गोंदियाच्या विकासासाठी कटिबद्ध- राजकुमार बडोले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 07:05 PM2018-08-15T19:05:34+5:302018-08-15T19:07:46+5:30

गोंदिया जिल्हा नैसर्गिकदृष्ट्या संपन्न असून मोठ्या प्रमाणात जैवविविधता व वन्यजीव आहे. जिल्ह्यात असलेल्या विविध पर्यटनस्थळांचा विकास करण्यासाठी पालकमंत्री या नात्याने कटिबद्ध असून जास्तीत जास्त पर्यटक जिल्ह्यात येतील व त्यामाध्यमातून स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत.

We are committed for the development of Gondia- Guardian Minister Rajkumar Badoley | गोंदियाच्या विकासासाठी कटिबद्ध- राजकुमार बडोले

गोंदियाच्या विकासासाठी कटिबद्ध- राजकुमार बडोले

googlenewsNext

गोंदिया- जिल्ह्यातील विविध घटकातील गरजू लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. शासनाच्या योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करुन जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत. असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.

भारतीय स्वातंत्र्याच्या ७१ व्या वर्धापन दिनाचे मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी पोलीस मुख्यालय मैदान कारंजा येथे केले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष  सीमा मडावी, आमदार गोपालदास अग्रवाल, माजी आमदार डॉ. खुशाल बोपचे, जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, जि. प .मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एम. राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक हरिष बैजल यांची प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, मा.मुख्यमंत्र्यांनी ऐतिहासिक कर्जमाफी करुन राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीचा लाभ जिल्ह्यातील ६६ हजार ३३१ शेतकरी सभासदांना होऊन शेतकऱ्यांचे कर्जाचे खाते निरंक झाले आहे. शेवटच्या पात्र शेतकऱ्याला जोपर्यंत कर्जमाफी मिळत नाही तोपर्यंत कर्जमाफीची योजना सुरु राहील असे शासनाचे धोरण आहे. जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राष्ट्रीयकृत बँक व ग्रामीण बँकांकडून २७ हजार १९४ शेतकऱ्यांना १३० कोटी रुपये खरीप पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे.

जिल्हयात गोंदिया, गोरेगाव व तिरोडा या तीन तालुक्यात खरीप हंगाम २०१७ करीता दुष्काळ जाहीर झाला असून संयुक्त पंचनामे करुन २७ कोटी २० लाख रुपये इतक्या नुकसान भरपाईची मागणी शासनाकडे नोंदविली होती. सदर रक्कम महसूल विभागास प्राप्त झाली असून ती १ लाख ८४ हजार ५२७ शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी बँकेकडे वर्ग करण्यात आली आहे.खरीप हंगाम सन २०१७-१८ मध्ये तुडतुडा किडीमुळे शेतकऱ्यांच्या भात पिकांचे नुकसान झाले. शासनाने नुकसान भरपाई पोटी ४१ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून सदर निधी १ लाख ५ हजार ६८८ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे.

जलयुक्त शिवार अभियान हा महाराष्ट्र शासनाचा अत्यंत महत्वाकांक्षी कार्यक्रम जिल्ह्यात सन २०१५-१६ पासून राबविण्यात येत असून या वर्षात ९४ गावाची निवड करण्यात आली होती. यापैकी ९४ गावे जलपरिपूर्ण झाली आहेत. सन २०१६-१७ मध्ये ७७ गावामधील २ हजार ६२१ कामे पूर्ण झाली असून २० हजार ६९७ टिएमसी पाणी साठा निर्माण झाला आहे. यामुळे ४१ हजार ३९३ हेक्टर संरक्षित सिंचन निर्माण झाले आहे. सन २०१७-१८ वर्षात ६३ गावांपैकी ५५ गावे जलपरिपूर्ण झाली आहेत. याचा लाभ सिंचनासाठी निश्चितच होईल असे सांगितले.

सामान्य कुटूंबांचे घराचे स्वप्न पूर्ण व्हावे व त्यांचे राहणीमान उंचवावे यासाठी प्रधानमंत्री आवास योजना सुरु केली असून वनालगत असलेल्या गावातील कुटूंबांचे वनावरील असलेले अवलंबीत्व कमी करण्यासाठी मागील तीन वर्षात ९ हजार ९०३ कुटूंबांना एलपीजी गॅस कनेक्शन देण्यात आले आहे. त्यामुळे वन व वन्यजीवांच्या संरक्षणाचे काम प्रभावीपणे करण्यात येत आहे. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जनवनविकास योजनेअंतर्गत नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राच्या बफर झोन अंतर्गत येणाऱ्या ९६ गावात विविध विकास कामे करण्यात येत आहे.

गोंदिया जिल्हा नैसर्गिकदृष्ट्या संपन्न असून मोठ्या प्रमाणात जैवविविधता व वन्यजीव आहे. जिल्ह्यात असलेल्या विविध पर्यटनस्थळांचा विकास करण्यासाठी पालकमंत्री या नात्याने कटिबद्ध असून जास्तीत जास्त पर्यटक जिल्ह्यात येतील व त्यामाध्यमातून स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत.

 सन २०१७-१८ या वर्षात जिल्ह्यातील क वर्गाच्या पर्यटनस्थळांच्या मुलभूत सुविधा विकासासाठी ४ कोटी रुपये मंजूर होते. या निधीतून हाजराफॉल, कचारगड, चोरखमारा, बोदलकसा, प्रतापगड, नवेगावबांध येथील विकासकामे प्राधान्याने करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पर्यटनस्थळांच्या विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळण्यास मदत होईल.
जिल्ह्यात ऊर्जा विकासाच्या दृष्टीने विविध कामे करण्यात येत आहे. रजेगाव/काटी, तेढवा/शिवनी व झाशीनगर उपसा सिंचन योजना तसेच कटंगी, कलपाथरी, ओवारा, बेवारटोला, निमगाव व पिंडकेपार लघु प्रकल्पाची कामे त्वरित पूर्ण करुन जास्तीत जास्त शेती सिंचनाखाली आणण्याचा आपला प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी पालकमंत्र्यांनी ध्वजारोहणानंतर राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. त्यानंतर त्यांनी परेडचे निरीक्षण केले. पोलीस पथक, जलद प्रतिसाद पथक, दंगा नियंत्रण पथक, जिल्हा वाहतूक शाखा, होमगार्ड पथक, आर.एस.पी.पथक, स्काऊट-गाईड पथक, बँडपथक व श्वानपथक यांनी संचलन केले. ध्वजारोहणानंतर पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार केला.प्रधानमंत्री आवास योजनेत उत्कृष्ठ कार्यकेल्याबद्दल अर्जुनी मोरगावचे गटविकास अधिकारी नारायणप्रसाद जमईवार यांचा व आपत्ती निवारणात चांगली भूमिका बजावल्याबद्दल राजन चौबे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. अपर जिल्हाधिकारी अशोक लटारे, निवासी उपजिल्हाधिकारी हरिष धार्मिक यांचेसह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, पत्रकार बांधव, ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार गुरुनानक शाळेच्या शिक्षिका मंजुश्री देशपांडे यांनी मानले.

Web Title: We are committed for the development of Gondia- Guardian Minister Rajkumar Badoley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.