मौका मौका..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 06:01 AM2019-06-16T06:01:00+5:302019-06-16T06:05:03+5:30

भारत-पाक आणि क्रिकेट हा एक लव्ह ट्रॅँगल आहे. क्रिकेट नावाची माशुका  कधी भारताला भुलवते,  कधी पाकिस्तानला.  आणि ती वश झाली की त्यालाच राष्ट्रप्रेम समजण्याची गल्लत दोन्ही देशातले क्रिकेटवेडे करतात. आजवर दोन्ही देशही तेच करत आलेत!

Love Triangle between India and Pakistan in Cricket.. | मौका मौका..

मौका मौका..

Next
ठळक मुद्दे‘क्रिकेट डिप्लोमसी’च्या नावाखाली ‘बनती-बिगडती’ भारत-पाकिस्तान संबंधांची ग्लॅमरस हेट स्टोरी!

- मेघना ढोके

..इंडिया में दो तरह के लोगों को कभी मत छेडना.
 एक भक्त और दुसरा क्रिकेटभक्त..
इस बार तेरी किस्मत में ऐसा छेद करेंगे की अगले वर्ल्डकप तक पंक्चर बनाते रह जाऐगा.
 - स्टार स्पोर्ट्सच्या ‘मौका मौका’ मालिकेतली ही ‘पेट्रोलवाली’ जाहिरात. ती पाहताना अनेक भारतीय क्रिकेटप्रेमींना (भक्त? -क्रिकेटभक्त? असो.) वाटलं असेल की ‘बोल वो रहा है, लेकीन ख्वाईश मेरी है!’ 
‘मारलं पाहिजे यार, आज पाकिस्तानला!’
असं भारत-पाक क्रिकेट मॅचच्या वेळी या देशात बहुतेक प्रत्येकालाच वाटतं. स्वातंत्र्यानंतर जेव्हा जेव्हा क्रिकेटच्या मैदानावर भारत-पाक एकमेकांना भिडलेत तेव्हापासून आजवर हे ‘वाटणं’ कायम आहे. काळ कुठलाही असो, पाकिस्तानला मारलं की सौ गुनाह माफ! (संघालाही आणि सरकारलाही!)
फाळणीनं फक्त भारत आणि पाकिस्तान असे दोन तुकडेच केले नाहीत, तर भारतीय क्रिकेटचीही फाळणी केली. स्वातंत्र्यपूर्व काळात मुळात ‘साहेबाच्या’ सत्तावतरुळात शिरण्याची ‘संधी’ म्हणूनच अनेकांनी क्रिकेट खेळणं ‘पत्करलं!’ धार्मिक ओळखीवर आधारित संघ होते. मुंबईतले जिमखाने धार्मिक ओळख उघड घेऊन वावरले. देशाची म्हणून जी टीम होती, त्यातही धार्मिक ओळखी उघड होत्या. त्यामुळे देश स्वतंत्र झाला आणि धिप्पाड, उंचपुरे, मुस्लीम फास्ट बॉलर्स पाकिस्तानकडे आणि बुटके, लहान चणीचे बॅट्समन भारताकडे अशी कुणी न करताही फाळणी झालीच. क्रिकेट दोन देशांना ‘जोडणारा’ धागा होता; पण तो विखारी, विषारी की संवादी हे काही तेव्हा ठरलं नव्हतं.
ते ठरलं 1948 मध्ये. आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउन्सिलचं अधिकृत सदस्यत्व पाकिस्ताननं घेतलं आणि पहिलाच कसोटी दौरा म्हणून पाकिस्तान संघ भारतात दाखल झाला. फाळणीनंतर पहिले भारत-पाक सामने (योगायोगाने?) उत्तर भारतातच होते. त्याचे बडे चर्चे झाले. पहिल्या दिल्लीच्या सामन्यात भारतीय संघानं पाकिस्तानला हरवलं. दुसर्‍या लखनौच्या सामन्यात मात्र