" त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे!" ; अजित पवारांची निलेश राणेंवर घणाघाती टीका
By दीपक अविनाश कुलकर्णी | Published: January 15, 2021 03:32 PM2021-01-15T15:32:29+5:302021-01-15T15:40:00+5:30
ते काहीही बोलतात त्यावर मी व्यक्त व्हायचे का? अजित पवारांचा संताप
पुणे : एकीकडे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंवर बलात्काराचे आरोप तर दुसरीकडे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाला ड्रग्स प्रकरणात अटक केली आहे.यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी कोंडी झालेली पाहायला मिळते आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसला घेरण्याची आयती संधी भाजपला मिळाली आहे. भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांनी राष्ट्रवादीवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यात माजी खासदार व भाजप नेते निलेश राणे यांनी तर राष्ट्रवादीत चाललंय काय? जितके गुन्हेगार एका जेलमध्ये नसतील तितके राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहे अशी जहरी टीका केली होती. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी संताप व्यक्त करत या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
अजित पवार हे पुण्यातील सर्किट हाऊस येथे आले होते.यावेळी ते बोलत होते. निलेश राणे यांनी राष्ट्रवादीत चाललंय काय? इतके गुन्हेगार मिळून एका जेलमध्ये नसतील तितके राष्ट्रवादी या पक्षात आहेत या केलेल्या जहरी टीकेवर ते चांगलेच संतापले. पवार म्हणाले, ते वाट्टेल ते बोलतात आणि त्यावर मी व्यक्त व्हायचे का? पण एक सांगतो, त्या निलेश राणेंच्या डोक्यावर परिणाम झाला आहे.
विश्वास नांगरे पाटील व शरद पवार भेटीवरही टीका
माजी खासदार निलेश राणे यांनी मुंबईचे सहपोलीस आयुक्त एका बलात्काराच्या प्रकरणासाठी एका पक्षाच्या नेत्याला कसे भेटू शकतात आणि ते पण त्यांच्या घरी? असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच या भेटीतून हे प्रकरण झाकायचा अजेंडा दिसतोय, यामुळे पोलिसांवर लोकांचा विश्वास उडेल, सामान्य लोकांसाठी ही सुविधा आहे का? हेही आयुक्तांनी स्पष्टपणे सांगावे असे देखील मत व्यक्त केले होते.
धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा कधी दाखल करणार? अनिल देशमुख म्हणाले...
कायदा कुणासोबतही भेदभाव करणार नाही. दोषींवर योग्य ती कारवाई करु. कायद्यापुढे कोणताही मंत्री किंवा संत्री मोठा नाही. कायद्यासमोर सर्व समान असतात. सध्या धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांची चौकशी सुरु आहे. यामधून जे काही निष्पन्न होईल, त्यानुसार संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे अनिल देशमुख यांनी म्हटले म्हटले आहे. याचबरोबर, या प्रकरणी धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा कधी दाखल करणार? असा प्रश्न विचारला असता याचे उत्तर देणे अनिल देशमुख यांनी टाळले आणि चौकशीतून सर्व माहिती पुढे येईलच, असे सांगितले.