शिवसेनेला पटकणारा अजून जन्माला आला नाही; उद्धव ठाकरेंचा अमित शहांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2019 02:14 PM2019-01-13T14:14:37+5:302019-01-13T14:15:28+5:30

राम मंदिराच्या मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका

shiv sena chief uddhav thackeray slams pm narendra modi bjp president amit shah over ram mandir | शिवसेनेला पटकणारा अजून जन्माला आला नाही; उद्धव ठाकरेंचा अमित शहांना टोला

शिवसेनेला पटकणारा अजून जन्माला आला नाही; उद्धव ठाकरेंचा अमित शहांना टोला

Next

मुंबई: काही जण शिवसेनेला पटकण्याची भाषा करतात. मात्र शिवसेनेला पटकणारा अजून जन्माला आलेला नाही आणि येणारही नाही, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीभाजपा अध्यक्ष अमित शहांना लगावला. ते स्थानिक लोकाधिकार समितीच्या अधिवेशनात बोलत होते. यावेळी त्यांनी राम मंदिर, काळा पैसा या मुद्द्यांवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं. सरकारनं राम मंदिराच्या मुद्द्याचाही जुमला करुन टाकला, अशी टीका उद्धव यांनी केली. 

गेल्या आठवड्यात लातूरमध्ये झालेल्या भाजपा मेळाव्यात अमित शहांनी शिवसेनेला थेट इशारा दिला होता. मित्र पक्ष सोबत आला तर ठिक, अन्यथा विरोधकांसह त्यांना धोबीपछाड देऊ, असं शहा म्हणाले होते. युती न केल्यास मित्रपक्षाला पराभूत करु, असा इशारा देताना त्यांनी पटक देंगे असं म्हटलं होतं. त्याला उद्धव यांनी आज उत्तर दिलं. शिवसेनेला पटकणारा अद्याप जन्माला आला नाही आणि येणारही नाही, असा टोला त्यांनी लगावला. सध्या हनुमानाची जात काढली जात आहे. हा प्रकार अतिशय दुर्देवी असल्याचं ते म्हणाले. 

सरकारसाठी राम मंदिराचा मुद्दादेखील जुमलाच आहे का?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 'तुमच्या खात्यात 15 लाख येतील हा जुमला होता. मग आता राम मंदिराचा मुद्दा हादेखील निवडणुकीसाठीचा जुमला समजायचा का? राम मंदिराचा विषयही तुम्हाला जुमला वाटत असेल, तर मग जनतेनं तुमच्यावर विश्वास का ठेवायचा?' असे प्रश्न उद्धव यांनी उपस्थित केले. काँग्रेसमुळेच राम मंदिराचा प्रश्न मार्गी लागत नसल्याचा आरोप पंतप्रधान मोदींनी केला होता. त्याचाही समाचार उद्धव यांनी घेतला. 'राम मंदिराच्या निर्मितीत काँग्रेस अडथळे निर्माण करते, असं तुम्ही म्हणता. राम मंदिराच्या उभारणीत अडचणी निर्माण करत असल्यानं देशानं त्यांना सत्तेतून खाली खेचलं आणि तुम्हाला बहुमत दिलं. पण तुम्ही मंदिर उभारल्याचं आम्हाला तरी दिसत नाही,' असं उद्धव म्हणाले. 
 

Web Title: shiv sena chief uddhav thackeray slams pm narendra modi bjp president amit shah over ram mandir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.