एसटीच्या प्रवाशांनाही मिळणार स्मार्ट कार्डच्या रिचार्जवर '' कॅशबॅक ''

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2019 12:25 PM2019-06-05T12:25:04+5:302019-06-05T12:33:00+5:30

सध्या केवळ एसटीच्या आगारांमध्येच स्मार्ट कार्ड रिचार्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

ST customers will get "cashback" on smart card recharge | एसटीच्या प्रवाशांनाही मिळणार स्मार्ट कार्डच्या रिचार्जवर '' कॅशबॅक ''

एसटीच्या प्रवाशांनाही मिळणार स्मार्ट कार्डच्या रिचार्जवर '' कॅशबॅक ''

Next
ठळक मुद्देतिकिटाऐवजी स्मार्ट कार्डचा होणार वापरपुढील काही दिवसांत प्रवाशांना घरबसल्या मोबाईलवरून रिचार्ज करता येणार एसटीच्या प्रत्येक आगारामुळे स्मार्ट कार्ड मिळण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार

- राजानंद मोरे
पुणे : विविध अ‍ॅपवरून एखादी वस्तु खरेदी केल्यानंतर किंवा बील भरल्यानंतर ग्राहकांना मिळणारी कॅशबॅक आता एसटीच्या प्रवाशांनाही मिळणार आहे. एसटीने दिलेल्या स्मार्ट कार्डच्या पहिल्या रिचार्जवर प्रवाशांना पाच टक्के कॅशबॅक मिळणार आहे. सध्या केवळ एसटीच्या आगारांमध्येच स्मार्ट कार्ड रिचार्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे. पुढील काही दिवसांत प्रवाशांना घरबसल्या मोबाईलवरून रिचार्ज करता येणार आहे. 
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) स्मार्ट कार्ड योजना सुरू केली आहे. परिवहन मंत्री व एसटीचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी वर्धापनदिन काही प्रवाशांना स्मार्ट कार्ड देऊन या योजनेची सुरूवात केली. राज्य शासनाचे विविध पुरस्कारार्थी, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग यांच्यासह सर्वसामान्य प्रवाशांनाही आता स्मार्ट कार्ड मिळणार आहे. एसटीच्या प्रत्येक आगारामुळे स्मार्ट कार्ड मिळण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. आगारांमध्ये स्मार्टकार्ड साठी नोंदणी करावी लागणार आहे. ही नोंदणी केल्यानंतर पुढील १० ते १५ दिवसांत कार्ड मिळेल. कार्ड मिळाल्यानंतर प्रवाशांना किमान ३०० रुपयांचे रिचार्ज करावे लागेल. हे रिचार्ज केल्यानंतर लगेचच प्रवाशांना ५ टक्के रक्कम कॅशबॅक मिळेल. म्हणजे स्मार्ट कार्डमधील वॉलेटमध्ये एकुण ३१५ रुपये जमा होतील. पुढील रिचार्ज शंभरच्या पटीतच करावा लागेल. 
सध्या रिचार्ज करण्याची सुविधा केवळ आगार पातळीवरच उपलब्ध आहे. पुढील काही दिवसांत प्रवाशांना मोबाईलद्वारे आॅनलाईन माध्यमातूनही रिचार्ज करता येणार आहे. तसेच त्यासाठी अधिकृत एजंटचीही नेमणुक केली जाणार आहे. स्मार्ट कार्ड रिचार्ज केल्यानंतर त्यातील पैसे संपेपर्यंत कुठेही प्रवास करता येईल. बसमधील वाहक केवळ कार्ड स्कॅन करेल. त्यानंतर संबंधित मार्गावरील तिकीटाची रक्कम कार्डमधील वॉलेटमधून वजा होईल. या कार्डमध्ये प्रवाशांची संपुर्ण माहिती असल्याने त्याचा उपयोग भविष्यात शॉपिंग इतर प्रवासी वाहतुकीसाठी ई-तिकिटींगसाठीही करता येणार आहे. स्मार्ट कार्ड नसलेल्या प्रवाशांना नेहमीप्रमाणे तिकीट दिले जाईल, अशी माहिती एसटीतील अधिकाºयांनी दिली.
--------------
स्मार्ट कार्ड शुल्क - ५० रुपये
विद्यार्थ्यांसाठी - ५५ रुपये
----------------------
विद्यार्थी पासची नोंदणीही सुरू
राज्यातील बहुतेक शाळा दि. १७ जूनपासून सुरू होणार आहेत. राज्यातील लाखो विद्यार्थी एसटीचा पास घेऊन प्रवास करतात. त्यांनाही स्मार्ट कार्ड दिले जाणार आहे. दरवर्षी पास काढण्यासाठी विद्यार्थ्यांची मोठी धावपळ होते. लांबलचक रांगा लावाव्या लागतात. आता स्मार्ट कार्डमुळे विद्यार्थ्यांना वर्षभरातील पासचे पैसे एकदाच भरता येणार आहे. विद्यार्थ्यांना आगारांमध्ये एक अर्ज मिळेल. हा अर्ज शाळेतून भरून आणायचा आहे. त्यावर शालेय शिक्षण विभागाच्या सरल प्रणालीचा क्रमांक असेल. तो क्रमांक टाकल्यानंतर विद्यार्थ्याची संपुर्ण माहिती एसटीच्या प्रणालीवर येणार आहे. त्यासाठी दोन्ही प्रणाली लिंक करण्यात आल्या आहेत. सध्या पासची रक्कम आगारातच जमा करावी लागणार आहे. दरम्यान, स्मार्ट कार्ड मिळेपर्यंत पुर्वीप्रमाणेच कागदी पासची सुविधाही सुरू राहील, असे एसटी प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
.................
आधारकार्ड बंधनकारक
प्रवाशांना स्मार्ट कार्ड घेण्यासाठी आधारकार्ड असणे बंधनकारक आहे. प्रवाशाचा आधार क्रमांक एसटीच्या यंत्रणेमध्ये टाकल्यानंतर त्याची माहिती समोर येते. त्यामुळे पुन्हा त्याची माहिती घ्यावी लागत नाही. या माहितीच्या आधारे स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली जाते. तसेच आधारकार्ड बरोबरच मतदान ओळखपत्र, वाहन चालविण्याचा परवाना किंवा पासपोर्ट या तिनपैकी कोणतेही एक ओळखपत्र असणे आवश्यक आहे.
-----------
पुणे विभागातील सर्व १३ आगारांमध्ये स्मार्ट कार्ड देण्यासाठी यंत्रणा उभी करण्यात आली आहे. बहुतेक आगारांमध्ये ही प्रक्रिया सुरू झाली आहे. विभागात पुर्वी स्वारगेट बसस्थानकावर ज्येष्ठ नागरिक व या योजनेतील पुरस्कारप्राप्त व्यक्तींची नोंदणी सुरू होती. आतापर्यंत सुमारे ८४६ ज्येष्ठ नागरिकांची नोंदणी झाली आहे. आता सर्व आगारांमध्ये प्रत्येकाला नोंदणी करता येईल. 
- एस. डी. भोकरे, विभागीय वाहतुक अधिकारी, एसटी महामंडळ
--------------

Web Title: ST customers will get "cashback" on smart card recharge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.