kolhapur filmcity | कोल्हापुरची चित्रनगरी

- इंदूमती गणेश

भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासाला सुवर्णपान देणाऱ्या कोल्हापूरच्या चित्रपटसृष्टीचा खंडित झालेला प्रवाह कोल्हापूर चित्रनगरीच्या पुनरुज्जीवनाने पुन्हा प्रवाहित होणार आहे. कोल्हापूरच्या चित्रपटसृष्टीला येत्या १ डिसेंबरला शंभर वर्षे पूर्ण होताना नव्या दिमाखात उभारलेल्या स्टुडिओचा या शताब्दीपूर्तीतच होणारा शुभारंभ म्हणजे दुग्धशर्करा योग असणार आहे.

कोल्हापूर म्हणजे कलेचे माहेरघर. आज देशात मुंबई, हैदराबादसारखी शहरे चित्रपटनिर्मितीचे मुख्य केंद्र बनली असली तरी याची बिजे रोवली गेली, फुलली ती कोल्हापूरच्या मातीतच. छत्रपती राजाराम महाराजांनी स्थापन केलेला जयप्रभा स्टुडिओ आजही त्या सुवर्णकाळाची आठवण करून देतो. आक्कासाहेब महाराजांनी स्थापन केलेला शालिनी सिनेटोन अस्तित्वात नसला तरी त्याचा इतिहास जिवंत आहे. मात्र, मध्यंतरीचा काळ खडतर होता. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने चित्रपट निर्मिती सुरू झालेली असताना या दोन्ही स्टुडिओतील यंत्रसामग्री कालबाह्य झाल्याने चित्रीकरणाची संख्या रोडावली. त्याला नवी उभारी देण्यासाठी कोल्हापूर चित्रनगरीची मागणी पुढे आली.

शालिनी सिनेटोन आणि जयप्रभामध्येच चित्रनगरी सुरू करण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर कोल्हापुरातील मोरेवाडीच्या ७७ एकर विस्तीर्ण माळरानावर २५ सप्टेंबर १९८४ साली कोल्हापूर चित्रनगरीचा नारळ फुटला. त्यासाठी दिग्दर्शक अनंत माने, द. स. अंबपकर, चंद्रकांत, सूर्यकांत, आय. बारगीर, सुभाष भुरके, वसंत शिंदे व शंकर सावेकर यांनी पुढाकार घेतला होता. सुरुवातीची काही वर्षे चित्रनगरीत मोठ्या प्रमाणात चित्रीकरण झाले. मात्र, शासकीय उदासीनतेतून अत्याधुनिक यंत्रसामग्रीच्या अभावाने येथील चित्रपटनिर्मिती रोडावली. पुढे शासनाने तोट्यात चाललेली महामंडळे बंद करण्याचा निर्णय घेतला, त्यात चित्रनगरीचाही समावेश होता. मात्र, कलासक्त कोल्हापूरकरांनी उभारलेल्या जनआंदोलनाने शासनाला हा निर्णय बदलण्यास भाग पाडले आणि तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी चित्रनगरीचे पुनरुज्जीवन करणार असल्याचे जाहीर केले. हा निर्णय जाहीर झाल्यानंतरही मोडकळीस आलेली इमारत, वटवाघळांचा मुक्त संचार, जाळीजळमटे अशा अवस्थेत चित्रनगरीला एक तप काढावे लागले. अखेर २०१२ साली शासनाच्या वतीने चित्रनगरीचे पुनरुज्जीवन करण्याचे ठरले आणि विकास आराखडा तयार झाला. कागदावरचा हा आराखडा वास्तवात उतरण्यासाठी २०१६ साल उजाडले आणि पहिल्या टप्प्यातील १२ कोटींच्या विकासकामांना सुरुवात झाली. अनेक वर्षांचा वनवास, लालफितीचे चटके आणि असंख्य अडचणी पार करीत कोल्हापूर चित्रनगरीच्या विकासाचा पहिला टप्पा आता पूर्ण झाला आहे. नव्या दिमाखात साकारलेल्या या चित्रनगरीचे डिसेंबर महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

