​एसटी कर्मचा-यांना ४ हजार ८४९ कोटींची वेतनवाढ- दिवाकर रावते

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2018 09:46 PM2018-06-01T21:46:37+5:302018-06-01T21:46:37+5:30

एसटी महामंडळाच्या ७०व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधत परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी शुक्रवारी एसटी कर्मचाऱ्यांना तब्बल ४ हजार ८४९ कोटी रुपयांची वेतनवाढ घोषित केली.

ST employees get salary of Rs 4,489 crore - Diwakar says | ​एसटी कर्मचा-यांना ४ हजार ८४९ कोटींची वेतनवाढ- दिवाकर रावते

​एसटी कर्मचा-यांना ४ हजार ८४९ कोटींची वेतनवाढ- दिवाकर रावते

googlenewsNext

मुंबई : एसटी महामंडळाच्या ७०व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधत परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी शुक्रवारी एसटी कर्मचाऱ्यांना तब्बल ४ हजार ८४९ कोटी रुपयांची वेतनवाढ घोषित केली. कर्मचारी संघटनांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे आजवर वेतनकरार लांबणीवर पडत गेले. त्यामुळे महामंडळाच्या अखत्यारित वेतनवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या निर्णयाचा सुमारे १ लाख ५ हजार कर्मचा-यांना फायदा होणार असल्याचे रावते यांनी सांगितले.

एसटीच्या ७०व्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर सह्याद्री अतिथिगृहात आयोजित पत्रकार परिषदेत रावते यांनी या वेतनवाढीची घोषणा केली. एसटी महामंडळाच्या आजपर्यंतच्या सर्व वेतनवाढी एकत्रित केल्या तरी इतकी मोठी वेतनवाढ झालेली नाही. केंद्र सरकारच्या सातव्या वेतन आयोगाचे सूत्र वापरून ही वेतनवाढ देण्यात आली आहे. शिवाय कनिष्ठ वेतनश्रेणीतील कर्मचा-यांना समकक्ष आणण्याचा यातून प्रयत्न केला गेला आहे. आजपर्यंत केवळ कर्मचारी संघटनांशी चर्चा करण्यातच वेळ गेला. काही ना काही तरी खुसपट काढून या संघटनांनी वेतनकरार लांबणीवर टाकण्याचाच प्रयत्न केला. त्यामुळे महामंडळ स्तरावर वेतनवाढीचा निर्णय घेण्यात आल्याचे रावते यांनी सांगितले.

एकूण ४ हजार ८४९ कोटींच्या या वेतनवाढीमुळे कर्मचा-यांचे वेतन साधारणत: ३२ ते ४८ टक्कयांनी वाढणार आहे. सोबतच कर्मचा-यांच्या विविध भत्त्यांमध्येही वाढ करण्यात आली आहे. हजेरी प्रोत्साहन भत्ता १८० रुपयांवरून १ हजार २०० करण्यात आला आहे. धुलाई भत्त्यातही वाढ करण्यात आली आहे. सुती गणवेशासाठी ५० वरून १०० रुपये, वूलन गणवेशासाठी १८ वरून १०० रुपये, रात्रपाळी भत्ता ११ वरून ३५ रुपये करण्यात आल्याचे रावते यांनी सांगितले.

मान्य नसलेल्यांना ‘सुवर्णसंधी’ योजना
नव्या वेतनवाढीच्या संमतीपत्रावर कर्मचा-यांना ७ जूनपर्यंत सह्या कराव्या लागणार आहेत. ज्या कर्मचा-यांना ही वेतनवाढ मान्य नसेल त्यांच्यासाठी महामंडळाने सुवर्णसंधी योजना आणली आहे. अशा कर्मचा-यांनी राजीनामा दिल्यास त्यानंतर चालकाकरीता दरमहा २० हजार व वाहकाकरिता दरमहा १९ हजारांवर त्यांना कंत्राटी पद्धतीने पाच वर्षांचा करार करता येईल. या कालावधीत त्यांना दरवर्षी २०० रूये वाढ देण्यात येईल, असे रावते यांनी स्पष्ट केले.

एसटीची भाडेवाढ अटळ
डिझेल दरवाढीमुळे एसटीची भाडेवाढ अटळ असल्याचे रावते यांनी सांगितले. इंधन दरवाढीमुळे महामंडळावर दरवर्षी दोन हजार कोटींचा बोजा पडत आहे. त्यामुळे ३० टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. सध्या अनेक जण गावी गेले आहेत. त्यांना भाडेवाढीचा फटका बसू नये म्हणून १५ जूनपर्यंत भाडेवाढ होणार नाही. डिझेलवरील विविध कर कमी करून महामंडळाला दिलासा द्यावा, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असल्याचे रावते यांनी सांगितले.

Web Title: ST employees get salary of Rs 4,489 crore - Diwakar says

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.