Sadhvi Pragya Singh Thakur became Mahamandaleshwar of the akhada in kumbh | साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर बनल्या आखाड्याच्या महामंडलेश्वर
साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर बनल्या आखाड्याच्या महामंडलेश्वर

प्रयागराज : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी नऊ वर्षे तुरुंगात घालवावी लागलेली साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर आता आचार्य महामंडलेश्वर स्वामी पूर्णचेतनानंद गिरी या नावाने ओळखली जाणार आहे. आज प्रयागराजयेथील कुंभमेळ्यादरम्यान तिला महामंडलेश्वर बनविण्यात आले. 

मंगळवारी माघी पौर्णिमेनिमित्त कुंभमेळ्यामध्ये साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरला भारत भक्ती आखाड्याचा प्रमुख बनविण्यात आले आहे. दिव्य प्रेम सेवा मिशनच्या एका शिबिरामध्ये सकाळी 11 वाजता साध्वी प्रज्ञा ठाकूर यांच्यावर पट्टाभिषेक करण्यात आला. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे स्वीय सहाय्यक अरुण सिंह यांनी सांगितले की, आखाड्याचे काम सनातन धर्माचे रक्षण करण्याचे आहे. अखिल भारतीय काशी विद्वत परिषदेने आजच या आखाड्याची स्थापना केली आहे. 

मालेगाव बाँम्ब स्फोटामध्ये आरोपी बनविण्यात आल्यानंतर तिच्यावर भगवा दहशतवादाचा आरोप ठेवण्यात आला होता. त्यांच्या अटकेनंतर त्यांना जुना आखाड्यातून काढून टाकण्यात आले होते. मात्र, त्यांचे निलंबन परिषदेच्या हस्तक्षेपामुळे मागे घ्यावे लागले होते. याकाळात त्यांच्याकडे कोणतेही पद नव्हते. 

महाराष्ट्रातील मालेगावमध्ये 29 सप्टेंबर 2008 मध्ये एका मशीदीजवळ बाँम्ब स्फोटा घडविला गेला होता. यामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला होता. तर 100 हून अधिक जण जखमी झाले होते. या प्रकरणी न्यायालयाने कर्नल पुरोहित, साध्वी  प्रज्ञा सिंह ठाकुर समवेत काही जणांविरोधात आरोप निश्चित करण्यात आले होते. 

मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित यांची अखेर नऊ वर्षांनी तुरुंगातून सुटका झाली आहे. कारागृहात जामिनाची सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पुरोहित तळोजा तुरुंगाबाहेर आले. सुटकेच्यावेळी पुरोहितांसोबत त्याचे कुटुंबिय आणि लष्कराचे जवान देखील होते.  


नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव शहरात झालेल्या या स्फोटप्रकरणी एनआयएने एकूण १४ जणांना आरोपी बनवले होते. यात पुरोहित यांचाही समावेश होता. बाइकवरील दोन बॉम्बच्या स्फोटांत सात जण ठार झाले होते. महाराष्ट्र दहशवाद विरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे यांच्या नेतृत्वाखाली सुरुवातीला तपास झाला होता. नंतर हा तपास एनआयएकडे देण्यात आला. पुरोहित आणि प्रज्ञा ठाकूरशिवाय शिवनारायण कालसांगरा, श्याम साहू, रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, अजय, राकेश धावडे, जगदीश म्हात्रे, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी आणि प्रवीण तकालकी यांनाही अटक झाली होती. 


एनआयएने साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर व पुरोहित यांच्यावर लावण्यात आलेला मकोका हटवण्यासंदर्भात कायदा मंत्रालय आणि अ‍ॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांच्याकडून मत मागितले होते.केंद्रात व राज्यात सत्तापालट झाल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेची मालेगाव स्फोटातील आरोपींबाबतची भूमिका सौम्य झाल्याचा आरोप करण्यात आला होता.


Web Title: Sadhvi Pragya Singh Thakur became Mahamandaleshwar of the akhada in kumbh
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.