जागतिक संग्रहालय दिन- संस्कृतीच्या संग्रहावर ‘सीसीटीव्ही वॉच’

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 07:00 AM2019-05-18T07:00:00+5:302019-05-18T07:00:05+5:30

गेल्या दोन वर्षात राज्यातील १३ संग्रहालयांमध्ये हाय डेफिनेशन सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.

World Museum Day - 'CCTV Watch' on Culture Collection | जागतिक संग्रहालय दिन- संस्कृतीच्या संग्रहावर ‘सीसीटीव्ही वॉच’

जागतिक संग्रहालय दिन- संस्कृतीच्या संग्रहावर ‘सीसीटीव्ही वॉच’

Next
ठळक मुद्देरत्नागिरी, नाशिक, औरंगाबाद, सातारा, सांगली, कोल्हापूूर, पैठण, नागपूर, माहूर यांसह १३ संग्रहालयांचा समावेश

प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे :  इतिहास आणि परंपरेचे जतन, संवर्धन आणि प्रदर्शन संग्रहालयांच्या माध्यमातून केले जाते. संग्रहालयांच्या माध्यमातून जपली जाणारी संस्कृती सुरक्षित रहावी, यासाठी पुरातत्व आणि वस्तू संग्रहालय संचालनालयाचा कायमस्वरुपी ‘वॉच’ असणार आहे. यासाठी गेल्या दोन वर्षात राज्यातील १३ संग्रहालयांमध्ये हाय डेफिनेशन सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. यासाठी आठ कोटी रुपये किमतीचा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.
पुरातत्व आणि वस्तू संग्रहालय संचालनालयाकडे औंध, रत्नागिरी, नाशिक, औरंगाबाद, सातारा, सांगली, कोल्हापूूर, पैठण, नागपूर, माहूर यांसह १३ संग्रहालयांचा समावेश आहे. उत्खननातून सापडलेल्या वस्तू, प्राचीन चित्रे-दागिने, इतिहासाच्या खुणा जपणारी शस्त्रे अशा विविध वस्तू या संग्रहालयांमध्ये आहेत. दर वर्षी देशी, विदेशी अनेक पर्यटक या संग्रहालयांना भेट देत असतात. संग्रहालयांच्या माध्यमातून संस्कृतीचे जतन आणि संवर्धन होत असताना, संग्रहालयांची सुरक्षा हा कळीचा मुद्दा ठरतो. हाच मुद्दा विचारात घेऊन, सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी केली जात असल्याचे माहिती राज्याच्या पुरातत्त्व आणि संग्रहालय विभागाचे संचालक तेजस गर्गे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
आठ कोटी रुपये किमतीच्या सीसीटीव्हींची नजर या संग्रहालयांवर असणार आहे. याशिवाय हँडहेल्ड मेटल डिटेक्टर, डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर, बॅगेज स्कॅनर आदी सुविधा सुरक्षेच्या दृष्टीने पुरवण्यात आल्या आहेत. औंध येथील भवानी संग्रहालयासाठी सशस्त्र पोलिसांचा पहारा तैनात करण्यात आला आहे. नागपूरमधील संग्रहलायासाठीही सुरक्षेचा प्रस्ताव सांस्कृतिक संचालनालयाकडे पाठवण्यात आला आहे.
संग्रहालयातील वस्तूंच्या जतन आणि संवर्धनाच्या दृष्टीकोनातून वस्तूंचे थ्रीडी स्कॅनिंग, तसेच पेंटिंगची डिजिटल फोटोग्राफी करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. संग्रहालयांची डिजिटल फोटोग्राफी, वस्तूचे संकलन, लांबी, रुंदी, स्थिती आदींची डिजिटल माहिती, स्कॅनिंग आदींच्या माध्यमातून जतनाची प्रक्रिया सुलभ होण्याच्या दृष्टीने शासनाला प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यादृष्टीने डिजिटायझेशनच्या प्रक्रियेलाही सुरुवात झाली आहे.
--------------------
संग्रहालयांची माहिती लवकरच संकेतस्थळावर!
राज्याच्या पुरातत्व आणि वस्तू संग्रहालय संचालनालयाअंतर्गत असणा-या संग्रहालयांची माहिती सामान्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक असते. यातूनच जास्तीत जास्त पर्यटक संग्रहालयांना भेट देऊ शकतात. याच हेतूने, संग्रहालयांच्या संकेतस्थळाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. आॅगस्टमध्ये संचालनालयाच्या संकेतस्थळावर मराठी आणि इंग्रजी भाषेमध्ये सर्व माहिती उपलब्ध होणार आहे.
- तेजस गर्गे, संचालक, राज्य पुरातत्व आणि संग्रहालय विभाग
-------------
संग्रहालय दिनानिमित्त कार्यक्रम
१८ मे हा जागतिक संग्रहालय दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त पुरातत्व विभागातर्फे संग्रहालयांमध्ये मोफत प्रवेशाची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. याशिवाय, हेरिटेज वॉक, चित्रकला आणि निबंध स्पर्धा, प्रात्यक्षिके, उत्खननामध्ये सापडलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन, व्याख्यान अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Web Title: World Museum Day - 'CCTV Watch' on Culture Collection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.