'दहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा नकाशा चुकीचा'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2018 06:10 PM2018-04-26T18:10:37+5:302018-04-26T18:10:37+5:30

दोषींवर कारवाई करण्याची राधाकृष्ण विखे पाटील यांची मागणी

wrong map of jammu kashmir in tenth standard book radhakrishna vikhe patil writes to cm devendra fadnavis | 'दहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा नकाशा चुकीचा'

'दहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा नकाशा चुकीचा'

Next

मुंबई: दहावीच्या नवीन पाठ्यपुस्तकात भारताचा सदोष नकाशा व राष्ट्रध्वज प्रकाशित करण्यात आला आहे. या पुस्तकातील भारताच्या नकाशातून जम्मू व काश्मीरचा मोठा भूभाग देशाच्या सीमेबाहेर दाखवण्यात आला असल्याचं विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय. याप्रकरणातील दोषींविरोधात गुन्हे दाखल करुन त्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलीय.

विखे पाटील यांनी या घटनेबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय. 'महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळानं इयत्ता दहावीसाठी भूगोलाचं नवीन पाठ्यपुस्तक प्रकाशित केलंय. या पाठ्यपुस्तकातील प्रकरण ३ पान क्र. २४ वर भारताचा नकाशा प्रकाशित करण्यात आला आहे. परंतु, हा नकाशा अत्यंत चुकीचा असून, यामध्ये जम्मू व काश्मीरचा मोठा भाग भारताच्या हद्दीत दाखवण्यातच आलेला नाही. याशिवाय प्रकरण २ पान क्र. ९ वर भारताचा राष्ट्रध्वज प्रकाशित करण्यात आलेला आहे. यामध्ये अशोक चक्रासाठी निळा नव्हे तर वेगळाच रंग वापरण्यात आल्याचे दिसून येते', असं विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केलंय. 

'सन २०१८ च्या शैक्षणिक वर्षासाठी हे नवीन पुस्तक तयार करण्यात आलंय. तत्पूर्वी पाठ्यपुस्तक मंडळानं हे पुस्तक पुणे येथे आयोजित समीक्षण सत्रामध्ये समिक्षकांच्या विचारार्थ व अवलोकनार्थ ठेवलं होतं. त्यावेळी सटाणा येथील माजी प्राचार्य के.यू. सोनवणे यांनी यासंदर्भात मौखिक व लेखी आक्षेप नोंदवले होते. परंतु, पाठ्यपुस्तक मंडळाने त्याची दखल न घेता भारताचा सदोष नकाशा व राष्ट्रध्वज प्रकाशित केला. याशिवाय इतरही अनेक चुका या पुस्तकात असल्याचं त्यांनी निदर्शनास आणून दिलं होतं. परंतु, त्याची दखल घेण्यात आली नाही,' असं विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय. 
 

Web Title: wrong map of jammu kashmir in tenth standard book radhakrishna vikhe patil writes to cm devendra fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.