माणुसकीच्या खोल विहिरीतील माशाची कहाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 11:50 PM2017-08-27T23:50:57+5:302017-08-27T23:51:02+5:30

Story of the human well in human wells | माणुसकीच्या खोल विहिरीतील माशाची कहाणी

माणुसकीच्या खोल विहिरीतील माशाची कहाणी

Next



निवास पवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरटे : व्यावहारिक जगात माणसांमधील माणुसकीचा ओलावा कमी होत असला तरी, प्राण्यांच्या विश्वातील माणुसकीच्या अनेक कहाण्या जन्माला येत आहेत. अशीच एक कहाणी वाळवा तालुक्यातील येडेमच्छिंद्र येथे एका माशाच्या माणुसकीने घडविली आहे. हा मासा माणसाच्या आवाजाने पाण्याबाहेर येतो अन् त्याच्या जीवलग शेतकºयाशी हितगुज करतो. या काळजातल्या गुजगोष्टी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देऊन जात आहेत. माणुसकीचा गहिवर माणसापेक्षा माशातच जास्त असल्याची जाणीव करुन देणारीच ही घटना म्हणावी लागेल.
‘नारायणा मी आलोय’ असा टाळ्या वाजवून संदेश दिला की काय आश्चर्य, चक्क विहिरीतील मासा काठावर येतो. काही मिनिटे त्यांच्या सहवासात राहतो अन् पुन्हा विहिरीतील पाण्यात रममाण होतो. ज्याच्या बोलावण्याने मासा विहिरीतून वर येतो, त्या अवलियाचे नाव आहे प्रकाश मारुती पाटील. काल्पनिक कथा वाटावी, अशी घटना येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथे घडत आहे.
एका वर्षापूर्वी कालव्याच्या पोटकालव्यातून हा मासा प्रकाश ऊर्फ तात्यांच्या शेतात आला होता. पाणी कमी झाल्यानंतर पाण्याविना मासा तडफडत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तो मासा पकडून पाण्याच्या बादलीत सोडला. त्यानंतर त्यांनी त्याला गावातील पाण्याच्या हौदात सोडले. महिना, दोन महिन्यानंतर त्याला शेतातील विहिरीत सोडले. सात ते आठ महिन्यानंतर नेहमीप्रमाणे पाटील जनावरांना पाणी पाजण्यासाठी विहिरीतून पाणी आणण्यास गेले असता, पायाजवळ मासा घुटमळत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. सुरुवातीला त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. परंतु रोजच हे घडत असल्याचे पाटील यांच्या लक्षात आले.
पाटील यांनी या माशाचे नारायण असे नाव ठेवले. ते ज्या-ज्यावेळी विहिरीत पाण्यासाठी उतरत, त्यावेळी ते नारायणा... नारायणा... अशी हाक मारू लागले आणि विशेष म्हणजे मासाही विहिरीच्या काठाजवळ येऊ लागला, त्यांच्याशी खेळू लागला. ही घटना त्यांनी कोणालाही सांगितली नव्हती. काही युवकांनी त्यांच्या या नित्यक्रमाचे मोबाईलमध्ये छायाचित्रण केले आणि माशाच्या प्रेमाची ही कहाणी व्हायरल झाली.
रविवार दि. २७ रोजी सकाळी हे चित्रण सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्यामुळे अनेकांनी प्रकाश पाटील यांच्या विहिरीकडे धाव घेतली. पाटील यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले, गतवर्षी मला हा मासा सापडला होता. त्यावेळेपासून माझे आणि त्याचे ऋणानुबंध जुळले आहेत. मी दररोज त्याला विहिरीत खाण्यासाठी अन्न टाकतो.
मांगूर जातीचा मासा
मासा हा अत्यंत भित्रा जलचर प्राणी. त्याला थोडीही चाहूल लागली तरी तो दूर पळतो. परंतु प्रकाश पाटील यांनी जीव लावलेला हा मांगूर जातीचा मासा काही औरच आहे. पाटील विहिरीत उतरल्यावर लगेच तो काठावर येतो अन् त्यांच्याशी खेळण्यास सुरुवात करतो, हे विशेषच म्हणावे लागेल.

Web Title: Story of the human well in human wells

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.