ऑनलाइन लोकमत
 
पुणे, दि. 11 -  ‘वाहतुकीचे नियम पाळा. वाहतूक पोलिसांना सहकार्य करा. आपल्या सुरक्षेसाठी ते रस्त्यावर उभे असतात. पोलीस चांगले काम करीत आहेत. शेवटी आपला जीव महत्वाचा आहे.’ हे शब्द कुठल्या पोलीस अधिका-याचे नाहीत तर तरुणांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणा-या क्रिकेटपटू विराट कोहलीचे आहेत. कोरेगाव पार्क भागात कार्यक्रमानिमित्त आलेल्या विराटने वाहतूक पोलिसांच्या विनंतीनंतर हातामध्ये बॅनर घेत वाहतूक जनजागृती केली. त्याला अभिनेत्री मंदिरा बेदी हिने साथ दिली. 
कोरेगाव पार्क वाहतूक विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस यांनी दिलेल्या माहितीनुसार, विराट कोहली कोरेगाव पार्क भागातील एका हॉटेलमध्ये कार्यक्रमानिमित्त आला होता. या कार्यक्रमामध्ये मंदिरा बेदी निवेदिका होती. कार्यक्रम सुरु असताना विराटला एका ‘आरजे’ ने वाहतुकीविषयी प्रश्न विचारला. त्यावर त्याने वाहतुकीचे नियम पाळले पाहिजेत असे उत्तर दिले. कार्यक्रम संपल्यानंतर तेथे बंदोबस्तावर असलेल्या पोलीस निरीक्षक एस. टी. पाटील, सहायक निरीक्षक संतोष खेतमाळस, उपनिरीक्षक ज्ञानेश्वर म्हेत्रे यांनी विराटला सध्या वाहतूक पोलिसांच्या सुरु असलेल्या रस्ता सुरक्षा अभियानाची माहिती दिली. या अभियानामध्ये विविध उपक्रम राबवत जनजागृती करण्यात येत असल्याचे सांगितले.
त्यांनी विराट कोहलीला त्यांच्यासोबत जनजागृती करण्याची विनंती केली. ही विनंती तात्काळ मान्य करीत विराट त्यांच्यासह बाहेर आला. त्याने वाहतूक पोलिसांचा रस्ता सुरक्षा अभियानाचा बॅनर हातामध्ये घेतला. अधिकारी आणि पोलीस कर्मचारी कुटे, हेमंत गायकवाड, धमढेरे, शिंदे, कृष्णा पाटील यांच्यासह त्याने नागरिकांना वाहतुकीचे नियम पाळावेत आणि पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन केले. त्यानंतर पोलिसांनी मंदिरा बेदी हिलाही विनंती केली. तिनेही वाहतूक पोलिसांसह फोटो काढून वाहतूकीचे नियम पाळण्याचे आवहन केले. जाता जाता विराट कोहली पोलिसांना  ‘पोलीस चांगले काम करीत आहेत’ असे चक्क मराठीत म्हणाला. त्याच्या या सहकार्यामुळे पोलीस भारावून गेले होते.