हिजड्याला मुलं होतील, पण सिंचन योजना पूर्ण होणार नाही; गडकरींचं वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2018 04:36 PM2018-12-23T16:36:12+5:302018-12-23T16:52:32+5:30

गेल्या काही दिवसांपासून गडकरी वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत

union minister nitin gadkari makes controversial statement while talking about irrigation projects in sangli | हिजड्याला मुलं होतील, पण सिंचन योजना पूर्ण होणार नाही; गडकरींचं वादग्रस्त विधान

हिजड्याला मुलं होतील, पण सिंचन योजना पूर्ण होणार नाही; गडकरींचं वादग्रस्त विधान

सांगली: आगामी निवडणुकीनंतर नितीन गडकरींना पंतप्रधान करण्याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रयत्न असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. मात्र तेव्हापासून गडकरींची काही वादग्रस्त विधानं चर्चेत आहेत. कर्जबुडव्या विजय मल्ल्याची बाजू घेऊन सारवासारव करणाऱ्या गडकरींनी आता आणखी एक वादग्रस्त विधान केलं आहे. एक वेळ हिजड्याला मुलं होतील. मात्र सिंचन योजना पूर्ण होणार नाही, असं आम्हाला वाटलं होतं. मात्र भाजपा सरकारनं सिंचन योजना पूर्ण करुन दाखवली, असं गडकरी सांगलीतील एका कार्यक्रमात म्हणाले.

शेतकरी मेळाव्याला संबोधित करताना सिंचनावर बोलत असताना गडकरींची जीभ पुन्हा घसरली. टेंभू सिंचन योजनेविषयी बोलताना गडकरींनी वादग्रस्त विधान केलं. 'टेंभू योजना अनेक वर्षांपासून अर्धवट होती. ही योजना कधी पूर्ण होईल, असं आम्हालादेखील वाटलं नव्हतं. खरंतर हे इथे बोलू नये. पण बोलतो. एकवेळ हिजड्याचं लग्न झालं तर त्याला मुलं होतील. पण सिंचन योजना पूर्ण होणार नाही. मात्र भाजपा सरकारच्या काळात ही योजना पूर्ण झाली. शेतकऱ्यांचं स्वप्न पूर्ण झालं. टेंभूसारख्या अनेक महत्त्वाच्या आणि महत्त्वाकांक्षी योजना भाजपा सरकारच्या कार्यकाळात पूर्णत्वास गेल्या,' असं गडकरी म्हणाले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट उपस्थित होते. 

शेतकरी मेळाव्यात गडकरींनी रखडलेल्या सिंचन योजनांवर भाष्य केलं. टेंभू सिंचन योजना अनेक वर्षांपासून रखडल्या होत्या. टेंभूसारख्या अनेक योजना पूर्णत्वास जात नव्हत्या. या योजना कधी पूर्ण होतील, असं आम्हालादेखील वाटलं नव्हतं. मात्र केंद्रात मोदी आणि राज्यात फडणवीस सरकार असताना अनेक योजना मार्गी लागल्या. त्यामुळे दुष्काळाची दाहकता कमी झाली, असं गडकरींनी सांगितलं. याआधी कर्जबुडव्या विजय मल्ल्याबद्दल कळवळा दाखवल्यानं गडकरींवर टीका झाली होती. मल्ल्यानं अनेक वर्षे नियमितपणे बँकांचं कर्ज फेडलं. मात्र व्यवसायात अडचणी आल्यानं त्याला हफ्ते भरता आले नाहीत. मग त्याला कर्जबुडव्या म्हणायचं का?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. 

Web Title: union minister nitin gadkari makes controversial statement while talking about irrigation projects in sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.