ज्येष्ठ साहित्यिक रा. चिं. ढेरे यांचे निधन

By admin | Published: July 2, 2016 05:27 AM2016-07-02T05:27:45+5:302016-07-02T05:27:45+5:30

ज्येष्ठ साहित्यिक, अभ्यासक आणि संशोधक डॉ. रा. चिं. ढेरे यांचे शुक्रवारी सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले.

Senior literary man Chin Dhere passed away | ज्येष्ठ साहित्यिक रा. चिं. ढेरे यांचे निधन

ज्येष्ठ साहित्यिक रा. चिं. ढेरे यांचे निधन

Next


पुणे : लोकसंस्कृतीच्या विविध दालनांना संशोधनाच्या प्रतिभेतून स्पर्श करणारे ज्येष्ठ साहित्यिक, अभ्यासक आणि संशोधक डॉ. रा. चिं. ढेरे यांचे शुक्रवारी सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा छायाचित्रकार मिलिंद ढेरे, मुली ज्येष्ठ कवयित्री अरुणा ढेरे, लेखिका वर्षा गजेंद्रगडकर, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.
गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती, अखेर निवासस्थानीच त्यांची प्राणज्योत मालवली. भारतीय संस्कृतीच्या विविध शाखांचा ‘शोधयात्री’प्रमाणे अविरतपणे धांडोळा घेत, ज्ञानदानाच्या दिशेने मार्गक्रमण करणाऱ्या या उपासकाच्या निधनाने साहित्य आणि संशोधन क्षेत्रात शोककळा पसरली. साहित्य, कला, संशोधन आदी विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांच्या इच्छेनुसार कोणतेही विधी न करता त्यांच्या पार्थिवावर दुपारी साडेबारा वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
करवीरनिवासी श्री महालक्ष्मी, दत्त संप्रदायाचा इतिहास, श्री तुळजाभवानी, दक्षिणेचा लोकदेव खंडोबा, आज्ञापत्र, त्रिविधा, लज्जागौरी, श्रीनाथलीलामृत, श्रीविठ्ठल : एक महासमन्वय, स्वामी समर्थ, श्री व्यंकटेश्वर, श्री कालहस्तीश्वर, लोकसंस्कृतीचे उपासक, श्री पर्वतीच्या छायेत, लोकसंस्कृतीचे विश्व, संत, लोक आणि अभिजन आदी विविध संशोधनात्मक ग्रंथसंपदेतून लोकसंस्कृतीचा इतिहास त्यांनी अभ्यासक आणि संशोधकांसाठी खुला केला. संशोधन साधनेच्या सुरूवातीच्या काळात वाणी आणि लेखणी या दोन्ही माध्यमातून त्यांनी शारदोपासना केली. रसाळ वक्तृत्वशैलीचे वरदानही त्यांना लाभले होते. मात्र सार्वजनिक व्याख्यानांपासून स्वत:ला दूर ठेवत संशोधनाचे व्रत त्यांनी अंगीकारले आणि अवघे आयुष्य त्यासाठी खर्ची केले. संशोधन क्षेत्रातील योगदानासाठी साहित्य अकादमी पुरस्कारासह विविध पुरस्कारांचे ते मानकरी ठरले. (प्रतिनिधी)
ज्येष्ठ साहित्यिक आणि व्रतस्थ संशोधक डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या निधनाने लोकसंस्कृतीचा उपासक आपण गमावला आहे. भारतीय इतिहास, लोकसाहित्य तसेच प्राच्यविद्या संशोधनातील मानदंड म्हणून त्यांची ओळख राहील. लोकमत साहित्य जीवनगौरव पुरस्कार रा. चिं. ढेरे यांना प्रदान करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी जाण्याचा योग आला होता. एखाद्या मंदिरात जावे, तशी अनुभूती मला आली. ज्ञानाची अखंड उपासना करत एखाद्या योग्याप्रमाणे संशोधनाचे व्रत त्यांनी घेतले होते. या ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्वाच्या गौरवाने लोकमत साहित्य पुरस्काराची उंचीही वाढली. त्यांच्या निधनाने लोकसाहित्य आणि संतसाहित्यातील जिवंत ज्ञानकोशच हरपला आहे. लोकमत परिवारातर्फे त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली.
- विजय दर्डा, चेअरमन, लोकमत एडीटोरियल बोर्ड
>सच्चा ज्ञानोपासकाला आपण मुकलो
रा. चिं. ढेरे यांच्या निधनाने महाराष्ट्राने लोक साहित्य-प्राच्यविद्येचा गाढा आणि समर्पित अभ्यासक-संशोधक गमावला आहे. महाराष्ट्र संस्कृतीच्या अनेक अस्पर्शित पैलूंवर प्रकाश टाकण्याचे मोलाचे कार्य त्यांनी केले. एक सच्चा ज्ञानोपासक आणि ध्येयवादी संशोधकास आपण मुकलो आहोत.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
>गाढे अभ्यासक : लोकसाहित्य आणि संतसाहित्य यांचा अनुबंध स्पष्ट करणारे गाढे अभ्यासक काळाच्या पडद्याआड गेले.
- विनोद तावडे, सांस्कृतिक कार्यमंत्री
>आधुनिक विचारांचे व्यासंगी व्यक्तिमत्त्व हरपले
महाराष्ट्राच्या प्राचीन परंपरांविषयी सातत्याने अभ्यास करणारे आधुनिक विचारांचे व्यासंगी व्यक्तिमत्त्व हरपले आहे. धर्माविषयीच्या सध्याच्या संकुचित वातावरणाला त्यांचे विचार हे सप्रमाण उत्तर होते.
- राधाकृष्ण विखे पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते.

Web Title: Senior literary man Chin Dhere passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.