ठाण्यातील नगरसेवकांची महाबळेश्वरला पिकनिक

By admin | Published: July 11, 2017 04:08 AM2017-07-11T04:08:54+5:302017-07-11T04:08:54+5:30

स्थायी समिती, महासभेसह पालिकेचे कामकाज कसे चालते, नगरसेवक म्हणून आपली जनतेप्रति काय भूमिका हवी

Thane corporators of Mahabaleshwar picnic | ठाण्यातील नगरसेवकांची महाबळेश्वरला पिकनिक

ठाण्यातील नगरसेवकांची महाबळेश्वरला पिकनिक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : स्थायी समिती, महासभेसह पालिकेचे कामकाज कसे चालते, नगरसेवक म्हणून आपली जनतेप्रति काय भूमिका हवी, अशांसह विविध प्रकारच्या माहितीसाठी ठाणे महापालिकेच्या नगरसेवकांची टूर पुढील आठवड्यात प्रशिक्षणासाठी महाबळेश्वरला जाणार असल्याचे समजते. दोन दिवसांच्या या प्रशिक्षणात त्यांना विविध प्रकारचा अभ्यास शिकवला जाणार आहे.
ठाणे महापालिकेत यंदा १३१ नगरसेवक निवडून आले आहेत. परंतु, मागील कित्येक वर्षे महापालिकेत तळ ठोकून बसलेल्या नगरसेवकांव्यतिरिक्त सुमारे ४० टक्के नवीन नगरसेवक पालिकेत नव्याने निवडून आले आहेत. त्यांना पालिकेच्या कामकाजापासून इतर काहीच माहिती नसल्याने आणि महासभा, स्थायी समिती किंवा इतर समित्यांची कामे कशी चालतात, कशा प्रकारची शिस्त ठेवणे गरजेचे आहे, आदींसह इतर कोणत्याही प्रकारची माहिती नाही. त्यामुळे त्यांच्यासह इतर सर्वच नगरसेवकांचा प्रशिक्षणाचा दौरा यापूर्वीच होणे अपेक्षित होते. परंतु, स्थायीचे बिघडलेले गणित आणि कोर्टाच्या वाऱ्या यामुळे हे प्रशिक्षण शिबिर लांबणीवर पडण्याची चिन्हे निर्माण झाली होती.
मधल्या काळात हे शिबिर हैदराबादला घ्यावे, अशी मागणी झाली होती. त्यानंतर, पुन्हा माउंटअबू आणि आता पावसाळा सुरू होताच गोव्याची मागणी जोर धरू लागली होती. त्यानुसार, यासंदर्भातील प्रस्ताव महापौर मीनाक्षी शिंदे यांच्यापुढे ठेवण्यात आला होता. परंतु, हैदराबाद आणि माउंटअबूचा दौरा ज्या पद्धतीने त्यांनी रद्द केला, तसाच गोव्याचा कार्यक्रमही त्यांनी रद्द केला. तेथे जाऊन अभ्यासाच्या नावावर केवळ पुरुष नगरसेवक फिरण्याशिवाय काही करू शकणार नाहीत आणि महिला सदस्यांनाही ते ठिकाण रुचणार नसून ते खर्चिकही असल्याचे सांगून महापौरांनी गोव्यावर फुली मारली. त्यानंतर, आता महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणी हे शिबिर घेण्याचे ठरले असून पुढील आठवड्यात दोन दिवसांचे शिबिर आयोजित केले आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींना अत्याधुनिक प्रशिक्षण देण्यासाठी पुणे येथील यशदा, अंधेरी येथील स्थानिक स्वराज्य संस्था यासारख्या प्रख्यात संस्था असताना ठाण्यातील नगरसेवकांना महाबळेश्वरचा मोह कशाला झाला, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. ही केवळ महाबळेश्वरची पावसाळी सहल ठरेल, अशी टीका आता होऊ लागली आहे. आतापर्यंत जे अभ्यासदौरे झाले, त्यांचे इतिवृत्त आतापर्यंत कधीच पटलावर ठेवलेले नाही, हे विशेष.

Web Title: Thane corporators of Mahabaleshwar picnic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.