ठाकरे-पवारांवर निशाणा; घराणेशाहीवर बोट; गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रातून फुंकले लोकसभा निवडणुकीचे रणशिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2024 06:39 AM2024-03-06T06:39:44+5:302024-03-06T06:40:41+5:30

"शरद पवारांना महाराष्ट्राची जनता गेल्या ५० वर्षांपासून सहन करतेय. विरोधी पक्ष ‘लोकशाही’ नव्हे तर ‘घराणेशाही’ जपण्यात ‘मस्त’ आहेत."

Targeting Thackeray-Pawar; finger on nepotism; Home Minister Amit Shah blew the trumpet of Lok Sabha elections from Maharashtra | ठाकरे-पवारांवर निशाणा; घराणेशाहीवर बोट; गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रातून फुंकले लोकसभा निवडणुकीचे रणशिंग

ठाकरे-पवारांवर निशाणा; घराणेशाहीवर बोट; गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रातून फुंकले लोकसभा निवडणुकीचे रणशिंग

जळगाव/ छत्रपती संभाजीनगर : उद्धव ठाकरे यांना आदित्यला अन् शरद पवारांना सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायचे आहे. ममता बॅनर्जी भाच्याचे, तर स्टॅलिन मुलाचे भवितव्य शोधण्यात व्यस्त आहेत. शरद पवारांना महाराष्ट्राची जनता गेल्या ५० वर्षांपासून सहन करतेय. विरोधी पक्ष ‘लोकशाही’ नव्हे तर ‘घराणेशाही’ जपण्यात ‘मस्त’ आहेत. नरेंद्र मोदी मात्र विकसित भारताचे लक्ष्य साध्य करण्यात व्यस्त आहेत, असा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर येथील सभेत विरोधकांचा समाचार घेतला.

जळगावमध्ये मंगळवारी ‘युवा संवाद’ कार्यक्रम झाला. छ. संभाजीनगर येथे त्यांची सभा झाली. जळगावच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावीत उपस्थित होते. तत्पूर्वी त्यांनी अकोला येथे सहा लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला.

विकासाचा बायोडाटा पाहूनच करा मतदान 
- देशाच्या स्वाभिमानाची पायाभरणी छत्रपती शिवाजी महाराजांनी रचल्याचे सांगून, शाह यांनी शिवाजी महाराजांना प्रणाम करीत, तरुणाईला भावनिक साद घातली.
- आगामी निवडणूक भाजपसाठी नव्हे, तर देशासाठी आहे. त्यामुळे तरुणाईने ताकदीने पुढे येऊन, प्रत्येकाने केलेल्या विकासाचा ‘बायोडाटा’ पाहूनच मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. 

पुन्हा ‘राहुलयान’ लाँच केले आहे
एकीकडे ‘आत्मनिर्भर भारत’ बनविण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी २५ वर्षांचे व्हिजन ठेवले आहे. देशाची अर्थव्यवस्था २०३० मध्ये तिसऱ्या स्थानी आणण्याची व २०४७ मध्ये चंद्रावर माणूस पाठविण्यासाठी त्यांनी वज्रमूठ बांधली आहे. दुसरीकडे सोनिया गांधींनी घराणेशाहीला जपत पुन्हा ‘राहुलयान’ लाँच केले आहे, अशी बोचरी टीकाही शाह यांनी केली. '

नामकरणास कुणाची वाट पाहत होता?
शहराला संभाजीनगर असे नाव दिले पाहिजे, अशी पहिल्यांदा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घोषणा केली. पण दुर्दैवाने त्यांचे सुपुत्र मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना अडीच वर्षे याबाबत जाग आली नाही. सरकार अल्पमतात आले, त्यावेळी शेवटच्या क्षणी ठराव केल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर केला.

उद्धव ठाकरेंकडून बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली
छत्रपती संभाजीनगर : बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना, 
सिद्धांतांना अवघा देश मानत होता आणि आजही मानतो. परंतु उद्धव ठाकरे राम मंदिराला, सर्जिकल स्ट्राइकला, छत्रपती संभाजीनगरच्या नावाला विरोध करणाऱ्या लोकांसोबत जाऊन बसले. ते बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार असूच शकत नाही. त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी छत्रपती संभाजीनगर येथील सभेत केली.

छ. संभाजीनगरमध्ये कमळ फुलवा
नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी छ. संभाजीनगरमध्ये कमळ फुलविण्याचे आवाहन अमित शाह यांनी केले. मागच्या वेळी जी चूक केली, ती चूक यावेळी करू नका. नरेंद्र मोदी यांच्यासोबत ताठ मानेने बसणारा, कलम ३७० ला पाठिंबा देणारा खासदार निवडून द्या आणि मराठवाड्यातून नव्या निजामाला उखडून फेका, असे आवाहन अमित शाह यांनी केले. 

Web Title: Targeting Thackeray-Pawar; finger on nepotism; Home Minister Amit Shah blew the trumpet of Lok Sabha elections from Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.