सावधान! ‘बिन पाण्याचा’ राक्षस आपल्याही दारात..

By पवन देशपांडे | Published: April 15, 2018 11:11 AM2018-04-15T11:11:42+5:302018-04-15T11:11:42+5:30

कारण तिथलं पाणीच संपलंय. थेंबभरही पाणी मिळणार नाही, असा दिवस फार लांब नाही.. पण ही धोक्याची घंटा जगातल्या प्रत्येक घरात लवकरच वाजणार आहे...

Be careful! 'Bin water' giant is on our doorstep .. | सावधान! ‘बिन पाण्याचा’ राक्षस आपल्याही दारात..

सावधान! ‘बिन पाण्याचा’ राक्षस आपल्याही दारात..

googlenewsNext

आठवड्यातून केवळ दोनदाच अंघोळ, पिण्यासाठी रोज तीन लिटर पाणी, स्वयंपाकासाठी एक लिटर, टॉयलेटसाठी नऊ लिटर..असं पाण्याचं रेशनिंगच दक्षिण आफ्रिकेच्या केपटाउन शहरात केलं जातंय...कारण तिथलं पाणीच संपलंय. थेंबभरही पाणी मिळणार नाही, असा दिवस फार लांब नाही.. पण ही धोक्याची घंटा जगातल्या प्रत्येक घरात लवकरच वाजणार आहे !

‘आम्ही थेंब थेंब पाणी वाचवतोय आणि दुसरीकडे पाइपलाइन फुटून शेकडो लिटर पाणी वाया जातंय.. प्रशासन झोपा काढतंय का?’..
‘आमच्या एरियात पाण्यासाठी रोज वादावादी सुरू आहेत, एखादा पोलीस तरी पाठवा’.. ‘पाणी येत नाही़़ ८० तासांपासून आमच्या भागातील नळ बंद आहेत़ आम्ही जगायचं कसं?’.. रोज अशा असंख्य तक्रारींंंचा महापूर. या सर्व तक्रारी फोनवरून तर येत आहेतच; पण त्या आता सोशल मीडियावरही येऊ लागल्या आहेत़ सरकारच्या ट्विटर हॅण्डलला टॅग करून त्यांच्यापर्यंत त्या पोहचवल्या जाताहेत...
- हे सर्व घडतंय केपटाउनमध्ये. हे शहर दक्षिण आफ्रिकेतील सर्वांत मोठ्या शहरांपैकी एक़ पर्यटनासाठी उत्तम ठिकाण, मनमोहक समुद्रकिनारे आणि अनेक ऐतिहासिक वास्तूंनी नटलेल्या या शहराला गेल्या वर्षापासून दुष्काळाची बाधा झाली आहे़ लोक पाण्याविना हैराण झाले आहेत. यंदा हा दुष्काळ एवढा महाभयंकर स्थितीवर येऊन पोहचला आहे की, सरकारला पाण्याचं रेशनिंग करावं लागत आहे़ घरोघरचे नळ बंद करून केवळ सार्वजनिक नळांवरच पाणी मिळत आहे़ लोकांच्या रोज तिथं रांगा लागताहेत़ प्रत्येक माणसाला केवळ ५० लिटरच पाणी रोज दिले जात आहे. त्यातच पिण्याची, साफसफाईची आणि इतर रोजच्या गरजा भागवण्याची ताकीद देण्यात आली आहे़

स्वयंपाकासाठी किती पाणी वापरावे, अंघोळीसाठी किती आणि संडास-बाथरूममध्ये फ्लश किती करावे, याबद्दलही जागृती करण्यात येत आहे़.  गेल्या तीन वर्षांपासून हीच स्थिती आहे़ पाण्यासाठी हाहाकार माजला आहे़ आपल्याकडे जसे मोसमी वारे पाऊस घेऊन येतात, तसेच या शहरातही समुद्राच्या दिशेने पाऊस प्रवेश करतो़ या शहरात एकेकाळी सरासरी ५०८ मिलीमीटर पाऊस होत होता़ पण गेल्या तीन वर्षांची आकडेवारी पाहता हा प्रदेश येत्या काही वर्षांत वाळवंट होतो की काय, अशी शंका येऊ शकते़ तीन वर्षांपूर्वी १५३ मिलीमीटर पाऊस झालेला़ त्यानंतरच्या वर्षी थोडा जास्त झाला; पण तोही २२१ मिलीमीटरच़ गेल्यावर्षी आणखी जास्त झाला; पण सरासरी काही गाठता आली नाही़ गेल्यावर्षी केपटाउनमध्ये ३२७ मिलीमीटर पाऊस झाला़ त्यामुळे सलग तीन वर्ष येथील जलसाठे खोल खोल जात होते़ शिवाय पडलेल्या पावसाचे अर्धे पाणी समुद्रात जात होते़ आणि अर्धे जलसाठ्यांमध्ये.

