‘किसन वीर’चे कुस्तीप्रेम! हिंदकेसरी दीनानाथसिंह यांची जीवन कहाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 12:58 AM2018-11-18T00:58:56+5:302018-11-18T00:59:15+5:30

लाल माती - काही संस्था असोत किंवा लोक, ते त्यांच्या आवडीच्या कामांसाठी कोणताही हेतू न ठेवता कायमच मदत करतात. ...

 Kisan Veer wrestling love! Life Story of Hindakesari Dinanath Singh | ‘किसन वीर’चे कुस्तीप्रेम! हिंदकेसरी दीनानाथसिंह यांची जीवन कहाणी

‘किसन वीर’चे कुस्तीप्रेम! हिंदकेसरी दीनानाथसिंह यांची जीवन कहाणी

Next

लाल माती -

काही संस्था असोत किंवा लोक, ते त्यांच्या आवडीच्या कामांसाठी कोणताही हेतू न ठेवता कायमच मदत करतात. तसाच अनुभव सातारच्या मदनदादा भोसले यांच्याकडून आम्हाला आणि एकूणच कुस्तीपेशाला आला. त्यांचे कुस्तीवर फार प्रेम. भुर्इंजच्या किसन वीर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर ते प्रतिवर्षी कुस्त्यांचे मैदान घेतात. हे मैदान आजही सुरू आहे. या मैदानात महाराष्ट्रातील गाजलेल्या मल्लांना बोलावून त्यांचा सन्मान करण्याची त्यांची पद्धत. असेच एकदा माझ्यासह हिंदकेसरी गणपतराव आंदळकर, श्रीपती खंचनाळे यांना बोलाविल्यावर सत्कारानंतर मी हिंदकेसरी व महाराष्ट्र केसरी मल्लांच्या मानधनाबाबत राज्य शासनाकडून होत असलेल्या हेळसांडीबाबत बोललो. त्या मैदानास तत्कालीन केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री प्रतीक पाटील उपस्थित होते.
आमदार मदन भोसले यांनी हा विषय मनावर घेतला. त्यांच्या कारखान्याचा ट्रस्ट आहे. या ट्रस्टच्या माध्यमातून अगोदर आम्ही हिंदकेसरी मल्लांना दरमहा पाच हजार रुपयांचे मानधन सुरू करत असल्याचे आमदार भोसले यांनी सांगितले. नुसती घोषणा करून ते थांबले नाहीत. त्याच महिन्यापासून म्हणजे मार्च २०१० पासून आम्हाला दरमहा पाच हजार रुपयांचे मानधन सुरू झाले. त्यात एक महिनाही खंड पडलेला नाही. सरकारकडे मानधन वाढवून द्या म्हणून सांगायला जातो तर आम्ही अगोदर ते सुरू करतो म्हणजे सरकारकडे मागतानाही वजन येईल, असा त्यांचा विचार होता. आधी केले.. मग सांगितले असा हा व्यवहार होता. मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची आम्ही मदनदादांच्या नेतृत्वाखाली भेट घेतली. शिष्टमंडळात मारुती माने, आंदळकर, खंचनाळे, महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर होते. मुख्यमंत्र्यांनी दखल घेऊन तीन हजार रुपयांचे मानधन चार हजार रुपये केले. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी हे मानधन आमच्या मागणीप्रमाणे दहा हजार रुपये देतो असा शब्द दिला; परंतु सरकारने जे मान्य केले होते तेच चार हजार रुपयेही काँग्रेस आघाडीच्या सरकारच्या काळात आणि आताही भाजप सरकारच्या काळातही नियमित मिळत नाही. मानधन थकले म्हणून ‘लोकमत’मध्ये बातमी आल्यानंतर सरकार जागे होते, मगच ते दिले जाते. आजही या परिस्थितीत फरक पडलेला नाही. वर्षभर नियमित मानधन मिळाले असे एकदाही घडलेले नाही. ज्येष्ठ मल्लांबद्दलचा सरकारचा असा दृष्टिकोन आहे व तो वेदनादायी आहे. वृद्धापकाळात अनेक मल्लांना औषधपाण्यासाठी पैशाची गरज असते. त्यामुळे हे पैसे कधी मिळणार याकडे डोळे लावून बसावे लागते.
त्यावेळी मदन भोसले एवढेच करून थांबले नाहीत. कुस्तीत आयुष्य खर्ची घातलेल्या मल्लांची आयुष्याच्या संध्याकाळी आबाळ होऊ नये म्हणून त्यांना महाराष्ट्रातील चांगल्या शिक्षण संस्थांनी दरमहा काही मदत करावी यासाठी ते पतंगराव कदम, डी. वाय. पाटील, आदींना भेटले; परंतु तो विषय मार्गी लागला नाही. किमान आपापल्या जिल्ह्यातील मल्लांना तरी मदत करा, असेही त्यांचे म्हणणे होते; परंतु तसेही घडले नाही. गेल्या महिन्यात मी आजारी पडल्यावर तातडीने एक लाख रुपयांचा धनादेश त्यांनी पाठवून दिला. मूळच्या उत्तर प्रदेशच्या, कोल्हापुरात वाढलेल्या दीनानाथसिंह यांना सातारच्या किसन वीर कारखान्याने लाखाची मदत कशी दिली, अशीही विचारणा काहींकडून झाली; परंतु ही मदत दीनानाथसिंह यांना नव्हे, तर ती कुस्तीकलेला दिली आहे, असे माझे मत आहे. त्यांनी कारखान्यावर चांगली तालीम बांधली आहे. कुस्ती प्रशिक्षकाची नियुक्ती केली आहे. पैलवानांना खुराक देतात. मी आजारी असल्याचे समजल्यावर त्यांचा रात्री फोन आला. सध्या साखर कारखानदारी अडचणीतून जात आहे; पण तरीही लाख रुपयांची मदत करत आहे. आणखी गरज वाटली तर नि:संकोचपणे फोन करा, असेही त्यांनी सांगितले, हे त्यांचे मोठेपण आहे. मदनदादा भोसले यांच्याप्रमाणेच एमआयटी संस्थेचे प्रमुख विश्वनाथ कराड हे देखील कुस्तीप्रेमी आहेत. ते लातूरला कुस्ती मैदान घेतात. प्रत्येक वर्षी मोठ्या पैलवानास बोलावून रोख आर्थिक मदत करतात. आतापर्यंत त्यांनी सतपाल, कर्तारसिंग यांच्यापासून ते महाराष्ट्रातील गाजलेल्या अनेक पैलवानांना भरीव मदत केली आहे.
शब्दांकन : विश्वास पाटील

Web Title:  Kisan Veer wrestling love! Life Story of Hindakesari Dinanath Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.