मराठीबाबत सरकारचे खायचे अन् दाखवायचे दात वेगवेगळे - विखे पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2018 02:43 PM2018-02-26T14:43:58+5:302018-02-26T14:43:58+5:30

मराठी भाषा दिनाच्या आदल्या दिवशी महाराष्ट्राच्या विधानभवनात मराठीचा अवमान होण्यासारखे दुसरे कोणतेही दुर्दैव असू शकत नाही. मराठीबाबत या सरकारचे खायचे अन् दाखवायचे दात वेगवेगळे आहेत, अशी संतप्त प्रतिक्रिया...

Vikhe Patil Attack Maharashtra Government on Marathi issue | मराठीबाबत सरकारचे खायचे अन् दाखवायचे दात वेगवेगळे - विखे पाटील

मराठीबाबत सरकारचे खायचे अन् दाखवायचे दात वेगवेगळे - विखे पाटील

Next

मुंबई - मराठी भाषा दिनाच्या आदल्या दिवशी महाराष्ट्राच्या विधानभवनात मराठीचा अवमान होण्यासारखे दुसरे कोणतेही दुर्दैव असू शकत नाही. मराठीबाबत या सरकारचे खायचे अन् दाखवायचे दात वेगवेगळे आहेत, अशी संतप्त प्रतिक्रिया विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली आहे.

राज्यपालांच्या अभिभाषणाचे मराठीत अनुवाद न करण्याच्या घटनेबाबत बोलताना त्यांनी सरकारवर सडकून टीका केली. या सरकारचा मराठीप्रतीचा कळवळा बेगडी आहे. केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची वल्गना करायची. मराठी भाषा दिन विधानभवनात साजरा करण्याची घोषणा करून मराठीप्रती पुळका दाखवायचा. मात्र राज्यपालांच्या अभिभाषणाचा मराठीत अनुवाद करण्याचा दरवर्षीचा साधा शिरस्ताही पाळायचा नाही, यातून सरकारची दुटप्पी भूमिका दिसून येते, असे विखे पाटील म्हणाले.

यावेळी विखे पाटील यांनी विरोधी पक्ष वैफल्यग्रस्त असल्याच्या मुख्यमंत्र्यांच्या विधानाचाही चांगलाच समाचार घेतला. विरोधक नव्हे तर सरकारच निराशेने आणि भयाने ग्रासल्याचा टोला त्यांनी लगावला. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी हे विधान केले होते. सोमवारी सकाळी विखे पाटील यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, या सरकारची सर्वच आघाड्यांवरील कामगिरी शून्य आहे. त्यामुळे अधिवेशनात विरोधी पक्ष आपल्याला घेरणार, याची जाणीव त्यांना अगोदरच झालेली आहे. त्यामुळेच नेमके अधिवेशनाच्या दोन दिवस अगोदर सरकारला बोंडअळी व तुडतुडाग्रस्त शेतकऱ्यांना मदत निर्गमित करण्याचा आदेश काढणे भाग पडले.

गेल्या हिवाळी अधिवेशनाच्या दोन दिवस पूर्वी सरकारने शनिवारी व रविवारी बॅंका उघड्या ठेवून कर्जमाफीचे पैसे वितरीत करायला सुरूवात केली होती. विरोधी पक्ष आपल्याला कोंडीत पकडणार, याची कल्पना आल्यानेच सरकारला शेवटच्या क्षणी हे निर्णय घ्यावे लागतात, यावरून घाबरलेले कोण आहे? हतबल कोण आहे? याची जाणीव होते, असा टोला विखे पाटील यांनी लगावला.

Web Title: Vikhe Patil Attack Maharashtra Government on Marathi issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.