तीन वर्षांपासून हे शहर पाण्याच्या संकटाने होरपळतेय़ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेलेल्या क्रिकेट टीम इंडियालाही याचा फटका बसल्याचे आपण ऐकले होते़ २०१८च्या जानेवारीपासून या दुष्काळाची छाया आणखीच गडद झाली आणि आता तर अशी स्थिती आहे की लवकरच काही उपाययोजना केली नाही तर थोड्याच दिवसांत इथे पाण्याचा एक थेंबही शिल्लक नसेल! हा असेल दक्षिण आफ्रिकेच्या इतिहासातील पहिला ‘डे झिरो’. म्हणजे पाण्याचा थेंबही मिळणार नाही, असा दिवस!

शहरातील लोकांना जास्तीत जास्त पाणी पुरावे यासाठी सरकारने पाण्याचे जे रेशनिंग सुरू केले आहे त्यानुसार रोज दरमाणशी केवळ ५०लिटर पाणी देण्यात येत आहे़ आतापर्यंत जवळपास सर्व घरांतील पाण्याचे कनेक्शन कट करण्यात आले आहेत़ लोकांना पाणी मिळावं म्हणून शहरात जवळपास २०० सार्वजनिक कनेक्शन्स बसवले आहेत़ या नळांवर भांडणं होऊ नये म्हणून पोलीस तैनात करण्यात आले आहेत़ प्रत्येक ठिकाणी सुरक्षा वाढविण्यात आली आहे़ पाण्यासाठी दंगल घडू नये, याची काळजी घेतली जात आहे़.

शहराला लागून असलेल्या निळ्याशार समुद्राच्या पाण्याला पिण्यायोग्य करण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत़ ते यशस्वी झाले तरी रोज शहराला लागणाºया पाण्याची पूर्ण गरज त्यातून भागणार नाही, याची सरकारलाही कल्पना आहे़ पण ज्या मार्गाने पाणी मिळेल, ते जमवण्याचा प्रयत्न आहे़ सांडपाण्याच्या नाल्यांमधून वाहणारे पाणीही शुद्ध करून त्याचा पुनर्वापर करण्यात येत आहे़.  पाण्याचा अपव्यय होऊ नये म्हणून येथील जनतेला आठवड्यातून केवळ दोन वेळा स्नान करण्याची विनंती केली गेली आहे़ त्यापेक्षा अधिक वेळा स्नान करता येणार नसल्याची ताकीदही दिली आहे़ टॉयलेटमध्ये फ्लश करण्यासाठी टाकीचा वापर न करता, बादलीने थोडे पाणी टाकावे, अशी सूचना करण्यात आली आहे़ जे नागरिक पाणीबचत करणार नाहीत किंवा गरजेपेक्षा अधिक पाण्याचा वापर करतील त्यांना दंंड आकारण्यात येणार असल्याचे सरकारने जाहीर केले आहे़ जगात अशा प्रकारचा दंड आकारण्याची ही पहिलीच वेळ आहे़ या शहराने तसा कायदाच केला आहे़

अशा या पाणीबाणीच्या काळात केपटाउन शहर टिकाव धरण्याची धडपड करत आहे़ एप्रिलच्या अखेरपर्यंत चांगला पाऊस होण्याची आशा आहे़ तो झाल्यास पुढील दोन महिनेही चांगला पाऊस होईल अशी इथल्या लोकांची श्रद्धा आहे़ गेल्या आठवड्यात २ ते १० मिलीमीटर पाऊस झाला होता़ जेवढा वेळ हा पाऊस पडला तेवढ्या वेळात लोकांनी आपल्या घरात पावसाचं पाणी जमवून घेतलं़ काहींनी कपडे धुवून घेतले तर काहींनी पाण्याचा साठा करून घेतला़. येत्या काळात पाऊस चांगला झाला नाही तर केपटाउन शहर भकास होत जाणार यात शंका नाही़ येथे येणाºया पर्यटकांची संख्या आताच रोडावली आहे़ हळूहळू स्थानिक लोक शहर सोडू लागतील़
मराठवाड्यातील अनेक गावांतून दुष्काळाच्या काळात शेतकरी कुटुंबच्या कुटुंब मोठ्या शहरांत स्थलांतरित होतात, तशीच केपटाउनमधील लोकं पाणीसंकट मिटले नाही तर स्थलांतर करू लागतील यात शंका नाही़

