एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीबाबत राज्य शासन सकारात्मक, कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2017 07:46 PM2017-10-16T19:46:53+5:302017-10-16T19:47:33+5:30

एसटी कर्मचाऱ्यांची वेतनवाढ झालीच पाहिजे, अशी राज्य शासनाची भूमिका आहे. या प्रश्नावर सन्मान्य तोडगा काढून एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देण्यासाठी परिवहन विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल.

State Government's positive response to ST employees' wages, employees urged to stop the strike | एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीबाबत राज्य शासन सकारात्मक, कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीबाबत राज्य शासन सकारात्मक, कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

Next

मुंबई - एसटी कर्मचाऱ्यांची वेतनवाढ झालीच पाहिजे, अशी राज्य शासनाची भूमिका आहे. या प्रश्नावर सन्मान्य तोडगा काढून एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देण्यासाठी परिवहन विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल. या समितीमध्ये एसटी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांसह विविध एसटी कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी असतील. समितीने चर्चा करुन वेतनवाढीबाबत सन्मान्य तोडगा सादर करावा, तो निश्चित मान्य केला जाईल. एसटी कामगारांच्या वेतनवाढीबाबत राज्य शासन निश्चितच सकारात्मक आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे घेण्यात यावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विविध एसटी कर्मचारी संघटनांबरोबर झालेल्या चर्चेदरम्यान केले.

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते, परिवहन विभागाचे प्रधान सचिव मनोज सौनिक, एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजीतसिंह देओल, महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे, महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी आमदार जयप्रकाश छाजेड, महाराष्ट्र मोटार कामगार फेडरेशनचे अध्यक्ष शैलेश विश्वकर्मा, फेडरेशनचे मुख्य सचिव राजू भालेराव, कनिष्ठ कर्मचारी संघटनेचे अभय गुजर आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, एसटी कामगारांच्या वेतनात वाढ होणे गरजेचे आहे. यासाठी शासन सकारात्मक आहे. या कर्मचाऱ्यांना किती वेतनवाढ देणे शक्य होईल याबाबत विचारविनिमय करुन निर्णय घेण्यासाठी परिवहन विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल. समितीमध्ये एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह एसटी कामगार संघटनांचे प्रतिनिधीही असतील. एसटी महामंडळावर बोजा पडून ते अजून तोट्यात जाणार नाही यादृष्टीने तसेच कामगारांनाही चांगली पगारवाढ मिळेल यादृष्टीने विचारविनिमय करून समितीने सन्मान्य तोडगा काढावा. शासनामार्फत त्याला मान्यता दिली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

एसटी महामंडळाच्या उत्पन्नात वाढ होणेही गरजेचे आहे. त्यासाठी महामंडळाने विविध कल्पक स्त्रोत विकसीत करावेत. कर्मचारी संघटनांनीही याबाबत सूचना कराव्यात. शासनामार्फत त्यालाही निश्चित मान्यता देऊ, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते म्हणाले की, दिवाळीच्या काळात लोकांची गैरसोय होऊ नये यादृष्टीने एसटी कामगार संघटनांनी संप करु नये, असे आवाहन आपण केले आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीच्या प्रश्नावर आपण सुरुवातीपासूनच सकारात्मक आहोत. एसटी कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने आपण विविध निर्णयही घेतले आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. 
 

Web Title: State Government's positive response to ST employees' wages, employees urged to stop the strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.