The forest track! | रुळावरचे जंगल!
रुळावरचे जंगल!

देशातल्या सर्वात सुंदर रेल्वेस्थानकांच्या राष्ट्रीय स्पर्धेत पहिले दोन क्रमांक पटकावणाऱ्या चंद्रपूर आणि बल्लारपूरची ‘देखणी’ कहाणी

- राजेश भोजेकर
हरणाची शिकार करताना वाघ, हरणांच्या कळपावर झेप घेण्यासाठी सज्ज असलेला बिबट, सारसाची जोडी, गवा, हरीण, माकडे. कुठल्याही जातीवंत निसर्गप्रेमीलाही अशी दृष्ये प्रत्यक्ष पाहायला दुर्मिळ, असा अनुभव आयुष्यात एकदा तरी आपल्याला मिळावा, यासाठी ते अगदी देहाचे डोळे करून रानावनात हिंडत असतात.. सर्वसामान्यांसाठी तर असा अनुभव अक्षरश: अप्राप्य, पण चंद्रपूर आणि बल्लारपूर रेल्वेस्थानकांवर हा अनुभव प्रवाशांना अगदी सहजी येऊ शकतो. अर्थातच हे सारे कृत्रिम देखावे असले तरी या रेल्वेस्थानकांचे वेगळेपण चटकन आपल्या नजरेत भरते.
अस्वच्छता, गलिच्छपणा, दुर्गंधी, केरकचरा आणि घाणीने भरलेले प्लॅटफॉर्म.. कुठलेही रेल्वेस्थानक म्हटले की हेच दृष्य सर्रास दृष्टीस पडते आणि नको ती रेल्वे, असाच सर्वसामान्यांचा अनुभव असतो. तेलंगणा राज्याच्या सीमेवर महाराष्ट्रातील चंद्रपूर आणि बल्लारपूर ही रेल्वेस्थानके मात्र याला अपवाद आहेत. स्वप्रयत्नाने आणि मेहनतीने कर्मचारी, नागरिकांनी इथल्या रेल्वेस्थानकांची ही दशा बदलली आहे. एवढेच नव्हे, राज्याच्या एका टोकाला असलेल्या या रेल्वेस्थानकांनी देशातली सर्वात सुंदर रेल्वेस्थानके म्हणून प्रथम क्रमांकही पटकावला आहे.
सर्वत्र आल्हाददायक आणि प्रसन्न वातावरण, जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघांसह अन्य वन्यजिवांचे अंगावर येणारे पुतळे, भिंती व छतावरील प्रवाशांना भुरळ घालणारी चित्रे पाहून वन्यजीवच या रेल्वेस्थानकांवर संचार करीत असल्याचा भास होतो. याच जोडीला भिंतीवर साकारलेले आदिवासी जीवनही आपल्याला आकृष्ट करते.
रेल्वे प्रवासीही हे दृश्य अपूर्वाईने डोळ्यांत साठवताना आणि गाडी थांबताच खाली उतरून काहीवेळ या वन्यजिवांच्या सान्निध्यात घालवताना दिसतात.
देशाच्या राजधानीतून दक्षिण भारतात ये-जा करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना या स्थानकावरूनच प्रवास करावा लागतो. एकेकाळी ही रेल्वेस्थानकेही भकास होती. मात्र आता त्यांनी कात टाकली आहे. प्रवाशांना पर्यटनाचा आनंद देतानाच ‘व्याघ्र संरक्षण’ आणि ‘पर्यावरण बचाव’चा संदेशही येथे आपल्याला मिळतो.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामुळे चंद्रपूर जिल्ह्याची ओळख जगात आहे. त्यासोबतच आदिवासीबहुल जिल्हा म्हणूनदेखील चंद्रपूरची ओळख आहे. आदिवासी बांधवांच्या संस्कृतीचा परिचय या रेल्वेस्थानकावर उत्तमपणे करुन देण्यात आला आहे.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बहुतांश वाघांना नावांनी ओळखले जाते. सफारीदरम्यान या वाघांचे दर्शन झाले तर सफारी पूर्ण झाल्याचा आनंद पर्यटकांच्या चेहºयावर असतो. या दोन्ही रेल्वेस्थानकांवर ताडोबातील वन्यजिवांच्या पुतळ्यांसोबतच भिंतीवर काढण्यात आलेली चित्रे रेल्वे प्रवाशांना जगप्रसिद्ध ताडोबाचे दर्शन घडवतात. रेल्वेस्थानकाचे सौंदर्यीकरण हा मर्यादित हेतू यामागे नाही. ‘प्रदूषित जिल्हा’ म्हणून चंद्रपूर कुप्रसिद्ध आहे. आपली जुनी ओळख पुसून नवी ओळख निर्माण करण्याच्या या प्रयत्नात अनेकांचा सहभाग आहे.
ही रेल्वेस्थानके वन्यजिवांचे रक्षण करण्यासोबतच पर्यावरणाचा ºहास थांबविण्याचा महत्त्वपूर्ण संदेश आता देत आहेत. रेल्वेस्थानकाच्या प्रवेशद्वारापासून तर प्रत्येक फलाटावर वन्यजीवसृष्टीचे दर्शन घडते. महाविद्यालयीन मुुलामुलींसह येथून जाणाºया प्रवाशांसाठी दोन्ही रेल्वेस्थानके आता ‘सेल्फी स्पॉट’ झाले आहेत.
कसा झाला हा बदल?
राज्याचे अर्थ, नियोजन तथा वनमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची ही संकल्पना. राज्यात पाच वर्षांत ५० कोटी वृक्ष लागवडीचा उपक्रम ही त्यांचीच संकल्पना. आता वृक्ष लागवड ही राज्यात चळवळ झालेली आहे. यंदा १३ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प त्यांनी सोडला आहे. केवळ रेल्वेस्थानकच नव्हे, तर चंद्रपूर जिल्ह्याचा सर्वांगीण आणि ‘सुंदर’ विकास करण्याचा ध्यास त्यांनी घेतलेला आहे. मूल येथील मुख्य मार्ग, चंद्रपुरातील रस्ते व चौक, पोभुर्णा व अजयपूर येथील इको पार्क, बल्लारपूर, मूल व चंद्रपूर येथील सांस्कृतिक सभागृह.. अशा अनेक गोष्टींना त्यामुळे आता आकर्षक रुपडे प्राप्त झाले आहे.
एका कार्यकर्त्यांने राजस्थानातील सवाई माधोपूर रेल्वेस्थानकाच्या सौंदर्यीकरणाबद्दल त्यांना अवगत केले आणि काही दिवसातच चंद्रपूर आणि बल्लारपूर या रेल्वेस्थानकांनी कात टाकून हे सुंदर रूप धारण केले. ‘आदर्श’ म्हणून या रेल्वेस्थानकांनी आपले उदाहरण इतरांसमोर उभे केले आहे.

(लेखक लोकमतच्या नागपूर आवृत्तीत उपसंपादक आहेत. rajeshbhojekar@gmail.com)


Web Title: The forest track!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.