या दुष्काळामागे असलेल्या कारणांचा शोध घेणं सध्या सुरू आहे़ ग्लोबल वॉर्मिंग हेही त्यातील एक कारण आहे़ वाढत्या प्रदूषणामुळे-तापमानामुळे पावसाचे बदलते ट्रेण्ड आपण अनुभवत आहोत़, तसेच ट्रेण्ड इतर देशांतही पाहायला मिळतात याचे केपटाउन हे जिवंत उदाहरण आहे़.  एका मोठ्या आणि जगप्रसिद्ध शहरावर अशी वेळ आली आहे़ या शहरातील दुष्काळातून सर्व जगाने धडा घेण्याची गरज आहे़ आज पाण्याची बचत आपण केली नाही तर येत्या काळात केपटाउन शहरासारख्या दुष्काळझळा आपल्यालाही बसतील, यात शंका नाही़.  पुढच्या भविष्याची चाहूल कधीच लागलेली आहे. तसे इशारे देताना तज्ज्ञ कळकळीने सांगताहेत.. तिसरे महायुद्ध आता झालेच, तर ते केवळ पाण्यासाठी होईल!.. शहरांची अशी स्थिती पाहून तो दिवस दूर नाही, हे स्पष्टपणे दिसते आहे. ‘सावध’ होण्याची वेळही कधीच टळून गेली आहे, आता समोर आ वासून उभा आहे तो केवळ जीवनमरणाचा प्रश्न.. आताही हातावर हात ठेवून आपण गप्प बसलो, तर पाण्याचा हा राक्षस सगळ्यांनाच गिळंकृत केल्याशिवाय राहणार नाही.. 

सोशल मीडियावर दुष्काळछाया
सोशल मीडियावर सध्या केपटाउनवासीय फक्त डे झिरो, ५० लिटर लाइफ, दुष्काळ अशा प्रकारच्या पोस्टवर भर देताना दिसत आहेत़ तेथील तक्रारीही अशाच पद्धतीने सोशल मीडियावर केल्या जात आहेत़

धरणे कोरडीठाक
केपटाउन शहरात ७ धरणं आहेत़ पण ती जवळपास कोरडी पडली आहेत़ या धरणांचा तळ दिसू लागला आहे़ सहाही धरणांमध्ये मिळून केवळ ७० दिवस पुरेल एवढा पाणीसाठा आहे़ पण तोही दिवसाला एका व्यक्तीने केवळ ५० लिटर पाणी वापरले तऱ सरकारने पाणी बचतीचे जे टार्गेट ठेवले आहे ते अजूनही दूर आहे़ त्यासाठी धडपड सुरू आहे़ येत्या दोन-तीन महिन्यांमध्ये चांगला पाऊस झाला तर ठीक, अन्यथा हे शहर पाण्याविना ओस पडलेले असेल़

बंगळुरूही होऊ शकते केपटाउन
सध्या बंगळुरूही पाण्याच्या संकटाचा सामना करत आहे़ या शहराची लोकसंख्या आता सव्वा कोटीच्या वर गेली आहे; पण केपटाउनसारख्या कोणत्याही उपाययोजना येथे केल्या गेलेल्या नाहीत़ टंचाईच्या झळांनी नागरिक हैराण असले तरी पाणी वापरावर निर्बंध नाहीत, ना पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांना दंड लावला जातोय! कावेरी नदीच्या पाण्यावरून सध्या तामिळनाडूचा आवाज दिल्लीत घुमू लागला आहे़ चार राज्यांमध्ये पाण्यासाठी झगडा सुरू आहे़ ही स्थिती नव्या संकटाची नांदी आहे़

दुष्काळाविरुद्ध सुरू झाल्यात मोहिमा
महाराष्ट्रातही टंचाईग्रस्त भागातील लोकांनी अनेक फंडे शोधून काढले आहेत़ त्यामुळे जलसंवर्धनाच्या मोहिमा महाराष्ट्रात आता बाळसं धरू लागल्या आहेत. अनेक गावांमध्ये त्यांना उत्तम प्रतिसाद मिळू लागला आहे़जलयुक्त शिवार योजना कामी येत आहे़ पाणी फाउण्डेशनचं काम जोमात सुरू आहे. गावोगावी पाण्याचं महत्त्व वाढत चाललं आहे़ पाण्यासाठी लोक एकत्र येऊ लागले आहेत़ त्यामुळे येत्या काळात अनेक गावांना दुष्काळातून मुक्ती मिळण्याची आशा निर्माण झाली आहे़

Web Title: Be careful! 'Bin water' giant is on our doorstep ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.