वर्तुळाकार पट्ट्या बोगद्याच्या दोन्ही बाजूला लावलेल्या दिसल्या. त्यामुळे बोगद्याला गोलाकार आकार आला होता. बोगद्याच्या उजव्या अन् डाव्या बाजूला जमिनीपासून काहीसा उंच असा मजबूत आणि जड धातूच्या जाळ्यांचा प्लॅटफॉर्म बांधलेला. दोन्ही बाजूने त्यावरून माणसं ये-जा करू शकतील अशी व्यवस्था. बोगद्याच्या मधल्या बाजूसही जड धातूच्या जाळ्या टाकून तात्पुरते रूळ बनवलेले. काही ठिकाणी या रूळांच्या खालून पाण्याचा प्रवाह वाहताना दिसत होता, हा भुयाराचा मार्ग समुद्राच्या जवळ असल्याने या ठिकाणी खोदकाम करताना खाºया पाण्याचा पट्टा मिळाला होता, ते हे पाणी !
एकामागोमाग एक असे भुयारातून, बोगद्यातून शिरलो. श्वास थांबेल आता कधीही असं वाटत होतं. कसला तरी ओला स्पर्श. आणि डोकं जणू थक्क होऊन थांबलेलंच ! आणखी आत आत शिरत राहिलो. चालताना बाजूला लावलेल्या अर्धवर्तुळाकार पट्ट्यांवरचे क्र मांक दिसत होते. बघता बघता ५०-७५-१२५ करत करत २००चा टप्पा कधी गाठला ते लक्षातही आलं नाही.
बोगद्यात मजुरांचं काम चाललेलं. जो तो आपापल्या नादात आणि कामात. आझाद मैदानाच्या पोटातून खाली उतरून आम्ही चालत चालत काळबादेवीपासून ते गिरगावच्या पारसी अग्यारी येण्यापूर्वीच्या टप्प्यापर्यंत पोहचलो. बोगद्यातील कामाचं मॉनिटरिंग करणारी कंट्रोल रूम वाटेत लागली. त्यातही अधिकारी बसलेले. जो तो आपापल्या स्क्रीनसमोर कामात गर्क. बोगद्यात लावण्यात आलेल्या कॅमेºयांचं लाइव्ह फुटेज सगळीकडे चकचकत होतं.
या बोगद्यात ७० माणसं रात्रंदिवस काम करतात, काम थांबत नाही.. कामाच्या पाळ्या तेवढ्या बदलतात. या स्वप्ननगरीच्या पोटात रात्रंदिवस घाम गाळून अनेकांची रोजीरोटी चालते. बोगद्यातून चालत असताना दोन्ही बाजूला लाल, पिवळ्या, हिरव्या रंगांचे दिवे दिसत होते, या रंगांच्या भाषेतून रोज हे दिवे इथल्या मजुरांशी गप्पा मारतात. शिवाय, दोन्ही बाजूला एकमेकांत गुंतलेल्या वायर्सचा ढीग, जागोजागी छोट्या-छोट्या मशीन आणि एकाच वेशात कामात बुडालेली माणसं... कदाचित आणखी काही वर्षं बोगद्यातल्या वायर्स, धातूंचे ढिगारे, विविधरंगी दिवे, मोठ्ठाल्या मशीनचे आवाज हेच या मजुरांचं कुटुंब असणार! वातावरणात एक भारलेली झिंग. तिने आम्हा सगळ्यांचा ताबा घेतलेला. त्या क्षणी मागे वळून परतणं नकोच, आणखी जाऊ मुंबापुरीच्या पोटात, आणखी पाहू न पाहिलेल्या मुंबईची दुसरी बाजू असं मनात येतं होतं. साधारण: २५-३० मिनिटांचा रस्ता मागे सरल्यावर श्वास जड झाल्यासारखं वाटायला लागलं. म्हणजे आॅक्सिजन विरळ झाला. या सर्व आपत्कालीन परिस्थितीचा विचार मेट्रो प्रशासनाने आधीच केलेला आहे. भुयारातही जागोजागी आॅक्सिजन पुरवण्याची व्यवस्था. शिवाय चोवीस तास डॉक्टरासंह सगळ्या वैद्यकीय सेवा उपलब्ध असतातच. या बोगद्याच्या, भुयाराच्या प्रवासात एक वळणही दिसलं, बोगद्याच्या या वळणाने अक्षरश: त्या खोदकामाची किंबहुना बोगदा, भुयाराची शान आणखीनच वाढवलीय. बोगद्याच्या अखेरच्या टप्प्यात लाल आणि चंदेरी रंगातील एक भलंमोठं यंत्र बंद अवस्थेत स्वस्थ बसलेलं. त्या यंत्राच्या पलीकडे अजून खोदकाम व्हायचंय..
आणखी आत जायची इच्छा होती; पण पायाखालचा भुयारी रस्ता संपला होता. परतीच्या प्रवासाला निघालो, आता पावलं खरंच जड झालेली. सगळं पुन्हा न्याहाळत चालू लागले. चालताना आजूबाजूच्या सगळ्याच निर्जीव वस्तू ते रूळ, वायरींचा गुंता, रंगीत दिवे हाक मारत होते, इथेच थांब आणखी गप्पा मार आमच्याशी असंच म्हणत असावेत. मनातूनही सारखा एकच आवाज, हा क्षण इथेच स्तब्ध होऊ दे, पण ते शक्य नव्हतं !
भुयारातल्या अंधाराला हळूहळू बिलगत चाललेली शुभ्र प्रकाशाची बारीक तिरीप सांगत होती, संपणार आता हा प्रवास. परत बाहेर जायचं मुंबईच्या पोटातून.
- अखेर त्या अंधाºया बोगद्यातून पुन्हा एकदा मोठ्ठाल्या उजेडाचं वर्तुळ नजरेला भिडू लागलं, अन् प्रवासाचा शेवट झाला.त्या विशाल बोगद्याच्या, भुयाराच्या तोंडाशी उभं राहून वर नजर गेल्यानंतर आपण किती खोलात शिरलो होतो त्याची जाणीव झाली.
- पुन्हा लिफ्टमध्ये बसून वर निघालो.आणि रस्त्यावरून धावत्या गर्दीत नेहमीचे मुंबईकर होऊन मिसळून गेलो.
मेट्रो, मुंबईला कवेत घेत तुझ्या फेऱ्या चालू होतील, तेव्हा आम्ही असूच त्या गर्दीत; पण तुझ्या पोटात शिरून, आत खोलवर उतरून पाहिलेल्या त्या झगमगत्या, चैतन्यशील अंधाराचं रहस्य नाही विसरता येणार कधीच!
(लेखिका लोकमतच्या मुंबई आवृत्तीत वार्ताहर आहेत.)

manthan@lokmat.com

Web Title: Metro 3: The secret hidden in the core of Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.