विशेष मुलाखत : कोण म्हणतो अभिव्यक्ती स्वातंत्र्य आक्रसले? द.मा.मिरासदारांचा सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 02:57 PM2019-04-15T14:57:53+5:302019-04-15T15:00:00+5:30

‘‘प्रत्येकाला आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार असून,अभिव्यक्ती स्वातंत्र्य अजिबात संकुचित झालेले नाही,’’ असे ठाम मत द.मा. यांनी मांडले.

special interview : who said no more freedom expression ? D.M. MIRASDAR | विशेष मुलाखत : कोण म्हणतो अभिव्यक्ती स्वातंत्र्य आक्रसले? द.मा.मिरासदारांचा सवाल 

विशेष मुलाखत : कोण म्हणतो अभिव्यक्ती स्वातंत्र्य आक्रसले? द.मा.मिरासदारांचा सवाल 

Next
ठळक मुद्देज्येष्ठ साहित्यिक द.मा.मिरासदार यांनी १४ एप्रिलला ९३ व्या वर्षात केले पदार्पण

- प्रज्ञा केळकर-सिंग
---------
विनोदी कथांमधून महाराष्ट्राला खळखळून हसवणारे ज्येष्ठ साहित्यिक द.मा.मिरासदार यांनी १४ एप्रिलला ९३ व्या वर्षात पदार्पण केले. ग्रामीणढंगाच्या कथांमधून भन्नाट संवाद, जीवनाचं वास्तव चित्रण आणि बारीकसारीक तपशीलांसकट पात्रे उभे करणा-या द.मा. यांनी सध्याचे राजकारण, निवडणूक, आचार्य अत्रेंचे वाकचातुर्य याबाबत दिलखुलास गप्पा मारल्या. ‘‘प्रत्येकाला आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार असून,अभिव्यक्ती स्वातंत्र्य अजिबात संकुचित झालेले नाही,’’ असे ठाम मत त्यांनी मांडले.
----------------------------------
सध्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आली आहे, असे म्हटले जाते. तुम्हाला काय वाटते?
- भारतातले अभिव्यक्ती स्वातंत्र्य संपले आहे, असे मला वाटत नाही. आपल्या देशात प्रत्येकाला वाट्टेल ते बोलण्याचा अधिकार आहे. स्वातंत्र्य आहे म्हणून लोक वेड्यासारखे वाटेल ते बोलतात. असे बोलणे, न बोलणे कायद्याच्या कक्षेत बसत नाही, त्यामुळे काहीच करता येत नाही. स्वातंत्र्य संकुचित वगैरे झालेले नाही.

साहित्यिक, लेखकांनी राजकारणाबाबत काय भूमिका घ्यावी?
- राजकारण हे आपले क्षेत्र नाही. राजकारणात वेगळया प्रकारची माणसे लागतात. त्यांचे काळीज घट्ट असावे लागते. संवेदनशील आणि नाजूक मनाच्या माणसांनी राजकारणाच्या फंदात पडू नये. अशा माणसांना कधीच यश मिळणार नाही. त्यासाठी दगडाचे काळीज हवे, वाट्टेल तेवढ्या शिव्या खाण्याची सवय असली पाहिजे.

काही कलाकारांनी सत्ताधा-यांना मतदान न करण्याचे आवाहन करणारे पत्र काढले, तर काहींनी सत्ताधा-यांचे समर्थनार्थ पत्र काढले आहे. तुम्हालाकायवाटते?
- डाव्या विचारसरणीचे लोक सत्ताधा-यांच्या विरोधात असू शकतात. प्रत्येकाला आपापले मत मांडण्याचा अधिकार आहे. त्यांना आपली भूमिका मांडू दे, लोकांना जे पटेल तेच लोक करतील.  प्रत्येकाला विरोधात अथवा बाजूने मत मांडण्याचा अधिकार आहे. आपण तो नाकारु शकत नाही.

आठवणीतील निवडणूक कोणती?
संयुक्त महाराष्ट्र चळवळीत १९५७ साली गिरगाव मतदारसंघातून आचार्यअत्रे समितीकडून आमदारकीसाठी निवडणूक लढवत होते. त्यावेळी अत्रेंचे वाकचातुर्य कायम चर्चेचा विषय ठरायचे. आणि त्या निवडणुकीत अत्रेंचा विजय झाला.

तुम्ही यंदा मतदान करणार का? नागरिकांना काय संदेश द्याल?
- मी १९४५ सालापासून प्रत्येक निवडणुकीत मतदान करत आलो आहे. यंदाच्या वर्षीही मी मतदान करणारच आहे. कोणाला मत द्यायचे, याचा विचार आधीपासून करायचा असतो. मतदान करायला गेल्यावर कोणाला मत द्यायचे, हे ठरवून कसे चालेल? विचार करुनच मतदान केंद्रावर जावे. 

सध्या काय वाचता? काय वाचायला आवडते?
- बरीचशी जुनी पुस्तके मी वाचत असतो. मात्र, नवे साहित्य वाचनात येत नाही. दृष्टी क्षीण झाल्याने टीव्हीवर वाचायला मिळते, तेवढेच वाचतो आणि पाहतो. जुन्या कादंब-या मात्र आवर्जून वाचतो.

.........

गाडगीळ आणि अतिशयोक्ती 
आचार्य अत्रे एकदा रशियाच्या दौऱ्यावर होते. भारतात परतल्यावर त्यांचे ‘माझे रशियातील अनुभव’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. शनिवार पेठेतल्या चौकात ही सभा होती. शेजारीच काकासाहेब गाडगीळ यांचे घर होते. त्यांचे पुत्र विठ्ठलराव गाडगीळ सभेचे अध्यक्ष होते. विठ्ठलरावांनी सभेचे प्रास्ताविक केले. ते म्हणाले, ‘‘आचार्य अत्रे फार मोठे वक्ते आहेत. ते विनोद करतात, पण त्यांना अतिशयोक्ती करण्याची सवय आहे.’ त्यानंतर आचार्य अत्रे बोलण्यासाठी उठले. ते म्हणाले, ‘माझे मित्र विठ्ठलराव गाडगीळ हे काकासाहेब गाडगीळांचे चिरंजीव आहेत. काय हो विठ्ठलराव, यात काही अतिशयोक्ती नाही ना?’’ त्यांचे हे बोलणे ऐकताच सभेमध्ये एकच हशा पिकला. 
-------
‘लाल’ पोपट
काँग्रेसचे पोपटलाल शहा नावाचे पुढारी होते. ते निवडणुकीला उभे होते. अत्रे एकदा कोणावर घसरले की काय बोलतील, याचा नेम नसायचा. ते म्हणाले, ‘‘काँग्रेसमधून हे पोपटलाल निवडणुकीला उभे आहेत. काय करतात? काहीच नाही. नाव काय तर पोपटलाल! सगळे पोपट हिरवे असतात. हा एकटाच ‘लाल’ आहे.’’ असे शेकडो किस्से आजही स्मरणात आहेत.

Web Title: special interview : who said no more freedom expression ? D.M. MIRASDAR

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.