पाकिस्ताननं भारतीय संघाला मात दिली. देशात संतापाची प्रचंड लाट उसळली. देशप्रेमच पणाला लागलं. पाकिस्तानकडून हरलो हे कॉमेण्ट्री ऐकणार्‍या देशभरातल्या कानांना सहन झालं नाही. मुंबईतल्या तिसर्‍या सामन्यासह भारतानं मालिका जिंकली, तेव्हा कुठं तमाम भारतीयांना ‘हायसं’ वाटलं. पुढं 1955 आणि 1961 मध्ये भारत-पाक कसोटी सामने कधी इकडे, कधी तिकडे झाले, मात्र सगळे ‘ड्रॉ’ झाले. अनिर्णीत. जिंकण्या-हरण्याचे थेट ‘निकाल’ न लागणं हे बरंच काही सांगतं. 1965 आणि 1971च्या युद्धांनी भारत-पाक क्रिकेट थांबवलं. दोन देशात तणाव वाढला की क्रिकेट बंद, हे तेव्हापासून सुरू झालं.
1978 साली ‘क्रिकेट डिप्लोमसी’ या शब्दानं जन्म घेतला. दोन देशात वैर असेलही; पण क्रिकेट आपल्याला जोडतं असं भावुक होत, दोन्ही देशातले संबंध सुधारण्यासाठी शांतिवार्तेनं क्रिकेटचा हात धरला. त्याचाच भाग म्हणून जयपूरला झालेल्या कसोटी सामन्यासाठी पाकिस्तानचे तत्कालीन अध्यक्ष जनरल झिया-उल-हक यांना भारत सरकारनं खास आमंत्रण दिलं. 17 वर्षे भारत- पाक क्रिकेट बंद होतं. मात्र 1978 साली भारतीय संघ ‘क्रिकेट डिप्लोमसी’चा भाग म्हणूनच पाकिस्तान दौर्‍यावर गेला. तेव्हा देश ‘सत्तांतर’अनुभवत होता. आणीबाणीत पोळलेल्या देशानं इंदिरा गांधींना नाकारत जनता पक्षाच्या मोरारजी देसाईंकडे सत्तासूत्र दिली. भारत सरकारची नवी कुटनैतिक आघाडी असं म्हणत देसाई सरकारनं क्रिकेटचा हात धरला.
त्यावेळी पाकिस्तान दौर्‍यावर गेलेल्या संघाचे कप्तान होते बिशनसिंग बेदी. ते एका मुलाखतीत सांगतात, पाकिस्तानी बॉलर्स आणि पंचही रडीचा डाव खेळत होते. बेदींनी संघ व्यवस्थापनाला हे सांगितलं तर व्यवस्थापनाने भारत-पाक कुटनैतिक संबंध वगैरेची माहिती दिली. त्यावर बेदी खवळलेच. म्हणाले, तुमच्या कुटनीतीसाठी आम्ही पडतं घेत, सामने हरावेत असं वाटत असेल तर तसं सांगा. आणि आणखी एक गोष्ट करा, मोरारजी देसाईंना म्हणावं, तुम्हीच व्हा संघाचे कर्णधार, मी जातो घरी!’
त्यानंतर 1979 मध्ये पाकिस्तानने भारत दौरा केला. 1984 चा भारताचा पाक दौरा मात्र रद्द झाला. इंदिरा गांधींची हत्या झाली, भारतीय उपखंडातली समीकरणं बदलली आणि क्रिकेट डिप्लोमसी थांबली.
दरम्यान दोन्ही देशांत तरुण नेतृत्व सत्तेत आलं. तिकडे बेनझीर भुत्ताे आणि इकडे राजीव गांधी. दोघांनी ठरवलं, आपापल्या देशांचं वर्तमान आणि भवितव्य बदलायचं. जुना इतिहास गाडून टाकून नवीन सुरुवात करायची. दोन देशांत तणाव असूनही भारत-पाक क्रिकेट शारजा आणि टोरंटोतही खेळवलं गेलं. त्यानं क्रिकेटमध्ये पैसा आला, मात्र ना भारत-पाक क्रिकेटमधलं हाडवैर सरलं, ना दोन देशांतलं. 
