शहरीकरण ही संधीच समजा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2016 05:01 AM2016-06-26T05:01:19+5:302016-06-26T05:01:19+5:30

शहरीकरणाकडे संकट म्हणून नव्हे, तर संधी म्हणून पाहिले पाहिजे. गरिबी सामावून घेण्याची सर्वाधिक ताकद शहरांमध्ये आहे. म्हणूनच मागास भागातून शहरांमध्ये स्थलांतर होते. त्यामुळे शहरांचे

Urbanization is an opportunity! | शहरीकरण ही संधीच समजा !

शहरीकरण ही संधीच समजा !

Next

पुणे : शहरीकरणाकडे संकट म्हणून नव्हे, तर संधी म्हणून पाहिले पाहिजे. गरिबी सामावून घेण्याची सर्वाधिक ताकद शहरांमध्ये आहे. म्हणूनच मागास भागातून शहरांमध्ये स्थलांतर होते. त्यामुळे शहरांचे सामर्थ्य वाढवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. यातून समाजातील शेवटच्या घटकाला त्याचे जीवनमान उंचावण्याची संधी मिळेल आणि नवे विकासपर्व सुरूहोईल.
त्यासाठी लोकांच्या सहभागातून सुरू केलेली स्मार्ट सिटी योजना आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत विविध प्रकल्पांचा प्रारंभ शनिवारी पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आला, या वेळी ते बोलत होते. म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात रंगलेल्या या दिमाखदार सोहळ्यास राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू, राज्यमंत्री बाबुल सुप्रियो, केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर, पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट, खासदार अनिल शिरोळे, महापौर प्रशांत जगताप उपस्थित होते.
मोदी म्हणाले, ‘‘याआधी देशात काही काम झाले नाही किंवा यापूर्वीच्या सरकारांनी निधी दिला नाही असे अजिबात नाही. तरीही आपल्यानंतर स्वतंत्र झालेले आणि आर्थिकदृष्ट्या कंगाल असलेलेही जगातले कितीतरी देश आपल्यापुढे निघून गेले. खूप आर्थिक दारिद्र्यातूून त्यांनी प्रगती साधली. हे कशामुळे घडले असावे याचे माझ्या मनात सतत मंथन सुरु असते. तेव्हा लक्षात असे आले, की पंचायत ते प्रधानमंत्र्यांपर्यंत सरकारात बसलेल्या बाबूंपेक्षा या देशाचा नागरिक अधिक स्मार्ट आहे. या सव्वाशे कोटी जनतेची ताकद चांगल्या कामासाठी एकवटली तर हा देश वेगाने पुढे निघून जाईल. त्यामुळे स्वच्छता अभियान, स्मार्ट सिटी यासारख्या संकल्पनांचे रुपांतर जनआंदोलनात व्हायला हवे.’’
नागरिकांचे जीवनमान सुरक्षित आणि सुखकर करणे हे स्मार्ट सिटी मिशनचे उद्दीष्ट असल्याचे व्यंकय्या नायडू म्हणाले. शहरांचा विकास घडवण्यासाठी पक्षभेद बाजूला ठेवून सर्वांनी केवळ विकासाच्या झेंड्याखाली एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केले.
स्मार्ट सिटी योजनेमध्ये महाराष्ट्रातील दोन शहरे निवडण्यात आलेली असली तरी उर्वरीत आठ शहरांमध्ये स्मार्ट सिटीचे उपक्रम राबवण्यास आधीच सुरुवात केल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. या शहरांसाठी आर्थिक मदत देण्यास जगभरातील अनेक देश उत्सुक आहेत. त्यासाठी केंद्र शासनाने मदत करावी, अशी अपेक्षाही त्यांनी बोलून दाखविली. (प्रतिनिधी)


शिवसेना, राष्ट्रवादीचा बहिष्कार
गेल्या दोन दिवसांपासून महापौरांना व्यासपीठावर स्थान मिळणार की नाही, याबाबत वादंग माजले होते. मात्र, शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी विनंती केल्यावर महापौर कार्यक्रमाला आले आणि त्यांना व्यासपीठावर स्थानही देण्यात आले.
मात्र, शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. भाजपा वगळता कोणत्याही पक्षाचा नगरसेवक किंवा पदाधिकारीही कार्यक्रमास उपस्थित नव्हता.

काळे झेंडे दाखवून काँग्रेसची निदर्शने
काँग्रेसच्या वतीने काळे झेंडे दाखवून शिवछत्रपती क्रीडा संकुलासमोर निदर्शने करण्यात आली़
‘गो बॅक मोदी’, ‘चले जाव, चले जाव नरेंद्र मोदी
चले जाव’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
पोलिसांनी शहराध्यक्ष रमेश बागवे, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष
डॉ़ विश्वजित कदम, यांच्यासह २१० जणांना ताब्यात घेतले़

कंपोस्ट खताला अनुदान : शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्यापासून सेंद्रिय खतनिर्मिती केली जाणार आहे़ रासायनिक खतामुळे शेतीचे नुकसान होत असताना हे खत उपयोगी ठरेल़ त्यामुळे हे खत खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांना युरियाप्रमाणेच अनुदान दिले जाईल. खतविक्री केल्याने महापालिकांनाही फायदा होईल. दोन्ही घटकांना त्याचा फायदा होईल, असे पंतप्रधानांनी सांगितले.

Web Title: Urbanization is an opportunity!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.