प्रधानमंत्री आवास योजनेत ठाणे जिल्हा राज्यात पहिला, कल्याण, भिवंडी, शहापूरची कामगिरी सर्वोत्तम
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2018 16:55 IST2018-08-28T16:55:23+5:302018-08-28T16:55:56+5:30
केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी अशा प्रधानमंत्री आवास योजनेत ठाणे जिल्ह्याने ( ग्रामीण ) राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेत ठाणे जिल्हा राज्यात पहिला, कल्याण, भिवंडी, शहापूरची कामगिरी सर्वोत्तम
ठाणे : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी अशा प्रधानमंत्री आवास योजनेत ठाणे जिल्ह्याने ( ग्रामीण ) राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तर राज्यातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या पहिल्या दोन तालुक्यांमध्ये कल्याण आणि भिवंडी या तालुक्यांचा समावेश आहे. तसेच मोठ्या प्रमाणात संख्येनुसार घरकुले पूर्ण करणाऱ्या राज्यातील पहिल्या दहा तालुक्यांमध्ये शहापूर तालुक्याने प्रथम क्रमांक मिळवला आहे.
या कामगिरीची दखल घेऊन घरकुल राज्य व्यवस्थापन कक्षाच्या माध्यमातून राज्याचे ग्रामविकास सचिव असीम गुप्ता यांच्या हस्ते ठाणे जिल्हा परिषदेला गौरविले जाणार आहे. हा गौरव १ सप्टेंबर २०१८ रोजी सिडको भवन सभागृह सीबीडी बेलापूर येथे होणार आहे, अशी माहिती प्रकल्प संचालक डॉ. रुपाली सातपुते यांनी दिली.
प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण आणि राज्य पुरस्कृत असणाऱ्या शबरी, रमाई, आदिम आदी घरकुल योजना या केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजना आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा या विभागाच्या माध्यमातून या योजना राबवल्या जातात. या योजनेंतर्गत सन २०१६-१७ वर्षाकरिता जिल्ह्याला ३ हजार ३९९ लक्षांक दिले होते. त्यापैकी ३ हजार १४६ पूर्ण करण्यात आले. सन २०१७- १८ करिता ७७४ एवढे लक्षांक दिले होते. त्यापैकी ५२१ घरकुल बांधण्यात आली. तर २०१८- १९ करिता ४६२ लक्षांक देण्यात आला असून त्यापैकी ४४३ घरांना मंजुरी मिळाली आहे. यंदाच्या वर्षाचा पहिला हप्ता देखील लाभार्थ्यांना देण्यात आलेला आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेत जिल्ह्याने केलेली कामगिरी कौतुकास्पद असून शासनाने दिलेला लक्षांक पूर्ण करण्यासाठी सर्वच यंत्रणा तत्परतेने काम करत आहेत. सन २०१७-१८ वर्षाचा संपूर्ण लक्षांक ऑक्टोबर पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी सगळ्या यंत्रणा सज्ज असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी सांगितले.