तिकडे पाकिस्तानात ड्रायव्हिंग सीटवर कुणीही असलं तरी रिमोट लष्कराच्याच हातात कायम राहिला. इकडे भारतात मात्र सत्तांतर झालं की भारत-पाक संबंध सुधारण्यासाठीच्या प्रयत्नांना ग्लॅमर येतच राहिलं. 
1999 साली वाजपेयी लाहोरला बस घेऊन गेले. पाकिस्तान संघ भारतात आला, त्याच दरम्यान झालेल्या चेन्नई कसोटीत पाकिस्ताननं भारताला हरवलं. पारंपरिक कट्टर दुश्मनी सोडून भारतीय क्रिकेट चाहत्यांनी तेव्हा पाकिस्तानला स्टॅडिंग ओव्हेशन दिलं. आता चित्र बदलेल अशी चिन्हं असतानाच कारगील झालं आणि त्या छायेतच भारत-पाक सामन्याचं वर्ल्डकपमधलं युद्ध देशानं पाहिलं.
2003 नंतर भारत-पाक दौरे पुन्हा सुरू झाले; पण 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर सगळंच पुन्हा बिनसलं.
ही ‘बनती-बिगडती’ कहानी 2014 मध्ये नरेंद्र मोदी सरकारच्या काळातही दिसली. मोदींनी नवाज शरीफ यांना शपथविधीचं आमंत्रण दिलं, एक दिवस अचानक मोदी लाहोरला जाऊन आले. जुनं वैर सरणार की काय असं वाटू लागेपर्यंत पठाणकोट आणि उरीचे हल्ले झाले, तिकडे शरीफ थेट तुरुंगात गेले आणि इकडे मोदी पुन्हा सत्तेत आले.
दरम्यान या कहाणीत पुलवामा घडलं, बालाकोटचा एअर स्ट्राइक झाला, विंग कमांडर अभिनंदन यांना पाकिस्तानने ‘गुडविल गेश्वर’ म्हणून सोडून दिलं. मात्र देशभक्तीच्या ज्वरानं फणफणलेल्या भारतात पाकिस्तानसोबत क्रिकेट नाही, कधीच नाही, वर्ल्डकपमध्ये भले दोन गुणांचं बलिदान देऊ. असं म्हणत माध्यमांसह समाजमाध्यमांतही भक्तमंडळींनी टाहो फोडले. 
तोवर मोदी पुन्हा सत्तेत आले. ‘मोदी का जो यार है, गद्दार है’ अशी नवाजविरोधी हाळी पाकिस्तानात देणारे इमरान खान आता मोदींनी आणि भारताने शांतिवार्ता कराव्यात म्हणून नाकदुर्‍या काढत आहेत.
इथवरची अशी ही गोष्ट आहे. देशभक्तीच्या लाटांची. भारतानं पाकिस्तानशी कधीच, कुठंच क्रिकेट खेळू नये असं म्हणणारी जनभावना उसळणं आणि ओसरणं इथं काही नवीन नाही. म्हणून तर आज पुन्हा सामन्याचा मौका मौका. ज्वर चढलाय!
खरं तर भारत-पाक आणि क्रिकेट हा लव्ह ट्रॅँगल आहे. क्रिकेट नावाची माशुका कधी भारताला भुलवते, कधी पाकिस्तानला. आणि ती वश झाली की त्यालाच राष्ट्रप्रेम आणि मदरुमकी समजण्याची गल्लत दोन्ही देशांतले क्रिकेटवेडे करतात.
.आजवर दोन्ही देशही तेच करत आलेत!
न जाने ये किस्सा आज की शाम क्या रंग दिखाए.
meghana.dhoke@lokmat.com
(लेखिका लोकमत वृत्तपत्रसमूहात मुख्य उपसंपादक आहेत.)

Web Title: Love Triangle between India and Pakistan in Cricket..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.