नाट्य परिषद अध्यक्षपदाचा ‘प्रसाद’ कुणाला...?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 02:44 AM2018-03-11T02:44:35+5:302018-03-11T02:44:35+5:30

एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नवनिर्वाचित सदस्यांची बैठक घेण्याचे सूतोवाच, नाट्य परिषदेचे प्रमुख निवडणूक अधिकारी गुरुनाथ दळवी यांनी केले आहे. त्यानुसार, या बैठकीत नव्या कार्यकारिणीविषयी खलबते होतील. एकूण ६० सदस्यांच्या नियामक मंडळातून १९ जणांची कार्यकारिणी निर्माण केली जाईल. एक अध्यक्ष, दोन उपाध्यक्ष, एक प्रमुख कार्यवाह, तीन सहकार्यवाह, एक खजिनदार आणि अकरा सदस्य असे या कार्यकारिणीचे स्वरूप असेल. या कार्यकारिणीवर वर्चस्व ठेवण्यासाठी नियामक मंडळाच्या ३१ सदस्यांचा पाठिंबा आवश्यक आहे. हा आकडा गाठण्यासाठी आता दोन्ही पॅनल्सनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे.

 Who is the President of the Natya Parivaat 'Prasad' ...? | नाट्य परिषद अध्यक्षपदाचा ‘प्रसाद’ कुणाला...?

नाट्य परिषद अध्यक्षपदाचा ‘प्रसाद’ कुणाला...?

Next

- राज चिंचणकर

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि यात कुणाचे पारडे जड, यावरचा पडदाही दूर झाला. या निवडणुकीत मुंबईत चौरंगी लढतीचे चित्र अपेक्षित असताना, खरा सामना ‘आपलं पॅनल’ आणि ‘मोहन जोशी पॅनल’ यांच्यातच रंगला. या दोन्ही पॅनल्सनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. या निकालावर मुंबई शहर व उपनगरात ‘आपलं पॅनल’चा वरचष्मा दिसून आला, परंतु खरी लढाई पुढेच आहे. आतापर्यंत या निवडणूक नाट्याची लेखनप्रक्रिया पार पडली असली, तरी प्रत्यक्षात रंगमंचावर प्रमुख भूमिका कोण साकारणार हे निश्चित व्हायचे आहे. मुंबईत जरी ‘आपलं पॅनल’ जिंकल्याचे चित्र असले, तरी उर्वरित महाराष्ट्रातून निवडून आलेल्या अधिकाधिक उमेदवारांचा पाठिंबा ज्यांना मिळेल, त्यावरच नाट्य परिषदेच्या भावी अध्यक्षपदाचा ‘प्रसाद’ कुणाच्या ओंजळीत पडणार, यावर शिक्कामोर्तब होणार आहे.
मुंबईतील १६ जागांपैकी ११ जागा ‘आपलं पॅनल’ने खिशात घातल्या आहेत, तर ‘मोहन जोशी पॅनल’ला ५ जागा मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. मोहन जोशी यांचा स्वत:चा अर्ज निवडणूक प्रक्रियेतून बाद झाल्याने त्यांना ही निवडणूक लढविता आली नाही, परंतु तरीही त्यांच्या सहकाºयांनी त्यांच्यावर पूर्ण विश्वास दाखवित, त्यांच्याच नावाने पॅनल बनवून ही निवडणूक लढविली. मुंबईत या पॅनलला माजी मारता आली नसली, तरी महाराष्ट्रातील बिनविरोध जिंकून आलेल्या काही उमेदवारांनी त्यांना पाठिंबा दिल्याचे ‘मोहन जोशी पॅनल’कडून सांगण्यात येत आहे. आता जिंकून आलेले काही उमेदवारही त्यांच्या पाठीशी असल्याचे या पॅनलचा दावा आहे.
यातील अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे, या निवडणुकीला उभे न राहतादेखील मोहन जोशी यांचा अध्यक्षपदावरचा दावा अजून निकालात निघालेला नाही. ‘माझ्या सहकाºयांनी गळ घातली, तर मी पुन्हा अध्यक्षपद स्वीकारीन,’ असे मोहन जोशी यांनी निवडणुकीपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले होते. त्याचा सूचक अर्थ आता अनेकांना समजून चुकला आहे. अशा प्रकारे अध्यक्षपदावर विराजमान होण्यासाठीची तरतूद असल्याचेही उघडकीस आले आहे. त्यामुळे भविष्यात मोहन जोशी यांच्या हाती अध्यक्षपदाचा ‘प्रसाद’ पडण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
‘आपलं पॅनल’ ज्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढले, त्या प्रसाद कांबळी यांनी मुंबई तर स्वत:च्या ताब्यात घेतली आहे. मात्र, उर्वरित महाराष्ट्रातून त्यांना पाठिंबा मिळविण्यासाठी जोर लावावा लागणार आहे. अर्थात, त्यांच्या पॅनलमध्ये नाट्यसृष्टीत अनेक उन्हाळे-पावसाळे पाहिलेले अनुभवी रंगकर्मी असल्याने, त्यांनी त्यांच्या योग्य त्या हालचाली सुरू केल्याचे वृत्त आहे. या पॅनलकडून प्रसाद कांबळी हेच अध्यक्षपदाचे दावेदार असल्याचे सध्या तरी चित्र आहे.
‘आपलं पॅनल’मध्ये अधिकाधिक चमकते तारे असले, तरी ‘मोहन जोशी पॅनल’मध्ये तसा चेहरा दिसून येत नसल्याचे चित्र आहे. एकूणच निवडणुकीच्या प्रक्रियेत मोहन जोशी रिंगणात नसल्याने, ‘मोहन जोशी पॅनल’चा अध्यक्षपदाचा दावेदार म्हणून दीपक करंजीकर यांच्या नावाची निवडणुकीपूर्वी चर्चा होती. मात्र, दीपक करंजीकर यांना निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्याने, त्यांचे नाव या शर्यतीतून बाद झाल्याचे बोलले जात आहे. निवडणूक न लढवताही अध्यक्षपदावर दावा सांगता येतो, हे स्पष्ट झाल्यावर, स्वत: मोहन जोशी हेच पुन्हा एकदा या पॅनलच्या अध्यक्षपदाचे दावेदार बनले आहेत. साहजिकच, सध्या नाट्य परिषदेच्या आखाड्यात ‘कुणी प्रसाद घ्या, कुणी मोहन घ्या’ असे नाट्य रंगले असून, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात हे नाट्य विंगेतून थेट रंगमंचावर येणार आहे.

Web Title:  Who is the President of the Natya Parivaat 'Prasad' ...?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.