मुंबईसह मोठ्या शहरांना नवा पर्याय
सध्या मुंबईतील गोरेगाव फिल्मसिटीसह अन्य स्टुडिओंमध्ये हिंदी, मराठीसह चित्रपट व मालिकांचे चित्रीकरण होते. मात्र स्टुडिओचे भाडे, यंत्रसामग्रीचा खर्च, अन्य सहकलाकारांसह तंत्रज्ञांचे मानधन, चित्रीकरणाच्या काळातील अन्य सोयीसुविधांचा खर्च कोटींच्या घरात जातो. अशा परिस्थितीत नव्याने साकारलेली चित्रनगरी संपूर्ण चित्रपटसृष्टीसाठी नवा आणि उत्तम पर्याय म्हणून पुढे आली आहे. शिवाय कोल्हापूरला लाभलेल्या चित्रपट परंपरेमुळे आजही येथे सहकलाकारांपासून ते तंत्रज्ञांपर्यंत, कॅमेरामनपासून नृत्यदिग्दर्शक, छायासंकलकापर्यंत, मेकअपमनपासून स्पॉटबॉयपर्यंतचे आणि कामाचा अनुभव असलेले चित्रपट व्यावसायिक व कर्मचारी असल्याने त्याचा निर्मात्यांनाही फायदा होणार आहे. चित्रनगरीबरोबरच पन्हाळा, जोतिबा, आंबोली, वसगडे अशी निसर्गसंपन्न लोकेशन्स असल्यानेही आउटडोअर शूटिंगलाही वाव आहे.

कोल्हापूर चित्रनगरी अत्याधुनिक यंत्रणेने सुसज्ज झाल्यानंतर चित्रीकरणाचे दरही वाढतील, अशी एक साशंकता होती. मात्र, मराठी चित्रपटसृष्टीला प्रोत्साहन मिळावे यासाठी हिंदी चित्रपटसृष्टीला जो दर आकारला जातो त्याच्या ५० टक्के कमी दर मराठी चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी लावण्यात येणार आहे. शिवाय मोठ्या शहरांच्या तुलनेत येथे चित्रपट अथवा मालिका निर्मितीला येणारा खर्चही कमी असेल.

एका स्टुडिओत ३२ लोकेशन्स...
अनेक वर्षे वनवासात असलेल्या चित्रनगरीचे रुपडे आता पालटले आहे. १२ कोटींच्या निधीतून पहिल्या टप्प्यातील कामे पूर्ण झाली आहेत. याचे वैशिष्ट्य म्हणजे पूर्वीच्या दोन इमारतींचाच कायापालट करून चोहोबाजूंनी त्यांचे स्वरूप बदलले आहे.
आत चित्रीकरणासाठी मोठे हॉल आणि बाहेर पाटलाचा वाडा, बंगला, पोलीस ठाणे, न्यायालय, फार्म हाऊस, दवाखाना, महाविद्यालय अशी एकूण ३२ लोकेशन्स तयार झाली आहेत. याशिवाय चित्रिकरणासाठी अत्यावश्यक अशा सगळ्या सोयीसुविधा येथे निर्माण होऊन देखण्या इमारती साकारल्या आहेत.

पुढील टप्प्यासाठी १६ कोटी
चित्रनगरीच्या पहिल्या टप्प्यात चित्रीकरण तातडीने सुरू होण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. त्यातून शासनाला उत्पन्न सुरू झाले की दुसरा टप्पा १६ कोटींचा असून, त्याला मंजुरीदेखील मिळाली आहे. या निधीतून हिंदी चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी लागणारा मोठा स्टुडिओ उभारण्यात येणार आहे. त्याला नऊ कोटींपर्यंत खर्च अपेक्षित आहे.
याशिवाय परिसरातील अन्य रस्ते व चार हजार झाडे लावण्यात येणार आहेत. परिसरात खास चित्रीकरणासाठी उपयुक्त असतील अशी १५ फूट उंचीची वैशिष्ट्यपूर्ण झाडे लावण्यात येणार आहेत. एवढ्या मोठ्या उंचीची झाडे लावल्याने दुसºयाच दिवशी नवे लोकेशन तयार होणार आहे.


(लेखिका लोकमतच्या कोल्हापूर आवृत्तीत वरिष्ठ बातमीदार आहेत.)


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.