Vote for LMOTY 2019: कोण आहे प्रॉमिसिंग राजकीय नेता? तुमचं मत कुणाला?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2019 08:26 PM2019-02-09T20:26:42+5:302019-02-09T20:30:07+5:30

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराच्या माध्यमातून या व्यक्तिमत्त्वांचा गौरव करण्यात येतो. यावर्षीचा पुरस्कार सोहळा येत्या २० फेब्रुवारीला मुंबईत रंगणार आहे.

vote for lokmat maharashtrian of the year 2019 nominations for promising politicians | Vote for LMOTY 2019: कोण आहे प्रॉमिसिंग राजकीय नेता? तुमचं मत कुणाला?

Vote for LMOTY 2019: कोण आहे प्रॉमिसिंग राजकीय नेता? तुमचं मत कुणाला?

Next

महाराष्ट्र ज्यांच्या मनात आहे आणि महाराष्ट्राचा झेंडा जे जगात फडकवताहेत, अशा दिग्गजांचा लोकमत वृत्तसमूह दरवर्षी सन्मान करतो. 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराच्या माध्यमातून या व्यक्तिमत्त्वांचा गौरव करण्यात येतो. यावर्षीचा पुरस्कार सोहळा येत्या २० फेब्रुवारीला मुंबईत रंगणार आहे. लोकसेवा, कला, क्रीडा, वैद्यकीय, उद्योग, राजकारण, प्रशासन अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांना यावेळी गौरवण्यात येणार आहे. त्यातील राजकारण-प्रॉमिसिंग या विभागासाठी पाच तरुण-तडफदार नेत्यांना नामांकन मिळालं आहे. त्यांच्यापैकी, तुम्हाला जो नेता पुरस्कारासाठी योग्य वाटतो, त्याला तुम्ही याच मजकुराच्या खालील बॉक्समध्ये मत देऊ शकता. सुरुवातीला या विभागात नामांकन मिळवलेल्या पाच नेत्यांची थोडक्यात माहिती.... 

आ. कपिल पाटील, प्रदेशाध्यक्ष, लोकतांत्रिक जनता दलः 
राजकीय वारसा असल्याशिवाय आमदार होता येत नाही, अशा समजुतीच्या काळात शिक्षक आई, वडिलांचा वारसा लाभलेले कपिल पाटील विधानपरिषदेत सलग तिसऱ्यांदा आमदार आहेत. कायदे करवून घेणारा अभ्यासू व लढाऊ आमदार म्हणून त्यांची ओळख बनली आहे. कपिल पाटील हे मूळचे समाजवादी कार्यकर्ते. राष्ट्र सेवा दल, छात्रभारती विद्यार्थी संघटना व समाजवादी चळवळीतून ते पुढे आले. कार्यकर्ता, पत्रकार ते आमदार असा त्यांचा प्रवास घडला. या तीनही भूमिकांत ते आजही वावरतात. मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर आंदोलन, मंडल आयोगाची अंमलबजावणी, मुस्लिम ओबीसी संघटना, सच्चर आयोगाची अंमलबजावणी, रात्रशाळा वाचविण्यासाठीचा लढा, अण्णांचे भ्रष्टाचारविरोधी आंदोलन अशा विविध चळवळीत ते सक्रिय राहिले. 

सचिन अहिर, राष्ट्रवादी काँग्रेस, मुंबई अध्यक्षः
एक कामगार ते मंत्री असा सचिन अहिर यांचा प्रवास आहे. खटाऊ फॅब्रिक्स ग्रुपमध्ये कामगार असलेले अहिर संघटन कौशल्यामुळे पुढे कामगारांचे नेते बनले. आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे गेली २२ वर्षांपेक्षा अधिक काळ ते अध्यक्ष आहेत. महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघातही ते २२ वर्षांपासून कार्यरत आहेत. मुंबईसह महाराष्ट्र,आणि गुजरात बॉर्डरपर्यंत २५० कारखाना व आस्थापनातील कामगारांचे यशस्वी नेतृत्व ते करीत आहेत. मुंबईत बंद पडलेल्या गिरण्यांच्या कामगारांना त्यांनी कोट्यवधी रुपयांची देणी मिळवून दिली. महेंद्र अ‍ॅण्ड महेंद्र तसेच माझगाव डॉगसारख्या नामवंत कंपन्यांतील कामगारांचे नेतृत्व त्यांच्याकडे आहे.मुंबई राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ते चौथ्यांदा अध्यक्ष झाले आहेत. विधीमंडळातील उल्लेखनीय कामाबद्दल उत्कृष्ट संसदपटू म्हणून राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले आहे.

आमदार प्रशांत ठाकूर, रायगड भाजपा जिल्हाध्यक्षः
‘आपल्या घरातील माणूस’ अशी प्रशांत ठाकूर यांची पनवेल शहरात ओळख बनली आहे. निवडणुकीपुरते राजकारण व इतर वेळी सर्वपक्षीयांशी सलोख्याचे संबंध ही त्यांची कार्यपद्धती मतदारसंघात वैशिष्ट्यपूर्ण ठरली आहे. खासदार रामशेठ ठाकूर हे त्यांचे वडील. त्यामुळे लहानपणापासूनच प्रशांत यांना राजकारणाची ओढ लागली. पनवेल नगरपरिषद ही त्यांची राजकारण आणि समाजकारणाची प्रयोगशाळा ठरली. २००६ मध्ये ते नगरसेवक म्हणून निवडून आले व नगराध्यक्षही झाले. २००९ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर ते विधानसभेत पोहोचले. २०१४ साली सायन-पनवेल महामार्गावर खारघर येथे सुरु झालेल्या टोलच्या विरोधात स्वपक्षाविरोधात त्यांनी आंदोलन केले. २०१४ सालची निवडणूक भाजपतर्फे लढवून ते दुसऱ्यांदा विधानसभेत गेले. नवी मुंबई जवळच्या पनवेल शहरात महापालिका करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. पनवेल महानगरपालिकेची २०१६ मध्ये पहिली निवडणूक ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भाजपने जिंकली. 

संजय राठोड, शिवसेना, महसूल राज्यमंत्री, यवतमाळः
सामान्य शेतकऱ्याचा मुलगा ते राज्याचा महसूल राज्यमंत्री असा संजय राठोड यांचा प्रवास आहे. शिवसैनिक म्हणून त्यांनी राजकीय जीवन सुरू केले. गत तीस वर्षे ते या पक्षासोबत निष्ठेने आहेत. तीन वेळा ते आमदार झाले. केवळ आपला 'दिग्रस' हा मतदारसंघच नाही तर यवतमाळ जिल्ह्यात त्यांनी काम केले. २०१४ च्या निवडणुकीत सर्वाधिक मते घेणाऱ्या आमदारांत ते विदर्भात प्रथम तर राज्यात दुसऱ्या स्थानावर होते. लोकांना सहज उपलब्ध होणारा नेता अशी त्यांची जिल्ह्यात ओळख आहे. बंजारा समाजाचेही ते नेते आहेत. या समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोहरादेवी (जि. वाशिम) येथे त्यांनी घेतलेल्या मेळाव्यास सुमारे २५ लाख बंजारा बांधव उपस्थित होते. 

सत्यजित तांबे, काँग्रेस, अहमदनगरः
महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे हे महाराष्ट्रातील प्रमुख युवा नेत्यांपैकी एक. वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी ते राजकारणात आले. कुटुंबातून राजकीय वारसा असला तरी आपली स्वत:ची छबी निर्माण करण्यात ते यशस्वी झाले. विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी राज्यभर संघटन केले. २००२ मध्ये विद्यार्थी काँग्रेसचे ते राज्याचे सरचिटणीस झाले. २००७ मध्ये युवक काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी सक्रिय राजकारणाला प्रारंभ केला. दोन वेळा ते जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले. त्यावेळी नगर जिल्हा परिषदेत ग्रामीण समस्यांवर त्यांनी आवाज उठविला. २००७ ते २०१२ मध्ये युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आणि २०१२ नंतर सलग दोनवेळा प्रदेश उपाध्यक्ष म्हणून त्यांनी युवक काँग्रेसमध्ये काम केले. सप्टेंबर २०१८ मध्ये युवक काँग्रेसचे ते प्रदेशाध्यक्ष झाले.

Web Title: vote for lokmat maharashtrian of the year 2019 nominations for promising politicians

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.